मित्रा कडून घेतलेले पैसे परत देण्या घेण्याच्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून.
अकोले (प्रतिनिधी) मित्रा कडून घेतलेले पैसे परत देण्या घेण्याच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील गर्दनी शिवारात पाडव्याच्या दिवशी घडली .या संदर्भात दोन संशयित आरोपींना अकोले पोलिसांनी अटक केली असून, त्यांना उशिरा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अकोले शहरापासून जवळच असलेल्या नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले( राहणार- पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले ,हल्ली मुक्काम -नवलेवाडी) यास गर्दणीच्या डोगरातील चिमणदरा येथे त्याच्या डोक्यावरती जबर मारहाण करुन त्याचा खुन करण्यात आला आहे. अकोले पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीचा शोध लावून अटक केली .पिंपळगाव निपाणी येथील व सध्या नवलेवाडी येथे राहत असलेले मान्हेरे आश्रमशाळेतील अधिक्षक एकनाथ भोसले यांचा मुलगा प्रथमेश हा 12 वीत शिकत होता. तो सी ई टी च्या अभ्यासक्रमासाठी नांदेड येथे शिकवणी वर्गात शिकत होता. दिपावली सुटटीसाठी तो आपल्या आई-वडिल राहत असलेल्या नवलेवाडी, अकोले येथे आलेला होता.सगळीकडे दिपावली साजरी होत असताना.सोमवार दि 28 आक्टोबर 2019 रोजी दुपारी प्रथमेश भोसले हा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी घरून बाहेर पडला. तो सायंकाळी गर्दणी शिवारात डोक्याला जबर मारहाण करुन खून केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. गर्दनी चे पोलीस पाटील संतोष अभंग यांच्या माहिती वरून पोलिसांनी शोध घेतला .अकोले पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे प्रचंड गतीने फिरून या खुनाचा तपास अवघ्या 24 तासात करून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.पोलिस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित यानी भेट दिली .यावेळी पोलिसांनी सुजान महेश देशमुख रा. माळीझाप ता. अकोले व उदय विजय गोर्डे रा.धामणगाव रोड ता.अकोले या आरोपीना बेड्या ठोकल्या .एकनाथ खडू भोसले यांच्या फिर्यादीवरुन भा द.वि 302,34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व मयत हे मिञ असुन मयत प्रथमेश याने आरोपीना पैसे उसने दिलेले होते. ते पैसे परत मागण्याचा तगादा प्रथमेशने लावल्याने सुजान महेश देशमुख व उदय विजय गोर्डे यानी त्याला गर्दणीच्या डोगराकडे नेऊन डोक्यात जबर मारहाण करुन खून केला . त्यात प्रथमेश त्याचा मृत्यू झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे व उपनिरीक्षक दिपक ढोमणे करत आहे. शहराजवळील गर्दनी परिसरात दिवसा खुनाची घटना घडल्याने तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या साडेसात हजार रुपयाच्या उसनवारी वरून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे .सतरा अठरा वर्षाची ही मुले एकमेकाचा घातकरीत खुना पर्यंत पोचले आहे. या डोंगरावरती खून करण्यात आला तेथे काही गुरे चारणार्या लोकांनी या मारामार्या पाहिल्या असल्याचे समजते. तथापि या परिसरात मुलांमध्ये मस्करी सुरू आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तथापि काही काळानंतर खून झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिस पाटलांना ही बातमी सांगण्यात आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा होण्यास मदत झाली. तथापि ऐन तारुण्यात या मुलांनी खुनासारखे प्रकार केल्याने तरुण पिढीच्या संदर्भाने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. अशा स्वरूपाचा खून करण्याचा अकोल्यातील हा पहिलाच प्रकार मानला जात आहे. अढळा परिसरातील पिंपळगाव निपाणी येथील मूळचे रहिवासी असलेले एकनाथ भोसले यांचा चिरंजीव प्रथमेश याचे शवविच्छेदन अकोले येथे झाल्यानंतर पिंपळगाव येथे उशिरा त्याच्यावरती अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथमेश हा राजूर येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री बाबासाहेब गोडगे यांचा भाचा आहे. प्रथमेश हा भोसले कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.