देशभक्ती एका जातीची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही- संजय राऊत.
मुंबई : देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची नाही. आम्ही सर्व देशभक्त आहोत, आमची देशभक्ती तुमच्यापेक्षा अधिक आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात जमात ए इस्लामीच्या वतीने चर्चासत्र मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, पीयूसीएलचे अध्यक्ष मिहीर देसाई, एपीसीआरचे अध्यक्ष युसूफ मुछला आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी राऊत म्हणाले की, देशात भीती पसरवली जात आहे, परंतु कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही. घाबरविणारे येतात आणि जातात. हा देशाचा इतिहास आहे. महाराष्ट्राने भीती संपविण्याचे काम केले आहे, देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. ते पुढे म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांवर बंदूक रोखली जात आहे, हल्ले होत आहेत, असे असताना पंतप्रधान विद्यार्थ्यांनी केवळ शिकण्याचे काम करावे, असे सांगत आहेत. परंतु विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असून याचा अर्थ लोकशाही धोक्यात आहे. तसेच स्वातंत्र्य लढ्यात विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान होते, त्याच्यामुळे परिवर्तन घडले, असेही ते म्हणाले. आपल्याला सर्वांना मिळून देश वाचवायचा आहे, सर्वांनी याविरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.या वेळी कोळसे पाटील म्हणाले की, कोणताही कायदा आणताना सहजतेने त्याची अंमलबजावणी होईल असा कायदा असायला हवा. ज्या कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही ते आपल्यावर लादले जात आहेत. हे २०२४ निवडणुकीसाठी सरकारचे षड्यंत्र आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोघांचेही रक्त एकच असून सर्वांनी याविरोधात रस्त्यावर उतरा, असे आवाहन त्यांनी केले. तर सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे गरिबांच्या विरोधात आहेत. धर्मावर आधारित नागरिकत्व देऊन सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे, असे मिहीर देसाई म्हणाले.>तीस टक्के हिंदूंना फटकासीएए, एनआरसी, एनपीआरमुळे केवळ मुस्लिमांना नाही, तर सर्वांना फटका बसणार आहे. कित्येक लोकांकडे जुने पुरावे नाहीत. देशातील ३० टक्के हिंदूंचे यामुळे नुकसान होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.














