क्रीडांगणात उमटला जल्लोष — श्रीरामपूरात तालुका शालेय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा सुरू
श्रीरामपूर (10 ऑक्टोबर 2025) : श्रीरामपूर तालुका शालेय क्रीडा खो-खो मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धांचा आज चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूरच्या क्रीडांगणावर जल्लोषात शुभारंभ झाला. या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कांबळे (चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख, पर्यवेक्षक विजय दळवी, परीक्षा विभाग प्रमुख प्रमोदकुमार राऊत, क्रीडा शिक्षक श्री. सुनील बनसोडे, प्रा. बाळासाहेब शेळके, तसेच श्रीरामपूर क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री. काकासाहेब चौधरी व सचिव श्री. संभाजी ढेरे उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांचा सत्कार काकासाहेब चौधरी यांनी केला, उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद यांचा सत्कार पुंडलिक शिरोळे सरांनी, तर प्रा. सुभाष देशमुख यांचा सत्कार विजय गाडेकर सरांनी केला. तसेच काकासाहेब चौधरी यांचा सत्कार प्राचार्य कांबळे यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवरांचा व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचा सत्कार प्रा. बाळासाहेब शेळके यांनी केला.
प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना सांगितले की, “आयुष्यात प्रत्येकाने एक खेळ तरी खेळला पाहिजे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळते.”
यानंतर मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय गाडेकर सरांनी केले.

























