१२ जुलैला रंगणार अंतिम स्पर्धा; विजेत्या संघाला ट्रॉफी व प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार..
कोपरगाव(गौरव डेंगळे): सोमैया विद्या विहारच्या श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा थ्रो बॉल लीग २०२५ साठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी शनिवार, ५ जुलै रोजी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
या लीगमध्ये प्रत्येक संघात
✅ इयत्ता ९ वी व १० वी मधील ४ मुले,
✅ इयत्ता ७ वी व ८ वी मधील ४ मुले,
✅ इयत्ता ८ वी ते १० वी मधील ४ मुलींचा समावेश असणार आहे.
स्पर्धेचे अंतिम सामने शनिवार, १२ जुलै रोजी रंगणार असून, विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात येईल. याच दिवशी सर्व संघांचे कर्णधार आणि अधिकृत संघांची घोषणा करण्यात येणार आहे.
या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्यात थ्रो बॉल खेळाचा प्रचार-प्रसार करणारे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. धनंजय देवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
नाव नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी श्री. गणेश वाघ व श्री. गणेश मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या लीगमुळे विद्यार्थ्यांमध्ये थ्रो बॉल खेळाविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगभूत कौशल्यांना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment