गणेश महागुडे यांनी कुस्तीचा इतिहास मांडताना सांगितले की, हा खेळ केवळ स्पर्धा नसून भारतीय परंपरेचा अभिन्न भाग आहे. रामायण आणि महाभारतातून कुस्तीची सुरुवात झाल्याचे दाखले देत त्यांनी हा खेळ किती पुरातन आणि समृद्ध आहे, हे पटवून दिले. कुस्ती ही फक्त ताकदीची लढाई नसून ती संयम, शिस्त आणि मनोबल यांची परीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी आपल्या व्याख्यानात १९५२ मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या खाशाबा जाधव यांचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव यांना त्यावेळी आर्थिक अडचणींवर मात करून ऑलिम्पिकमध्ये भाग घेता यावा म्हणून त्यांच्याच कॉलेजमधील प्राचार्यांनी स्वतःचा बंगला गहाण ठेवून मदत केली होती,ही हृदयस्पर्शी गोष्ट त्यांनी सांगितली.
गणेश महागुडे यांनी आधुनिक कुस्तीचे प्रकार समजावून सांगत कुस्तीमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, कुस्तीमुळे अनेक युवकांना पोलीस, रेल्वे, सैन्य आणि विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळाल्या आहेत. या खेळातून केवळ यश नाही तर एक सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध जीवनशैली मिळते.
आज जरी हरियाणाचे मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये आघाडीवर असले, तरी भारतासाठी पहिले पदक महाराष्ट्रातील मातीतूनच आले, याची आठवण करून देत त्यांनी महाराष्ट्रातील युवकांनीही या खेळाकडे पुन्हा गंभीरतेने पाहावे असे आवाहन केले.
श्री शारदा स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.उपस्थित विद्यार्थ्यांनी महागुडे सरांच्या व्याख्यानात रस घेतला आणि विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली.कार्यक्रमाच्या शेवटी सरांनी सांगितले की, कुस्ती म्हणजे केवळ मैदानात लढायचे कौशल्य नव्हे, ती संपूर्ण जीवनात संघर्षातून विजय मिळवण्याची शिकवण आहे. "कुस्ती ही एक संस्कारक्षम जीवनशैली आहे" या शब्दांत त्यांनी आपले व्याख्यान संपवले आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश निर्माण केला.
Post a Comment