शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्री शारदा स्कूलचा झंझावात… शाळेच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा ठळक प्रचिती!
श्रीरामपूर (गौरव डेंगळे) – सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, शाळेच्या इतिहासात प्रेरणादायी अशी कामगिरी नोंदवली आहे. यामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील आदर्श आढळ, अवधूत अंभोरे, आयुष निर्मल, शर्वरी बोरसे, श्रीरंग मालपुरे आणि श्रेया वर्गुडे तर इयत्ता आठवीतील सृष्टी वावधणे आणि नचिकेत काठमोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही कामगिरी म्हणजे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे प्रामाणिक मार्गदर्शन यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.या यशामध्ये शिक्षिका शिल्पा खांडेकर, सोनल निकम, माधुरी भस्मे,सुनंदा कदम, स्वरूपा वडांगळे, सीमा शिंदे, गणेश मलिक आणि अर्चना बाजारे यांनी विद्यार्थ्यांसोबत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
Post a Comment