पणजी ( गौरव डेंगळे) – गोवा राज्य क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे (DSYA) नवे संचालक डॉ. अजय गावडे यांनी १७ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारताच तात्काळ कृतीला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी गोव्यातील सर्व १२ तालुक्यांतील तालुका क्रीडा अधिकारी (TSO) व सहायक क्रीडा शिक्षण अधिकारी (APEO) यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यांच्या समोरील अडचणी आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.राज्यातील क्रीडा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना सक्षम करण्यासाठी एक व्यापक योजना आखण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. खेळांना गावपातळीपासून गती मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी आणि गोव्यातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हे या चर्चेचे मुख्य सूत्र
राहिले.या दिवसातच डॉ. गावडे यांनी खेळो इंडिया अधिकारी, क्रीडा प्राधिकरण गोवा (SAG) व विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. त्यांनी क्रीडा क्षेत्रात सुसंगत समन्वय ठेवत नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले. DSYA, SAG आणि गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिल (GFDC) यांच्यात समन्वय साधत गोव्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“गोव्यातील खेळाडूंमध्ये अफाट कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आधार दिल्यास ते राज्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील. गोवा हा देशातील महत्त्वाचा क्रीडा केंद्र बनावा, हीच आमची दिशा व ध्येय आहे,” असे डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.त्यांच्या या सकारात्मक आणि कृतीशील सुरुवातीमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व स्तरावर नव्या आशा निर्माण झाल्या असून,गोव्यातील क्रीडा व्यवस्थापनात ठोस बदल होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
Post a Comment