श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत व हवेत झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यात एका गटातील आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर आरोपी पसार झाले आहेत.मंगळवारी वडाळा महादेव परिसरात दोन गटांत हाणामारी होऊन हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पो.ना. सचिन कुमार रामदास बैसाणे यांनी दहा ते बारा अज्ञात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 10 ते 12 अज्ञात आरोपी यांनी हातात दांडके, तलवार, गावठी कट्टा घेऊन बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करत होते. आम्ही त्यांना थांबा म्हणूनही जमावातील इसम दुसर्या जमावातील इसमावर गावठी कट्ट्याने ठार मारण्याच्या उद्देशाने राउंड फायर केला. त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब छेदीदास जाधव (वय 26), प्रकाश बाळासाहेब रणवरे (वय 24), विजय किशोर मैड (वय-28), सोमनाथ बापू चितळे (वय-24), मनोज यशवंत पवार (वय-24), रितेश खंडू जाधव (वय-21) (सर्व रा. टाकळीभान) तर तन्वीर सलीम शेख (वय-23, मिरावली पहाड रोड नगर), प्रशांत रंगनाथ नागले (वय-27, रा. घोगरगाव) या आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर (एम. एच. 17 बी. क्यू. 972), विनानंबरची बुलेट, बजाज प्लॅटिना एम. एच. 17 बी. आर. 7641), हिरो एच. एफ. डिलक्स (एम. एच. 17 सिडी 3337), विना नंबरची यामाहा यासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे ताब्यात घेतली आहेत. याबाबत पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत. दुसरी फिर्याद सोमनाथ बापू चितळे (वय 24, रा.इंदिरानगर टाकळीभान ता.श्रीरामपूर) यांनी तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे (रा.टाकळीभान) व इतर 6 जणांविरुद्ध दिली आहे. त्यात म्हटले आहे अक्षता मंगल कार्यालय वडाळा महादेव येथे आपल्या गावातील प्रशांत नागले, प्रकाश रन्नवरे, मनोज पवार, बाळासाहेब जाधव, रितेश जाधव, विजय मैड व तनवीर शेख यांच्या सोबत थांबलेलो होतो. कबड्डी ग्रुपचा कुणाल पवार याचे काही मुलांसोबत भांडणे झाली होती.त्या भांडणाच्या कारणावरून तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे व त्यांच्या सोबत इतर 6 मुलांनी मोटारसायकलवरून पिस्तुल व तलवारीसह ट्रिपलसीट येऊन आमच्या दिशेने गोळीबार करून तलवारी दाखवून दहशत निर्माण केली. तसेच एका घराच्या दरवाजावर वार केले. त्यानुसार पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून हे सर्व आरोपी पसार झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास सपोनि पाटील करीत आहेत.
Post a Comment