श्रीरामपुर (प्रतिनिधी) तालुक्यातील भोकर येथील युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले (वय-37) यांचा त्यांचे सख्खे भाऊ रविंद्र नवले याने मागील भांडणाच्या रागातून जड वस्तूने डोक्यात मारून खून करून मृतदेह गवतात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मुळ सुभाषवाडी, बेलापूर येथील रहिवाशी असलेले मात्र सध्या भोकर येथे राहत असलेले युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात कांग्रेस गवतात आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे,श्रीरामपुरचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक एन जे शिंदे,पो का .पवार,बर्डे,लोंढे, दिघे आदींनी घटनास्थळी भेट दिली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा खून झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.प्रदीप नवले याचा खून त्याचा सख्खा भाऊ रविंद्र याने केल्याचा संशय पोलिसांना आला.पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता पोलिसांचा संशय खरा ठरला. दरम्यान मयत प्रदीप याची पत्नी भाऊबीजेला माहेरी गेली होती. याबाबत प्रदीप याची पत्नी स्वाती प्रदीप नवले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, आपण मंगळवारी सायंकाळी भाऊबीजेला माहेरी आलो होतो.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दीर रविंद्र याने आपले पती प्रदीप यांचेशी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातले.वादातून काही तरी जड वस्तू डोक्यात मारून गंभीर जखमी केले.त्यात पती प्रदीप यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रवींद्र बाबासाहेब नवले यास ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन जे शिंदे करीत आहेत.
Post a Comment