
अहमदनगर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे पोलीस मुख्यालयातील मैलामिश्रीत पाणी घरामध्ये घुसले आहे. त्यामुळे वसाहतीत राहणार्या पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महिलांनी पोलीस अधिकार्यांकडे तक्रारीचा पाढा वाचला. मात्र, पोलीस प्रशासनानेही दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये सलगच्या झालेल्या पावसाने गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे ते मैलामिश्रीत पाणी वसाहतीमध्ये घुसले असून नागरिकांना तेथे राहणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये साथीचे आजार पसरत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनीही दुर्लक्ष केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वसाहतीमधील काही महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यलय गाठले.मात्र, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट होऊ शकली नाही.गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी सुनील कुर्हे यांची मुलगी पूजा हिचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक सिंधू यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस मुख्यालयातील नागरी सुविधांची संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली होती. यामध्ये महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. व नागरी सुविधांवर तातडीने काम करण्याच्या सुचनाही सिंधू यांनी दिल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकार्यांना टाईम लिमिट दिले होते. मात्र, आता पुन्हा नागरी सुविधाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Post a Comment