रमजानुल मुबारक मालिका २०२४
इस्लाम समजून घेताना
रोजा नंबर:- ३०
बुधवार दिनांक १०-०४-२०२४
!! रोजा ३० : आत्मचिंतन - अवलोकनातुन ;- सकारात्मक भविष्यासाठी स्वयंप्रेरणा ..!!
आज लैलतुल जायजा .. अर्थात" जायजा " म्हणजे अवलोकन " आज महीनाभर ठेवलेल्या रोजे( उपवास) चं आपण केलेल्या खडतर प्रवासाचं (अवलोकन) जायजा करणं . खरोखरच इमानेइतबारे केले असेल तर अल्लाह जवळ त्याचं बक्षीसाची मागणी करणं .अपण केलेल्या महिन्याभराच्या कष्टाचं परिक्षण करुन फळ देणं हे त्यांच्या हातात.
कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेणे यासाठी आवश्यक आहे की, त्यात पारंगत व्हावे आणि त्याअनुषंगाने कामे सोपे व्हावीत. आपण मुख्यत्वेकरून पाहतो, शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, मिलिट्री, खाजगी संस्थांमध्ये आपल्या कर्मचार्यांच्या व्यक्तीमत्वात, कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून सदरच्या उमेदवाराची कार्यक्षमता तपासली जाते, त्याच्यात प्रशिक्षणातून होणार्या बदलाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जाता आणि त्यावरून त्याच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते.
असेच सर्वांगीण प्रशिक्षण वर्षाकाठी एक महिना ईश्वराने श्रद्धावंतांंसाठी रमजानुल मुबारक मध्ये ठेवले आहे. मित्रानों! रमजानमध्ये महिनाभर आम्ही रोजे ठेवले, कुरआन पठण केले, सर्व वाईट गोष्टीं- सवयी- व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले. शक्य तितक्या उच्चकोटीच्या नैतिकतेला प्राधान्य दिले. मित्रानों,हे काम अजून संपलेले नाही व नसतात देखील व हेच कार्य आम्हाला पुढील 11 अकरा महिने अमंलात आणायचे आहे. इमान, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामच्या मुलभूत पाच तत्वांपैकी आम्ही चार तत्वांना रमजामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याचा कसोशीने प्रयत्न केला . आपल्याला सत्यावर चालणारे आणि वाईटांपासून इतरांनाही दूर करणारे शिलेदार बनायचे आहे. कुरआनमध्ये ईमानधारकांबद्दल असे सांगितले आहे की, “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.” (सुरह नंबर ३ आ.नं. ११०)
मित्रानों, या आयातीवरून समजते की, श्रद्धावंतांना संपूर्ण मानवकल्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहेत ,
रमजानच्या काळातील प्रखर प्रशिक्षणानंतर समजून येते की, आम्हाला ज्या अर्थी उन्हाचे चटके सहन करीत, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची कडक तंबी दिली गेली. काही काळापुरते वैध गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले गेले. उच्चकोटीचा संयम, धैर्य अंगी बाळगण्याचे मनोबल रमजानमध्ये मिळाले. मित्रानों, हे कठीण प्रशिक्षण ठराविक कालावधीत अर्थात संपूर्ण रमजान महिनाभर संपूर्ण जगात दिले गेले. यानंतर या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्याला सर्व मानवकल्याणाच्या हिताचे कार्य करायचे आहे.
दिव्य कुरआनच्या पुढे काय सांगते ”हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित , आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.” ( सुरह नं १६ अल - नहल आ.न. १२५ ).
तुम्ही जर तुमच्या अल्लाहाने सांगितले प्रमाणे या पृथ्वीतलावर मनापासून फक्त अल्लाहच्या इच्छेसाठीच काम करीत राहिले तर नक्कीच त्यांचे चांगले बळ मिळते..पुढे दिव्य कुर आन म्हणते की , ” आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. (सुरह नंबर ४१ अल - सजजदाह आ.नं.३४ ).
तुम्ही केलेल्या महीनाभरातील खडतर प्रशिक्षणाचा उपयोग तुम्हाला सर्व समाजातील लोकांना फायदा करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे.. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी, त्यांना वाईट सवयी पासून दुर करण्यासाठी , त्यांना आपल्या प्रपंच चागले चालावा व आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी तत्पर राहावेत यासाठी, तुम्हाला तुमच्या सभोवताली असलेल्या सामाजिक समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हक्कासाठी, प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून भांडणे होतात ते होणार नाही म्हणून प्रयत्न करण्यासाठी , समता बंधुता अखंडता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे.
"बदलते वातावरण आणि आपली भूमिका "
मित्रानों! देशाचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ केले जात आहे. धर्माच्या नावावर आपआपसांत लोकांना भडकाविले जात आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे. धर्माबाबात कोणावरही जबरदस्ती करता येत नाही.
दिव्य कुरआन ही हेच फरमावितो, ”तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.” ( पारा नं ३० सुरह नं. १०९ ,अल- काफीरून आ.नं.१०९)
पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, ”धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे.” ( सुरह नं. २ अल - बकराहा आ.नं. २२३ )
सदरील कुरआनच्या आयातीवरून आम्हाला बोध मिळतो की, धर्मासंबंधी कुठलाही अतिरेक करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये, संवादाने एकमेकांची भूमिका समजून घ्यावी. शक्य तेवढे एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते, वाद विकोपाला जाणार नाहीत याची सतत काळजी घ्यावी. आप आपसात विसंवाद निर्माण होता कामा नयेत , आपल्या बुद्धीच्या क्षमतेने विचार करून मार्गस्थ व्हावे. समेट घडवून आणला पाहिजे.
राजकारण करायचेच असेल तर खरोखरच समाज कारण व लोककल्याणासाठी केेले पाहिजे. परंतु, त्या ऐवजी समाजात विषाची बिजे पेरली जात आहेत. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आजचे समाजकारण राजकारण गेलेले आहेत,तर त्याला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे व जे चुकीचे चालले आहे ते रोखायची जबाबदारी सर्व समाजातील श्रद्धावंत आणि समाजधुरीणांकडे आहे. त्यांनी खरोखरच यासाठी कसोशीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.. अल्लाहा म्हणतात प्रयत्न करणं तुमचे काम नंतर त्याचं फळ देणं हे माझं काम मी सर्वांचं मन परिवर्तन करणारा जरूर आहे.. प्रयत्न तर करून तर बघा, आजचं राजकीय पक्ष फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी समाजात विष पसरविण्याचे काम करीत असतात,
विष हे कोणासाठीच अमृत ठरत नाही. मग ते स्लो पॉईजन असो की कडक. आज नाही तर उद्या ते आपला गुण दाखविण्यास सुरूवात करते.
दिव्य कुरआनमध्ये सांगितले आहे की,
”आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील. (पारा नं. १३ ,सुरह नं. १४ अल - इब्राहीम आ.नं. ४२ ).
पृथ्वीतलावर सुधारणा करण्यासाठी कुर आन म्हणते की, ”जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ”आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!” ( सुरह नं. २ अल- बकराह आ.नं.११. ) व हो ”सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही. ( सुरह नं.२ अल- बकराह आ. नं. १२ )."
मित्रानों, या कुरआनच्या आयाती ज्या उपद्रव माजविणार्यांविरूद्ध आहेत. कोणीही कुठल्याही समाजघटकाचे का असेनात दंगे, उपद्रव माजवू नका आणि जे माजवित आहेत त्यांना रोखा, आशा उपद्रवी संघटनेत सामील होवू नका. ईश्वराने प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिली आहे, त्याचा उत्तम फायदा जनकल्याणासाठी करावा.
पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, “ ज्याने कोणा एकाला ही जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.” (सुरह नं. ५ अल- माईदा आ.नं.32).
या आयातीवरून बोध मिळतो की आपल्या हातून कधीच नाहक व्यक्तीचा खूनच काय, त्याचा हक्क ही मारला जावू नये याची खबरदारी घेतली पाहिजे.
कुरआनमध्ये फरमाविले, “काळाची शपथ आहे, मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले. ( सुरह १०३ सुरह अल - हश्र आ.नं.१ते ३ ) " .
सर्व श्रध्दावान बंधुंना विनंती आहे की, त्यांनी दैनंदिन जीवनात दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचं मार्गदर्शन आत्मसात करून समाजात नैतिक बदलासाठी पुढाकार घेऊन सत्कर्माचे काम हाती घ्यावे. लोकांना वाईटापासून रोखावे, जे समाजात उपद्रव माजवत आहेत, विनाकारण सामान्य माणसांना त्रास देत आहेत, मानवकल्याणाच्या विरूद्ध जाऊन वागत आहेत अशांचा शोध घेऊन संवैधानिक मार्गाने त्याविरूद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करावा आणि लोकांमध्ये ईश्वरीय मार्गदर्शन पोहोचवावे. हाच रमजाननंतरच्या प्रशिक्षणाचा संदेश.
मित्रानों, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाने जीवन कसे जगावे, जगण्याची नियमावली कशी असावी, त्याची आचार-विचार करण्याची पद्धती कशी असावी? कोणाशी कसा संवाद साधावा, त्याचे अध्यात्मिक जीवन कसे असावे, त्याने पारलौकिक जीवनाची तयारी कशी करावी, ऐहिक जीवनात प्रगती करताना कोणती नैतिक मुल्य अंगी बाळगावीत अशा एक ना अनेक मनुष्याच्या जीवनासंबंधी मार्गदर्शन आपल्या परीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे...
तरच या संपूर्ण रमजानुल मुबारक खडतर प्रवासाचा व प्रशिक्षणाचं फलीत राहीलं...
अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देवो हिच अल्लाहच्या जवळ दुआ याचना करतो
" उद्या ईद उल फिजत्र चा दिवस सर्वांना सुखरूप जावो हिच अल्लाह जवळ दुआ याचना करतो "
ईद मुबारक २०२४ ..
( .मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर कळवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. प्रतिक्षेत )