भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पँनल बसविण्याचा प्रयत्न - आ. कानडे बेलापूर-श्रीरामपूर रस्ता केल्याने आ. कानडे यांचा सत्कार, अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव
श्रीरामपूर- बेलापूर गाव सुंदर करण्याच्या दृष्टीने प्रवरा नदीकाठच्या दोन्ही बाजूला घाट करण्याचा तसेच मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पँनल बसविण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे १८ कोटी रुपये खर्चाचे चौपदरीकरण करून त्यावर दीड कोटी रुपये आमदार निधीतून स्ट्रीट लाईट बसविल्याबाद्द्ल बेलापूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आ. कानडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद नवले, माजी सरपंच महेद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, अजय डाकले, इस्माईल शेख व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, गेली साडे चार वर्ष कुठल्याही भानगडीत न पडता तालुक्यात असलेले प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. कामांच्या बाबतीत भेदभाव केला नाही. माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा तालुक्यातील जनतेचे प्रश्न, रस्ता, विज ,पाणी, महीला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देवुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात अजुन पुष्कळ कामे करावायाची आहेत. अनेक ठिकाणी कामाचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच सुरु झालेली असते त्यामागे टक्केवारी हे वेगळेच कारण असते. शासनाचा निधी हा एकदाच येत असतो त्यामुळे कामे दर्जेदार करा, हा सर्वसामान्यांचा पैसा आहे याबाबत जनतेत जनजागृती करा.
कायदा, घटना एवढी मोठी आहे कि, त्यातून कोणी वाचू शकत नाही, त्यामुळे ज्याने त्याने जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, आमदार म्हणून तुम्हाला खाली पाहण्याची वेळ येणार नाही, असेच आपण वागलो असून यापुढेही वागेल, हल्ली नेत्यांच्या गाडीत गुन्हेगार कसे येतात, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे,असे यापूर्वी कोणीही बोलले नाही. याबाबत विधानभवनात बोलणारा आपण एकमेव आमदार असल्याचे ते म्हणाले.
सचिन गुजर म्हणाले, रस्त्याच्या माध्यमातून श्रीरामपूर-बेलापूर ही दोन गावे जोडण्याचे काम आ. कानडे यांनी केले आहे. जलजीवन योजनेसाठी त्यांनी मदत केली. दुसरा कोणी असता तर त्यांनी या योजनेत खोट कशी येईल,असे पहिले असते. परंतु आ. कानडे यांनी गट तट न पाहता विकस कामे केली. बेलापुरकरांनीही राजकारणापलीकडे जाऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. राजकारणापलीकडे जाऊन गावात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पूर्वीपासून सुरु असल्याचे सांगून अरुण पाटील नाईक यांनी आ. कानडे यांनी गावात केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली.
जि.प.चे माजी सभापती शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी, ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार या सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे सांगून आ. कानडे यांच्या संकल्पनेतून पुणे, मुंबई प्रमाणे बेलापूर-श्रीरामपूर रस्ता झाल्याचे नमूद करून हा रस्ता जिल्ह्याचे रोल मॉडेल ठरणार असल्याचे सांगितले. जलजीवन योजनेतील त्रुटी सांगून ही योजना कशी मार्गी लागेल, याविषयी आमदार कानडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे श्री. नवले म्हणाले. या योजनेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी मदत केल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी सरपंच महेंद्र साळवी, इस्माईल शेख, लहानु नागले, मोहसीन सय्यद, पत्रकार ज्ञानेश गावले, देविदास देसाई, भाजपाचे प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब कुताळ, चंद्रकांत नाईक, प्रसाद खरात,शफिक बागवान, मुस्ताक शेख, बाळासाहेब दाणी, जाकीर हसन शेख, बाबूलाल पठाण, समीर जहागीरदार, बाळासाहेब वाबळे, विशाल आंबेकर, राहुल माळवदे, दादासाहेब कुताळ, भाऊसाहेब तेलोरे,विजय अमोलिक, रफिक शेख, जीना शेख, भैय्या शेख, महेश कुऱ्हे,सचिन वाघ,शफिक आतार, अँड. अरविंद साळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करून शेवटी आभार मानले.
......