श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहरातील नॉर्दन ब्रांच पासून वॉर्ड नंबर दोन मधून गेलेल्या प्रवरा कालव्याला काल दुपारपासून मोठे भगदाड पडले.त्यामुळे वैदूवाडा पुलापासून थोड्या अंतरावर या भागातून पाणी शेजारच्या रस्त्यावर तसेच आसपासच्या घरांमध्ये शिरले.जवळच नगरपालिकेची मोठी गटार असल्याने बरेचसे पाणी त्या गटारीत वाहून गेले. दुसऱ्या बाजूला फातेमा कॉलनीच्या बाजूने सुद्धा दुपारपासून पाणी फातमा कॉलनीतील प्रमुख रस्त्यांवर वाहत आहे.काल दुपारी उर्दू शाळेची मुले या पाण्यामध्ये खेळताना काही नागरिकांनी त्यांना हाकलले अन्यथा यातून एखादी मोठी दुर्घटना घडली असती. दुपारपासून आता रात्री अकरा वाजेपर्यंत प्रचंड पाणी वाया गेले असून परिसरातील
नागरिकांना सुद्धा याचा मोठा त्रास झाला आहे.परंतु पाटबंधारे खाते किंवा नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदरचा कालवा अनेक ठिकाणी उखडला आहे. वैदू वाड्यात पुलाजवळ तर या कालव्याचे पात्र एखाद्या नदीसारखे झाले आहे. शेजारीच रस्ता असल्यामुळे अनेक दुचाकी स्वार त्यात पडले आहेत. तसेच येथून नागरिक व विद्यार्थ्यांची नेहमी ये जा चालू असते. याबाबत पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या तरी सुद्धा अद्याप दखल घेतली गेली नाही. काल कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने हे पाणी ओव्हरफ्लो होऊन कालव्याच्या बाहेर पडले.त्यातच दोन ठिकाणी भगदाड पडल्याने सदर पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले. पाटाला पाणी आल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या बाबीकडे पाटबंधारे खात्याच्या या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात पाटबंधारे खात्याच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसेच या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Post a Comment