पालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार दररोज हजारो लिटर पाणी जाते वाया
शहराच्या विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा संदर्भात पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. आंदोलने केली. तरी सुद्धा पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची तातडीने बदली करून सक्षम असा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
शहराच्या विविध भागात असलेल्या पालिकेचे जलकुंभ भरल्यानंतर अनेक तास पाणी वाया जाते. संजय नगर पाण्याची टाकी, मोरगे वस्ती वरील पाण्याची टाकी, कांदा मार्केट परिसरातील पाण्याची टाकी या भागांमध्ये टाक्या भरल्यानंतर सुद्धा अनेक तास पाणी वाया जाते. तेथे कोणताही वाचमेन किंवा पाणीपुरवठा कर्मचारी नसतो. संजय नगर परिसरातील पाण्याची टाकी तर वरूनच ओव्हर फ्लो होते तर मोरगे वस्ती येथील पाण्याच्या टाकीच्या पाईप लाईन मधून ओव्हर फ्लोचे पाणी तासनतास शेजारी शेतात सोडले जाते.
गोंधवणी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यासाठी जाणार्या मेन पाईपलाईन वरील वाल्व नेहरूनगर परिसरामध्ये गेल्या एक वर्षापासून लीक असून तेथे 24 तास मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तिथे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचार्यांचे दुर्लक्ष आहे.
वैदुवाडा अहिल्या देवी नगर परिसरामध्ये नागरिकांना मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिल्याने प्रत्येक वेळी तेथे नळांना पाणी येते. दिवसातून पाच वेळा त्या ठिकाणी पाणी येते व पाच वेळा पाणी आल्याने या भागातील नागरिकांच्या नळांना तोट्या नसल्याने तेथे सुद्धा लाखो लिटर पाणी दररोज वाया जाते. शहराला दररोज 40 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. शहराच्या सर्व भागातील हे वाया जाणारे पाणी रोखल्यास शहरात एक तास पाणी पुरवठा करता येईल अशी परिस्थिती आहे. परंतु पाणी पुरवठा विभागाचे अक्षम्य हलगर्जीपणामुळे पाण्याची नासाडी होत आहे.
मिल्लत नगर परिसरातील पाण्याबाबत गेले अनेक महिने बोंबाबोंब सुरू आहे. गेल्या महिन्यात या भागातील जलवाहिनी मध्ये मोठा दगड सापडला.त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला तर काही भागामधला पाणीपुरवठा एक अत्यंत कमी झाला. कांदा मार्केट परिसरातील नागरिकांनी देखील पाण्यासाठी आंदोलन केले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी टंचाईचे व पाणी वाया जाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वीच्या काळी नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग अत्यंत सक्षम होता. शहराच्या सर्व भागांमध्ये बारकाईने लक्ष ठेवून पाण्याची नासाडी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात होते. मात्र सध्या पाणी पुरवठा विभाग ढेपाळला गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याच्या विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी मागील आठवड्यामध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. तरी पण याबाबत कोणतीही सुधारणा झालेली नाही. पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने याबाबत दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.