संगमनेर प्रतिनिधी-अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.संगमनेर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला संतोष अशोक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याने फुस लावून पळवून नेले. याबाबत सदर मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पाळंदे यांनी केला. यामध्ये सदर आरोपीने मुलीला दमण येथे नेले होते. तिथे तो मानलेल्या बहिणेकडे राहिला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेत संगमनेर येथे आणले.सदर पिडीत मुलीचा पोलिसांनी जबाब घेतला. त्यामध्ये आरोपी संतोष वाडेकर याने सदर मुलीला बळजबरीने पळवून नेले. प्रथम ते वणी येथे गेले. तेथे बनावट मंगळसुत्र घेवून पिडीतेच्या गळ्यात घातले. वणी येथून नाशिक येथे घेवून आला व नाशिकहून दमण येथे घेवून गेला. दमण येथे आरोपीने मानलेली बहिण हिचेकडे पिडीत मुलीला 3 ते 4 दिवस तिच्या खोलीत ठेवले. तेथेच आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.या जबाबावरुन सदर आरोपीविरुद्ध वाढीव कलम 362, 366 (अ), 376 (2) (क) (एन) लावण्यात आले. तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 5(8) 6, तसेच पिडीता अनुसूचित जाती-जमातीची असल्याने अनुसूचित जाती जमाती प्र. का. क 3(1), (12),3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळंदे यांनी केला. गुन्ह्याचे अंतिम दोषारोपपत्र राकेश ओला यांनी दाखल केले.सदर खटला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या पुढे चालला. सदर खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांची साक्षी पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 363 नुसार 5 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, 376 (2) नुसार 10 वर्षे शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, 376 (2) (एन) नुसार 10 वर्ष शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार 10 वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 9 महिने कैद. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत, असा निकाल न्यायालयाने दिला.

Post a Comment