रेशन दुकानदारांच्या माथी निकृष्ट दर्जाचा गहू; पुरवठा विभागाकडे दुकानदारांची तक्रार.
नाशिक । प्रतिनिधी जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना विक्रीसाठी निकृष्ट दर्जाचा गहू प्राप्त झाला आहे. याबाबत दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांना निकृष्ट गहू मिळू नये यासाठी पुरवठा विभाग गहू बदलून देणार, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर यांनी दिली.पुरवठा विभागाला पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून खरेदी केलेला गहू वितरणासाठी प्राप्त होतो. मात्र पावसात भिजलेला गहू राज्याच्या माथी मारण्यात आला. गहू काळवंडलेला असला तरी तो खाण्यास चांगला असल्याची माहिती देत पुरवठा विभागाने या गव्हाचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते. गव्हास मोठ्या प्रमाणावर सोंडे लागले आहेत. तसेच काही दुकानदारांना पीठ झालेला गहू विक्रीसाठी देण्यात आला आहे. हा गहू घेण्यास ग्राहकांनी नकार दिला. याबाबत तक्रारी केल्यानंतर पुरवठा विभाग खडबडून जागा झाला.दिंडोरी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी प्राप्त झालेल्या गव्हाला सोंडे लागल्याचे व गव्हाचे पोत्यांमध्येच पीठ झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरसीकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गणपत डोळसे पाटील, निवृत्ती कापसे, दिलीप नवले, अशोक बोराडे आदी उपस्थित होते.