श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील श्रीस्थानकवासी जैन संघाच्या अध्यक्षासह विश्वस्तांवर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 66 व 67 अन्वये श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीमती हिरा शेळके यांच्यावतीने निरीक्षक ज्ञानेश्वर आंधळे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे.जैन संघाचे अध्यक्ष रमेश लोढा, विश्वस्त श्रेणिक गुजराणी, रमेश गुंदेचा, विजय चोरडिया, कल्याण कुंकूलोळ, अभय मुथा व सुरेशकुमार गदिया यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आंधळे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, श्री स्थानकवासी जैन संघाच्या वरील विश्वस्तांनी सन 2002 ते 2017 या कालावधित वेळेत हिशोब पत्रके व चेंज रिपोर्ट सादर केले नाही. समाजाने वेळोवेळी मागितलेली माहिती दिली नाही. मनमानी कारभार केला जातो अशी तक्रार प्रविण रिखबदास टाटीया व दीपक हुकूमचंद दुग्गड यांनी केली आहे.तक्रार अर्जावरून धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक वर्षा सुरकुटला यांनी तक्रारीचा चौकशी अहवाल सन 2013 मध्ये सादर केला होता. तक्रारीत तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवून विश्वस्तांनी 1997 पासूनचे हिशोब पत्रके दाखल केलेले नाही. वारंवार नोटिसा पाठवूनही कागदपत्रे सादर केली जात नसलेबाबत अहवाल देऊन गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली होती.अहवालाच्या अनुषंगाने नगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी वेळोवेळी नोटिसा पाठवूनही श्री स्थानकवासी जैन संघाने खुलासा केला नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून विश्वस्तांवर कलम 66 व 67 प्रमाणे फौजदारी कार्यवाही करणेबाबत मागणी केली होती.येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी 24 जुलै 2019 रोजी परवानगी दिली. विश्वस्तांचा कार्यकाल पाच वर्षांचा असून कायद्यानुसार बदल झाल्याच्या तारखेपासून 90 दिवसांत अहवाल सादर करावा लागतो. मात्र 2002 पासून 2017 पर्यंत असा अहवाल वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे विश्वस्त कलम 66 प्रमाणे फौजदारी कायर्र्वाहीस पात्र ठरतात असा निष्कर्ष पुणे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी काढला आहे व कारणे दाखवा नोटीस बजावूनही खुलासा केला नाही.तसेच कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विश्वस्तांवर कलम 66 व 67 प्रमाणे फौजदारी दाखल करण्यास कलम 83 अन्वये परवानगी देण्यात आली त्यानुसार निरीक्षक आंधळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment