
राहुरी(वार्ताहर)- मुळा धरणातून वांबोरी चारीद्वारे पाथर्डी तालुक्यातील पाझर तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज मिरी येथे पोहोचणार असून वांबोरी चारीला पाणी सुरू असेपर्यंत वीज पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, कुठेही लिकेज होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना दिल्या आहेत. या भागातील सर्व तलाव, बंधारे भरल्याशिवाय पाणी बंद करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सकाळी मुळा धरणातून वांबोरी चारीला माजी खासदार प्रसाद तनपुरे, जेऊरचे जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता सायली पाटील, शाखाअभियंता पी. पी. तनपुरे, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे, वांबोरी चारी विद्युत विभागाचे उपअभियंता दिलीप ढिकले, शाखाअभियंता भरत पाटोळे उपस्थित होते.माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी चारीच्या वीज बिलाची माहिती घेऊन वीज बिल भरण्यासाठी शासन 80 टक्के रक्कम देत असून उर्वरित रक्कम ही शेतकर्यांनी भरायची असून लाभधारक शेतकर्यांनी आपली बाकी त्वरित भरून सहकार्य करावे, असे आवाहन केले.कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी तनपुरे यांच्या सूचनांचे पालन करून दखल घेतली जाईल, असे सांगितले. वांबोरी चारीचे आजअखेर 1 कोटी रुपये वीजबिल थकीत असून त्यापैकी 40 लाख रुपये भरण्यात आल्याचे सांगितले.जर 3 पंप 24 तास सुरू राहिले तर महिन्याला 20 लाख रुपये वीजबिल येत असल्याचे सांगितले.धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यातून प्रथम मिरी, मजले चिंचोली, शिराळ, या भागातील तलाव भरण्यात येऊन मग इतर भागात पाणी सोडण्यात येईल. यावेळी केशर पतसंस्थेचे अध्यक्ष सागर तनपुरे, सलीम शेख, साजीद शेख, आर. के. पवार, पी. आर. बाचकर, भाऊसाहेब गुलदगड, राजू गरड उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे हे पक्षाच्या बैठकीसाठी मुंबई येथे गेल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी उपस्थित राहू शकले नसल्याचे समजते.
