June 2025

येवला (प्रतिनिधी ): येथील एसएनडी सीबीएसई संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यांमध्ये क्रिकेट क्लब ऑफ शारदा कोपरगांव (CCS) च्या U-14 आणि U-17 संघांनी प्रभावी खेळ करत दुहेरी विजय मिळवला.दोन्ही संघांनी अनुक्रमे २८ धावांनी आणि ९ गडी राखून विजय मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

U-14 क्रिकेट सामना : शारदा संघाचा २८ धावांनी विजय..


U-14 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शारदा संघाचे नेतृत्व जयदीप दरांगे यांनी केले.

प्रथम फलंदाजी करताना क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने २० षटकांत ९५ धावा केल्या.

फलंदाजीत विहान कसलीवालने १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.सार्थक जाधवने १४ धावा फटकावल्या. हर्षद फुकटेने १० धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत एसएनडी सीबीएसई संघाकडून पार्थ सोनवणे आणि ज्ञानेश्वर पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात एसएनडी सीबीएसई संघ १५.३ षटकांत केवळ ६७ धावांवर गारद झाला.यश पवारने १८ धावा केल्या,तर पार्थ सोनवणेने ११ धावांचे योगदान दिले.शारदा संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने झुकवला. देवासिस मार्कड, हर्षद फुकटे,सार्थक जाधव यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले.

सामना २८ धावांनी जिंकत शारदा संघाने जल्लोष केला.

सामनावीर म्हणून सार्थक जाधव याची निवड झाली,त्याने १४ धावा आणि २ गडी घेत सर्वांचे लक्ष वेधले.


U-17 क्रिकेट सामना : दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीचा दबदबा..


U-17 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई येवला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना एसएनडी सीबीएसई क्रिकेट ग्राउंड,येवला येथे खेळवण्यात आला.

शारदा संघाचे नेतृत्व जय ढाकणे याने केले.एसएनडी सीबीएसई 

 संघाने २० षटकांत १०४/८ अशी धावसंख्या उभारली.शुभम सातारकरने ३६ धावा फटकावल्या तर विजय चव्हाणने १५ धावांचे योगदान दिले.

शारदा संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.विराट घेगडमल व साईराम शेळके यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले तर अर्णव थोरात १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात, क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने केवळ १३.२ षटकांत १०५/१ धावा करत सामना ९ गडी राखून सहज जिंकला.प्रेम कसलीवालने ३८* नाबाद धावा करत संघाचा कणा मजबूत केला.ऋतेश सोनपसारेने ३८ धावांची धमाकेदार खेळी केली.साईराम शेळकेनेही १३* नाबाद धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली.

सामनावीर म्हणून ऋतेश सोनपसारे याची निवड झाली. त्याच्या प्रभावी खेळीमुळे शारदा संघाने हा विजय खेचून आणला.

श्रीरामपूरःगेल्या पंधरा दिवसांपासून बेलापूर येथून बेपत्ता झालेले आणि पोलिसांना शोधण्यात अपयश आलेले व्यापारी रामप्रसाद चांडक यांचा अखेरीस ठावठिकाणा लगला आहे.श्री.चांडक हे धार्मिक पर्यटन करुन नाशिक येथे त्यांचे साडू श्री.करवा यांचेकडे पोहचले आहेत. चांडक कुटुंबिय त्यांना आणणेसाठी नाशिकला रवाना झाले असून चांडक कुटुंबियांनी याबाबत  पोलिसांना अवगत केले आहे.                                        याबाबतची हकीकत अशी की,रामप्रसाद चांडक हे बेलापूरला त्यांचे मुलासोबत मोटार सायकलवर आले.बेलापूरला ते मुख्य झेंडा चौकात उतरले.त्यानंतर ते बेपत्ता झाले.दोन दिवस शोध घेतल्यावरही तपास न लागल्याने चांडक कुटुंबियांनी पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली.त्यानंतरही शोध न लागल्याने व्यापारी तसेच ग्रामस्थांनी पोलिसांनी तपासाला गती देवून चांडक यांचा शोध घ्यावा अशा आशयाचे निवेदन दिले.त्यानंतरही आठवडाभरात पोलिसांना शोध लावण्यात अपयश आले.                             अखेरीस काल शुक्रवारी मध्यराञी श्री.चांडक हे विविध धार्मिकस्थळांना भेटी देवून अखेरीस  नाशिकस्थित त्यांचे साडू सुनील करवा यांचेकडे पोहचले.ते पोहचल्याचे श्री.करवा यांनी किशोर चांडक यांना कळविले.सदरची माहिती मिळाल्यानंतर किशोर चांडक व त्यांचे औरंगाबाद येथील मेहुणे श्री.चांडक यांना आणण्यासाठी नाशिकला गेले.जाताना त्यांनी आम्ही नाशिकला जात असल्याबाबत पोलिसांना अवगत केले.

बेलापूर( प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष व राजकीय नेते इंद्रनाथ  पाटील थोरात यांच्यावर  जो हल्ला झाला त्या संदर्भात दाखल गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण द्वारे, व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून मोठ्या शिताफीने पोलीसांनी किरण रावसाहेब साळवे  वय 34 वर्षे रा. वॉर्ड नं.02 श्रीरामपूर यास ताब्यात घेऊन  अटक केली असुन त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.                 पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी निषेध करून या घटनेत गुन्हा दाखल करावा अशी मागणी  केली होती. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात  यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात इसमा विरुध्द भा द वि  कलम 118(1) 119(1)304(2)115(2)352 351 (2) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे ज्ञानेश्वर वाघमोडे,भारत तमनर रविंद्र अभंग, यांनी तातडीने सूत्रे हलवुन श्रीरामपूर येथील किरण रावसाहेब साळवी यास ताब्यात घेतले त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जुनं पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

नवी मुंबई ( गौरव डेंगळे): २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा, छत्तीसगड येथे २६ ते ३० जून २०२५ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने व नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयोजनातून, कोपरखैरणे येथील क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे यशस्वीरित्या पार पडली.

या निवड चाचणीला नवी मुंबई, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, हिंगोली, पुणे, नाशिक, अमरावती आदी जिल्ह्यांमधून आलेल्या ज्युनिअर व सब-ज्युनिअर गटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले, तर क्राईस्ट अकॅडमी स्कूलचे संचालक फादर जेसन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले.

या निवड प्रक्रियेला महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष कोरडे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिगारम, बालभारती तज्ञ प्रगती भावसार मॅडम, नवी मुंबई सचिव वैभव शिंदे, तसेच अशोक शिंदे, आशिष ओबेरॉय, सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.


राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे :


➡️ ज्युनिअर मुले :

कृष्णा अहिरे, विवेक साळुंखे, प्रसाद महाले, मयूर बोरसे, प्रताप पौळ, अनंत धापसे


➡️ सब-ज्युनिअर मुले :

ईश्वर मोरे, दिव्यांशु चांद, वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, विर पाटील


➡️ ज्युनिअर मुली :

वेदिका बेंद्रे, मृणाली सरवदे, श्रेया सिंग, सृष्टी शिंदे, मान्यता जैन, अंकिता सरगर


➡️ सब-ज्युनिअर मिश्र दुहेरी :

राजवीर भोसले, सोनाक्षी कदम


➡️ ज्युनिअर मिश्र दुहेरी :

शिवम कदम, श्रेया धावन


प्रशिक्षक : उज्वला शिंदे, शिवदास खुपसे, गणेश आम्ले

संघ व्यवस्थापक : निलेश माळवे


बेलापूर (प्रतिनिधी) – बेलापूर ग्रामपंचायतची ट्रॉली बेलापूर पोलीस स्टेशनसमोर उभी असताना, अज्ञात इसमाने या ट्रॉलीच्या  टायरजवळ आग लावून ती पेटविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी निदर्शनास आली असुन पोलीस स्टेशन समोरच ही घटना घडल्याने ग्रामस्थाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

या बाबत माहिती अशी की सकाळी फिरायला जात असताना  कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बेलापूर ग्रामपंचायत ट्रॉली पेटवण्याचा प्रयत्न केल्याची बाब पत्रकार देविदास देसाई यांच्या लक्षात आली. त्यानी पातळीने तातडीने बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांना घटनेची माहिती दिली अभिषेक खंडागळे सरपंच व बेलापूर ग्रामपंचायत कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी आले व त्यांनी बेलापूर पोलिसांना ही माहिती दिली बेलापूर पोलीस स्टेशन समोरच घटना घडून देखील पोलीस अनभिज्ञ होते , ही ट्रॉली बेलापूर ग्रामपंचायतीच्या कामासाठी वापरली जात होती 

   ट्रॉलीचे मोठे नुकसान टळले असले तरी, ही घटना ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण करणारी आहे. बेलापूर पोलिसांच्या दारातच लावलेले वहान जर सुरक्षित नसेल तर इतरांचे काय असा सवाल विचारला जात आहे. ट्रॅक्टरचे नुकसान करणारा इसम हा उक्कलगाव मार्गे बायपास रोडने स्कुटी मोटरसायकल वर आला व स्कुटी बायपासला लावून तो पोलीस स्टेशन समोर उभे असलेल्या ग्रामपंचायतच्या ट्रॉलीजवळ जाऊन त्याने ट्रॉलीचे टायर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सदरील इसम पांढऱ्या रंगाचा रेनकोट घातला होता त्याचबरोबर त्याने तोंड देखील बांधले होते .याचा अर्थ जाणून बुजून त्याने हे कृत्य केले असून पोलिसांनाच एक प्रकारे आव्हानच दिले आहे या बाबत बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मिनाताई साळवी यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला जावून तक्रार दिली . बेलापूरच्या सरपंच साळवी यांच्या तक्रारीवरून सार्वजनिक मालमत्तेचे अज्ञात इसमाने नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी गोमांस विकत असल्याच्या कारणावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसासंमक्ष त्याठिकाणी धाड टाकली असता गोमांस विकणाऱ्यांनी पोलिसा समक्षच बजरंग दल व गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना अरेरवी केली तसेच दोन दिवसापूर्वी गाडीला कट मारल्याच्या संशयावरून उक्कलगाव येथील प्रगतशील शेतकरी खरेदी विक्री देखरेख संघाचे चेअरमन इंद्रनाथ पा.थोरात यांना उक्कलगाव चौकात धक्काबुक्की करण्यात आली.त्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापती झाली असुन त्यांना तातडीने जालना येथील दवाखान्यात न्यावे लागले तसेच गावातील अब्दुल्ला उमर कुरेशी यांची एच एफ डिलक्स ही टु व्हीलर घरासमोरुन चोरुन नेवुन गाडीची तोडफोड करुन साळूंके पेट्रोल पंपासमोर सोमाणी यांच्या शेतांच्या कडेला असलेल्या ओढ्यात सापडली . गाडीचे मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आले असून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ही कुरेशी यांनी केली आहे गावात दोन गटात मारामारी झाली.तेथेही पोलीसासमोरच एका गटाने दुसऱ्या गटाची गाडी फोडली .अशा घटना घडून जर पोलीस बघ्याची भूमिका घेणार असेल न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल विचारला जाता आहे.

हरेगाव (गौरव डेंगळे): हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जागृती आणि योगाचे महत्व पटवून देण्यासाठी शाळेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी विद्यार्थिनींना योग दिनाचे महत्व पटवून देत म्हटले की, “योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची देण आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थिनींनी दररोजच्या दिनचर्येत योगाचा अविभाज्य भाग करावा.”


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास ब्राह्मणे यांनी अतिशय नेटकेपणे आणि उत्साही पद्धतीने केले. विद्यार्थिनींनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमामध्ये क्रीडाशिक्षक नितीन बलराज यांनी योगासने,त्यांची शास्त्रीय माहिती आणि त्याचे शारीरिक-मानसिक फायदे याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वरिष्ठ शिक्षिका विजया क्षीरसागर यांनी योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना सकारात्मक विचारसरणी,मनःशांती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण शाळा प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

बेलापूर, प्रतिनिधी – "श्रीरामपूर व बेलापूर परिसरात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसिंग हा प्रकार औषधालाही उरलेला नाही," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

श्रीरामपूर व बेलापूर परिसरात बाहेरगावचे गुन्हेगार खुलेआम अवैध धंदे चालवत असून, गुटखाबंदी असताना गुटख्याची सर्रास विक्री, अमली पदार्थांची निर्मिती, गोवंश कत्तली यावर पोलिसांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही, असे मुथा म्हणाले.

"बिंगो" नावाने सुरू असलेला जुगार

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर व सोनई परिसरातील गुन्हेगार श्रीरामपूरात "बिंगो" नावाने जुगाराचे अड्डे चालवत असल्याचे मुथा यांनी निदर्शनास आणले.

गुन्हेगारांचा मुक्तसंचार गावठी कट्यांचा वापर, अल्पवयीन मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण, अल्प्राझोलमसारख्या अमली पदार्थांचे तेलंगणाशी असलेले संबंध, यामुळे श्रीरामपूर परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाल्याची टीका त्यांनी केली.

बेलापूर पोलिसांची स्थिती आणखी बिकट

बेलापूर पोलिस औटपोस्टसमोर टोळीयुद्ध होणे, कोल्हार रोडवरील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, झेंडा चौकातील वाहतुकीचा बट्याबोळ, टायर दुकान व व्यापाऱ्याचे अपहरण या सर्व घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुटखा व गोवंश प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका

गुटखा ट्रक प्रकरणात केवळ पंटरांना अटक होऊन प्रमुख आरोपी सुरक्षित राहणे, बेकरीत सापडलेले गोमांस व कोल्हार चौकाजवळ सुरू असलेली गोवंश कत्तल याकडे पोलिसांचे डोळेझाक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजे बंदीचा ठरावही धाब्यावर

ग्रामसभेने डीजे बंदीचा ठराव करून पोलिसांना लेखी कळवले असतानाही गावात खुलेआम डीजे वाजवले जातात. काही लोक माफक शुल्क घेऊन नवीन मिरवणुकांना परवानग्या मिळवत असून, या मिरवणुकांत तरुणांचा उन्माद दिसून येतो, असेही ते म्हणाले.

तक्रारी दडपल्या जातात

"गुन्ह्यांची नोंद न करता तक्रारदारांची बोळवण केली जाते, केवळ तक्रार अर्ज घेऊन प्रकरण झाकले जाते," अशी गंभीर टीकाही मुथा यांनी केली.

नवीन पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षा

नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना जिल्ह्याचा अनुभव असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बेजबाबदारपणा थांबवतील अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य कृतीत उतरावे, हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय असल्याच्या आरोपाने वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत थेट पत्रक प्रसिद्ध करत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून कडव्या शब्दांत इशारा दिला आहे. या पत्रकाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या वतीने स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.


एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षणात बदल करत, पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या निर्णयानुसार मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषा सक्तीची असेल, असे संकेत देण्यात आले होते. सुरुवातीला आलेल्या निर्देशांनुसार तीनही भाषांचे पाठ्यपुस्तक छपाईला गती देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि त्यानंतर अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि भाषाप्रेमींनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त उत्तरेतील काही राज्यांमध्ये बोलली जाते. महाराष्ट्रात तिची सक्ती करण्याचा कुठलाही नैतिक किंवा शैक्षणिक आधार नाही.” त्यांनी शिक्षण विभागावर निशाणा साधत सांगितले की, “सरकारने आधी हिंदी सक्ती करणार असल्याचा अप्रत्यक्ष निर्णय घेतला, नंतर जनमत पाहून गुपचूप मागे फिरलं, मात्र अद्याप त्याचा कोणताही स्पष्ट लेखी आदेश सादर केलेला नाही.” राज ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना उद्देशून आवाहन केले की, “तिसऱ्या भाषेचा शिकवण्याचा निर्णय तुम्ही अंमलात आणू नका. सरकारने अजून स्पष्ट आदेश दिलेले नाहीत आणि तरीही पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार गुप्तपणे ही भाषा लादण्याच्या प्रयत्नात आहे. याला शाळांनी सहकार्य करू नये.”


 जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितले , इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा शिकवण्याचा ताण टाकणे हे शैक्षणिक दृष्टिकोनातून अयोग्य आहे. शिवाय मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा पुरेशा असून, राज्यभाषा म्हणून मराठीचे स्थान अबाधित ठेवणे हीच प्रत्येक शाळेची प्राथमिक जबाबदारी आहे. “हिंदी शिकवली काय, नाही काय, त्याचा उपयोग काहीच नाही. पुढे मुलांना आवश्यक वाटल्यास कोणतीही भाषा ते शिकू शकतात. पण लहान वयात ओझं टाकून सरकार नेमकं कोणतं राजकारण करतंय हे समजायला हवं,” असे ते आपल्या भाषणातून बोलले या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. यामध्ये हिंदी सक्तीविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून शाळांनी सरकारच्या गुप्त हेतूंना पाठबळ देऊ नये, अशी मागणी केली आहे.


मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांनी सांगितले आहे की, “जर सरकारने तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला नसेल तर त्याचा स्पष्ट लेखी आदेश प्रसिद्ध करावा. अन्यथा आम्ही हे सरकारचा डाव समजून विरोध करत राहू.” तसेच, जर शाळांनी सरकारच्या दबावाखाली काम केलं, तर त्याला “महाराष्ट्र द्रोह” समजले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मनसेने या आंदोलनातून स्पष्ट केले आहे की, ही केवळ भाषा शिकवण्याची चर्चा नसून, त्यामागे असलेला ‘सांस्कृतिक कब्जा’ रोखणे ही आपली जबाबदारी आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीमुळे मराठी भाषेचा सायास होत आहे, आणि त्यातच शैक्षणिक पातळीवर हिंदी लादली गेल्यास मराठीचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे.


या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, तालुका संघटक विलास पाटणी,तालुका सचिव भास्कर सरोदे,शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव अभिजीत, शहर सरचिटणीस सचिन कदम, गायकवाड, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी, शहर सरचिटणीस नितीन जाधव, शहर उपाध्यक्ष संदीप विश्वंभर, संदीप पिंटो, लखन कुरे, डॉक्टर प्रसाद पऱ्हे, शहर विभागाध्यक्ष चेतन दिवटे, विनोद शिरसाठ, विद्यार्थी सेना शहर संघटक राहुल शिंदे,

यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत.

कोपरगांव (गौरव डेंगळे):दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.

योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.


त्याचेच औचित्य साधत सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे पतंजली योग पिठाचे योगाचार्य उदय वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० विध्यार्थी आणि शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.

२०२५ सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती – “Yoga for Self and Society” (स्वतःसाठी आणि समाजासाठी योग).

ही संकल्पना फक्त स्वतःच्या आरोग्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करते.


योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा असून, ती नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच संपूर्ण जग या दिवशी योग साधनेसाठी एकत्र येते.

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे, प्राथमिक पर्यवेक्षिका सौ. पल्लवी ससाणे, प्री-प्रायमरी पर्यवेक्षिका सौ. नाथलीन फर्नांडिस तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांसोबत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

खंडाळा (गौरव डेंगळे) : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे आज खंडाळा गावात उत्साहात व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.फुलांनी सजवलेल्या रांगोळ्यांमधून, तसेच भजन-कीर्तनाच्या मंगलध्वनीत संपूर्ण गावाने एकत्र येत दिंडीचे स्वागत केले.

या प्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे यांचा राष्ट्रीय श्रीराम संघ खंडाळा व गावकऱ्यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.यावेळी खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने दिंडीसाठी दुपारच्या जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये आमटी,चपाती आणि भाकरीचा समावेश होता.भाविकांसाठी ही भोजन व्यवस्था अत्यंत प्रेमपूर्वक आणि सुयोग्य पद्धतीने पार पडली.

राष्ट्रीय श्रीराम संघ खंडाळा यांच्या वतीने राजगिरी लाडूंच्या पॅकेटचे वाटप करण्यात आले, जेणेकरून वारकऱ्यांना पोषणमूल्ययुक्त प्रसाद मिळावा.

दिंडीमध्ये सहभागी वारकरी, महिला भक्त मंडळ,तसेच लहान मुलांचे टाळ-मृदंग व भजन पथक यांनी वातावरण भक्तिमय करून टाकले.गावातील युवकांनी वाहतूक व नियोजनामध्ये मोलाची जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. नवनाथ महाराज यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शन करत संत निवृत्तीनाथांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि वारकरी संप्रदायाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.खंडाळा गावातील या स्वागताने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून,परंपरेला साजेसा उत्सव मोठ्या श्रध्देने व प्रेमाने साजरा करण्यात आला.

खंडाळा(गौरव डेंगळे):श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात आज एक ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला, जेव्हा समाजसेवेत अग्रणी आणि युवकांसाठी प्रेरणास्थान असलेले वसंत हंकारे सर यांनी गावाला भेट दिली.

या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय श्रीराम संघ,खंडाळा आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हंकारे सर यांचा भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक,ज्येष्ठ मंडळी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या वेळी हंकारे सर यांनी खंडाळ्यातील युवकांच्या उत्साहाचे आणि सामाजिक भानाचे कौतुक करत सांगितले की,

"प्रत्येक गावात भगवा ध्वज फडकायला हवा.भगवा हा केवळ ध्वज नाही,तो जनतेच्या रक्षणाचा प्रतीक आहे."

त्यांच्या या प्रेरणादायी उद्गारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची आणि समाजसेवेची भावना अधिक तीव्र झाली.हंकारे सर यांनी गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे दर्शन घेऊन त्याच्या निर्मितीमागील संघटित प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.या ध्वजस्थळाने गावातील युवकांमध्ये अभिमान व नवचेतना निर्माण केली आहे.

सरांनी युवकांशी संवाद साधत संघटन,शिस्त,शिक्षण आणि स्वाभिमान या मूल्यांवर भर देत त्यांना समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.खंडाळा गावातील युवकांच्या राष्ट्रनिष्ठ वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या मातीत नवसंस्कार निर्माण होत आहेत," असे गौरवोद्गार हंकारे सरांनी काढले.कार्यक्रमाची सांगता सर्वांच्या मनात प्रेरणादायी ठसा उमटवत झाली.गावासाठी ही भेट एक अभिमानाचा क्षण ठरली असून, युवकांच्या कार्याला यातून नवी दिशा मिळाली आहे.

श्रीरामपूर: दिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा आणि ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन दै. जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांनी केले. श्रीरामपूर येथे माजी मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून दिव्यांगांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संजय साळवे यांच्या कार्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांगांच्या ९९% समस्या मार्गी लागल्या आहेत, असे आगे यांनी नमूद केले. दिव्यांगांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले, तसेच श्रीरामपूर तालुका दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात एक पथदर्शी प्रकल्प ठरत असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात श्रीरामपूर शहरातील सामाजिक जाणीव असलेले निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावला. संजय साळवे अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवत असून, ते दिव्यांगांसाठी देवसमान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील यांनी सांगितले की, मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना राबवली जाईल.

निलेश शिंदे यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, खजिनदार सौ. साधना चुडीवाल, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, राज्य समन्वयक विनोद कांबळे सर, भारत मुक्ती मोर्चाचे सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताकभाई तांबोळी यांनी केले, तर वर्षा गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतुभाऊ मावरे, दिनेश पवार, सतीश साळवे, फिरोज शेख, सागर म्हस्के यांनी विशेष प्रयत्न केले.



पुणे/१७ जून/ गौरव डेंगळे:आलोक तोडकरने महाराष्ट्राचा आणि भारताचा मान अभिमानाने उंचावला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. हे करताना तो महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारा पहिलाच व्हॉलीबॉलपटू ठरला आहे.

भारताचे प्रतिनिधित्व करताना आलोकने अपार कौशल्य, प्रबळ निर्धार आणि उत्कृष्ट संघभावना यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्याच्या असामान्य योगदानामुळे भारताला या स्पर्धेत मानाचे तिसरे स्थान मिळविता आले आणि यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.


आलोकची ही कर्तृत्वगाथा महाराष्ट्रातील असंख्य युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. त्याच्या या यशामुळे तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्हॉलीबॉलची उभरती ताकद आणि क्षमता आलोकच्या या विजयामुळे अधोरेखित झाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे अधिकाधिक भारतीय खेळाडूंना जागतिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग खुला होतो आहे आणि योग्य प्रशिक्षण, समर्थन आणि जिद्द यांच्या जोरावर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ही कामगिरी महाराष्ट्रातील वाढत्या क्रीडा संस्कृतीचा आणि भारतातील दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या बांधिलकीचा उत्तम प्रत्यय आहे. आलोक तोडकरचे नाव महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे आणि त्याने भावी पिढ्यांसाठी नवे मार्ग खुले केले आहेत.

अलोकचे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ मा.पार्थ दोशी, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रतीक पाटील,सचिव श्री.विरल शहा,प्राचार्य डॉ. स्वप्नील विधाते,श्री.शिवाजी कोळी, उपाध्यक्ष भास्कर बुचडे,रेल्वे संघाचे प्रशिक्षक अमेय कुलकर्णी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.अलोकच्या यशामागे फाउंडेशनचे प्रशिक्षक डॉ. संतोष पवार, रोहित मालेगावकर,संदीप भोसले,तसेच संस्थेचे आधारस्तंभ मा.अप्पासाहेब रेणुसे व अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.

बेलापूरःजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे समवेत उपमुख्यकारी अधिकारी  दादाभाऊ गुंजाळ यांनी बेलापूर गावाला भेट देवून मानाच्या निवृत्तीनाथ महाराज यांचे  दिंडीचे नियोजना संदर्भात जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली.                                                       निवृत्तीनाथ महाराज यांची ञंबकेश्वर येथून पंढरपूरला जाणारी दिंडी बेलापूरच्या भानुदास महाराज हिरवे यांनी ३५० वर्षांपूर्वी  सुरु केली.त्यामुळे सदरची दिंडी हि बेलापूर येथे मुक्कामी असते. ज्यांनी दिंडी परंपरा सुरु केली त्या भानुदास महाराज हिरवे  यांच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामाला राहून दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होते.                                                                                             निवृत्तीनाथांची दिंंडी आणि बेलापूरचे दृढ संबंध लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ,गटविकास अधिकारी प्रविण सिनारे,सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के,विस्तार अधिकारी विजय चराटे,दिनकर ठाकरे यांनी जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचेशी दिंडीचे नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी विष्णुपंत डावरे,दिलिप काळे,राजेंद्र लखोटिया,राजेंद्र कर्पे,किरण गंगवाल,संदीप देसर्डा ,जितेन्द्र संचेती,राज गुडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

बेलापूरःराज्याचे जलसंपदामंञी तथा  जिल्ह्याचे पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर ग्रामपंचायतीचा  वृक्ष  वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे.प्रत्येकाने आपला वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा करावा असे आवाहन सौ.धनश्री सुजय विखे पा.यांनी केले.                                                                                           अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाम.श्री.विखे पा.यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण वा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे आवाहन केले होते.त्यास प्रतिसाद देत बेलापूर ग्रामपंचायत,सत्यमेव जयते ग्रुप तसेच बेलापूर-ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सौ.धनश्री विखे पा.बोलत होत्या.सदर कार्यक्रमात वड,पिंपळ,आंबा,टिकोमा,सप्तपर्णी,लिंब,स्पॕथोडीया,बकुळ अशा २००० हजार वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.                                       प्रास्ताविकात श्री.अभिषेक खंडागळे म्हणाले की,बेलापूर-ऐनतपूर  गावांच्या विकासात नाम.श्री.विखे पा.यांचे सततचे व  मोलाचे योगदान आहे. १२६ कोटीची पाणीपुरवठा योजना,साठवण तलाव,घरकुले,विविध समाज घटकांची स्मशानभुमी,क्रिडांगण,सेंद्रिय खत प्रकल्प इत्यादी कामांसाठी नाम.श्री.विखे यांनी ४३ एकर जमिन ग्रामपंचायतीस मोफत दिली आहे.याशिवाय नुकतेच १००१ घरकुलांनाही मंजुरी मिळवून दिली आहे. यात डाॕ.सुजय विखे पा.यांचेही सतत सहकार्य लाभले.                               कार्यक्रमास भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे,बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने,भाऊसाहेब बांद्रे,डाॕ.शंकर मुठे,रामराव शेटे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,जालिंदर कुऱ्हे, रणजित श्रीगोड, अँड.अरविंद साळवी,देविदास देसाई,प्रफुल्ल डावरे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे,भाऊसाहेब कुताळ, साहेबराव मोकाशी,  अरविंद साळवी,शफिक बागवान, सुभाष अमोलिक,बाळासाहेब दाणी, गोरक्षनाथ कुऱ्हे,जनार्दन ओहोळ भाऊसाहेब कुडाळ ,प्रभात कुऱ्हे,विशाल आंबेकर,रमेश काळे,सचिन वाघ, भाऊसाहेब तेलोरे,मोहसीन सय्यद, मोकाशी दादा बंटी शेलार, श्रीहरी बारहाते महेश कुऱ्हे,  सुधीर तेलोरे, गोपी दाणी,आदित्य शेटे, दीपक क्षत्रिय, शफीक आतार, आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


बेलापूरःनागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी तातडीने मिळणे आवश्यक आहे.यादृष्टिने शासकीय योजनांचा लाभ निर्धारित वेळेत मिळावा तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण व्हावा या हेतूने छञपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.आशाप्रकारच्या शिबिरांचे प्रत्येक महसूल मंडलात आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डाॕ.पंकज आशिया यांनी केले.                                               महसूल व वन विभाग तसेच बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथे आयोजित छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना जिल्हाधिकारी बोलत होते.याप्रसंगी  उपविभागीय महसूल अधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नायब तहसीलदार बी.बी.गोसावी,श्री.शेकटकर, श्रीमती निर्मला नाईक,जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,रामराव शेटे,मंडलाधिकारी सर्वश्री विठ्ठल गवारी,सुशीम ओहोळ,तलाठी सर्वश्री राजेश घोरपडे,अक्षय जोशी,श्रीमती सुवर्णा शिंदे,शिल्पा राणे,वर्षा कातोरे, हिमालय डमाळे,अशोक थोरात,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे कोतवाल सुनिल बारहाते नंदू बोंबले अरुण अमोलीक ज्ञानेश्वर भांड संतोष पारखे दिपक बेल्हेकर  उपस्थित होते.                                  सदर शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॕ.आशिया यांचे हस्ते नागरिकांना सेतू कार्यालयाकडील  जातीचे दाखले,संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपञ,पुरवठा विभागाकडील आॕन लाईन पध्दतीचे रेशन कार्ड,ग्रामपंचायत वतीने मृत्यु दाखला, कृषी विभागाकडून खत गोणी,गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरी पञ,ग्राममहसूल अधिकारी कार्यालयाकडील हयातीचा दाखाला आदिं प्रदान करण्यात आले.देविदास देसाई,विष्णुपंत डावरे यांनी सूञसंचलन केले.                                               दिवसभर चाललेल्या महाराजस्व शिबिरात उपस्थितांना विविध शासकीय योजनांचे दाखले, ऑनलाइन रेशन कार्ड,शासकिय प्रमाणपञे,ग्रामपंचायत दाखले अपघात विमा मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले.शिबिरास बेलापूर महसूल मंडलातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.शिबिरस्थानी विविध महिला बचत गटांनी खाद्यपदार्थ,मसाले आदि उत्पादनांचे स्टाॕल लावले होते.शिबिरास भास्कर खंडागळे,  मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,हाजी इस्माईल शेख,मारुतराव राशिनकर, अॕड.अरविंद साळवी,भैय्या शेख,जाकीर शेख,बाबालाल पठाण,महेश कु-हे,प्रभात कु-हे,बाबुराव पवार,चंद्रकांत नाईक, मिलिंद दुधाळ,प्रकाश कु-हे,गणेश बंगाळ,रावसाहेब गाढे,विशाल आंबेकर ,भाऊसाहेब तेलोरे,इस्माइल आतार आदिंसह बचत गटाच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी दिल्ली(गौरव डेंगळे): भारतीय शालेय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल अशी ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. School Games Federation of India (SGFI) च्या या ऐतिहासिक सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील सुपुत्र पार्थ दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही सभा यशस्वी झाली. आपल्या कार्यकुशलतेने व दूरदृष्टीने पार्थ दोशी यांनी महाराष्ट्राचा व देशाचा गौरव उंचावला आहे.


महाराष्ट्राचा सुपुत्र राष्ट्रीय पातळीवर चमकला!!!



सुमारे आठ महिन्यांपूर्वी पार्थ दोशी यांची SGFI च्या कार्यकारी अधिकारी (Executive Officer) पदावर निवड झाली. केवळ अल्पावधीतच त्यांनी महासंघाच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवत महासंघाला नव्या यशशिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वात SGFI ने शालेय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि खेळाडू केंद्रित धोरणे राबवली आहेत.


ऐतिहासिक सामंजस्य करार — निधी संकलनास नवे वळण!!!


SGFI च्या अध्यक्ष श्री. दीपक कुमार (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्थ दोशी यांच्या सक्रिय सहभागातून महासंघाने निधी संकलनासाठी शशक्त डेव्हलपमेंट अँड एम्पावरमेंट फाउंडेशन बरोबर ऐतिहासिक MoU केला आहे. या करारामुळे देशातील नामांकित कंपन्यांच्या CSR प्रकल्पांमधून आणि विविध प्रायोजकांकडून महासंघाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या करारानंतर प्रतिकात्मक स्वरूपात ₹१० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, जो महासंघाच्या शाश्वत विकासाचा नवा अध्याय ठरला आहे.


डिजिटायझेशनद्वारे कार्यपद्धतीत क्रांती!!!


पार्थ दोशी यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी व पात्रता तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता आणली आहे. आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ओळख प्रणालीमुळे खेळाडूंची खरी पात्रता सहज निश्चित होणार असून अपात्रतेला पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे महासंघाच्या कामकाजात विश्वासार्हता, गती आणि सुरक्षितता यामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.


राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना अधिक सुविधा!!!


राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळाडूंना दर्जेदार सुविधा व उत्तम वातावरण मिळावे यासाठी महासंघाने आयोजकांना वित्तीय सहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चांगली निवास व्यवस्था, दर्जेदार आहार, उत्तम मैदान व अन्य सुविधा या सहाय्यामुळे उपलब्ध होतील. यामुळे स्पर्धकांच्या कामगिरीत निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील.


पार्थ दोशी यांची दूरदृष्टी आणि कार्यतत्परता कौतुकास्पद!!!


पार्थ दोशी यांनी केवळ महासंघाच्या यशासाठीच नव्हे तर देशातील लाखो शालेय खेळाडूंना दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.


"शालेय पातळीवरूनच खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा व प्रोत्साहन मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. शाळा हीच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारी पहिली प्रयोगशाळा आहे," असे पार्थ दोशी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.


महाराष्ट्राचा अभिमान — श्रीरामपूरचे भूषण!!!


पार्थ दोशी यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः श्रीरामपूरमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांच्या यशाची दखल विविध क्रीडा संघटना, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व नागरिकांकडून घेतली जात आहे. युवकांनी पार्थ दोशी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन अनेकांनी केले आहे.


🌟 "पार्थ दोशी यांच्यासारख्या तळमळीच्या नेतृत्वामुळेच भारत शालेय क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडवू शकतो."

गौरव डेंगळे/ पुणे/ ८ जून: सेंट्रल एशियन व्हॉलिबॉल चॅम्पियनशिप २०२५ (उजबेगिस्तान) या स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील भारतीय पुरुष व्हॉलिबॉल संघात पुण्याचा अलोक मनोज तोडकर याची निवड झाली आहे. केवळ १६ वर्षांचा असलेला अलोक पुरुष गटात लिब्रो म्हणून निवड होणारा महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी अत्यंत गौरवाची आहे.

अलोकने यापूर्वी दोन वेळा भारतीय संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले होते,मात्र अंतिम संघात निवड होणे हुकले होते.परंतु त्या अपयशाला न जुमानता त्याने सातत्यपूर्ण मेहनत,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात प्रभावी कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

अलोक वयाच्या चौथ्या वर्षापासून पैलवान अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन येथे नियमित सराव करत आहे.लहानपणापासून त्याने या क्लबच्या वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघाच्या सराव शिबिरात स्थान मिळवताना पाहिले आणि त्याच प्रेरणेतून तोही भारतीय संघात स्थान मिळवण्याचा निर्धार करत सरावात गुंतला.

या यशामागे फाउंडेशनचे प्रशिक्षक डॉ. संतोष पवार, रोहित मालेगावकर,संदीप भोसले,तसेच संस्थेचे आधारस्तंभ मा.अप्पासाहेब रेणुसे व अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.अलोकच्या घडणीत प्रीतम जाधव,योगेश कुत्रेह, सुयश पवार,गौरव ब्रम्हे, आदित्य कुडपणे,केशव गायकवाड या वरिष्ठ खेळाडूंचाही मोलाचा वाटा आहे.

अलोकच्या या अभूतपूर्व निवडीबद्दल त्याला शुभेच्छा देण्यासाठी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ मा. पार्थ दोशी,MVA सचिव विरल शाह,

प्राचार्य डॉ. स्वप्नील विधाते, श्री. शिवाजी कोळी, उपाध्यक्ष भास्कर बुचडे,रेल्वे संघाचे प्रशिक्षक अमेय कुलकर्णी,राष्ट्रीय प्रशिक्षक कुलदीप कोंडे,शिवाजी जाधव आदी मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

श्रीरामपूर  : महाराष्ट्र शासन व प्रशासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार  स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग  करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. राज्यातील 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मोठा गाजावाजा करून 1 मे 2025 रोजी सुरू करण्यात आले.परंतु कुठल्याही स्वरूपाचे अधिकार प्रायोगिक तत्वावर  सुरू करण्यात आलेल्या 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तातडीने मंत्रालय व आयुक्त कार्यालाकडे पाठपुरावा करून डी.डि.ओ कोड प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अशी माहिती संजय साळवे अध्यक्ष जिल्हा दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी दिली.

          दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, जीपीएफ,मेडिकल बीले,सेवानिवृत्त कर्मचारी व त्या अनुषंगाने सर्व कामे प्रलंबित होते  ती सर्व मार्गी लागेल.त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या योजना देखील कार्यान्वित होतील.  

         संघटनेने व नासिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री मा.अतुल सावे यांनी तातडीने दखल घेतली. त्यानुसार 4 जून 2025 रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव भा.रा.गायकवाड यांनी तातडीने आदेश निर्गमित केले. दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव मा.भा. रा.गायकवाड यांनी 4 जून 2025 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.दि. 6 जून 2025 रोजी दिव्यांग  कल्याण विभागाचे आयुक्त यांनी 13 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित अहवाल  पाठविण्याचे आदेश दिले आहे.

         सदर आदेशामुळे 13 जिल्ह्यातील कर्मचारी व दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेआहे.दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहिल्यानगर यांचे सर्वांनी विशेष आभार मानले. आहे.याकरिता संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे,उपाध्यक्ष चांगदेव खेमनर,खजिनदार प्रदीप भोसले,श्रीरामपूर मूकबधिर  विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी,नागनाथ शेटकर,रमेश टिक्कल,ज्ञानदेव जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

अहिल्यानगर,(४ जून/गौरव डेंगळे):

अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांवरील वयोगटासाठी भव्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा दिनांक ६ व ७ जून २०२५ रोजी दोन प्रमुख ठिकाणी पार पडणार आहेत — कराळे हेल्थ क्लब, सावेडी आणि वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहिल्यानगर.


स्पर्धेतील खेळ प्रकार:


या उत्सवामध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि पोहणे (स्विमिंग) या प्रमुख खेळांचा समावेश असून, खेळाडूंमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.


स्पर्धेतील सहभागी संघ:


ही स्पर्धा चार संघांमध्ये खेळवली जाणार आहे. त्या संघांची नावे आणि प्रमुख खेळाडू पुढीलप्रमाणे:



🟢 रायगड किंग्स


प्रमुख खेळाडू:

सतीश गायकवाड, घनश्याम सानप, प्रमोद आठवाल, शैलेश गवळी, कृष्णा लांडे, प्रशांत गंधे, बंटी गुंजाळ, सतीश झेंडे, विजुभाऊ मिस्कीन, पुरोहित सर, अजय पवार, संतोष घोरपडे, सचिन तिवारी, वैभव पवार



🔵 राजगड कॅपिटल


प्रमुख खेळाडू:

संदेश भागवत, संतोष ठाणगे, विल्सन फिलिप्स, अनिल भापकर, सचिन पठारे, डेविड माकासरे, किशोर गांधी, गणेश तलवारे, सोमानी सर, संतोष वाबळे, शब्बीर सर, प्रशांत कोळपकर, जयंत जाधव, संतोष गाडे



🔴 प्रतापगड वॉरियर्स


प्रमुख खेळाडू:

डॉ. विजय म्हस्के, विशाल गर्जे, मोहित भगत, रामेश्वर सर, रोनक फर्नांडिस, दिनेश भालेराव, निलेश मदने, संजय साठे, विजय पवार, कुलकर्णी सर, शंतनू पांडव, महेश पटेकर, सचिन जावळे, प्रशांत निमसे, विनायक भूतकर



🟡 सिंहगड लायन्स


प्रमुख खेळाडू:

सुनील गोडळकर, विकास परदेशी, संजय पाटील, मुकुंद काशीद, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर खुरांगे, अविनाश काळे, प्रदीप पाटोळे, कल्पेश भागवत, अजय बारगळ, सचिन सप्रे, प्रवीण कोंडावळे, दिनेश मोरे, हेमंत कुलकर्णी, सचिन गायकवाड



पंचमंडळी (रेफरीज):


या स्पर्धेसाठी पंच म्हणून मनीष राठोड, अमित चव्हाण, शदाब मोमीन आणि हर्षल काशीद हे जबाबदारी पार पाडणार आहेत.



ही स्पर्धा का खास?


४० वर्षांवरील वयोगटातील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानी स्पर्धेचा अनुभव मिळणार आहे.


फिटनेस, खेळातील शिस्त, सामाजिक स्नेह यांचा संगम असलेली ही स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.


निवृत्तीनंतरही सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम!


उद्घाटन व समारोप:


या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन व समारोप सोहळे प्रमुख क्रीडा अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्हे व संघांना सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा एक प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण करणार असून, वयोमानानुसारही 'खेळ भावना' अमर आहे हे दाखवून देणारी ठरेल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget