एकनाथ नागले यांनी सापडलेली एक तोळ्याची अंगठी केली प्रामाणिकपणे परत
बेलापूर /(प्रतिनिधी)- येथील दुकानासमोर पडलेली एक तोळ्याची अंगठी बेलापूर येथील मिठाई व्यापारी एकनाथ नागले यांनी प्रामाणिकपणे ग्राहकास परत केली असून नागले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की बेलापूर खुर्द येथील अमोल रामनाथ पुजारी यांचे नातेवाईक संतोष दामू शिंदे व सुनील नामदेव शिंदे राहणार संगमनेर हे काही कामानिमित्त बेलापूर येथे आले होते आपले काम आटोपल्यानंतर ते बेलापूर येथील एकनाथ नागले यांच्या श्री बालाजी स्विट गोडीशेव रेवडी या दुकानात गेले त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले या दुकानात होत्या संतोष व सुनील शिंदे यांनी नागले यांच्या दुकानात गोडीशेव व रेवडी फरसाण विकत घेतली. घेतलेल्या मालाचे पैसे देण्याकरता त्यांनी खिशातून पैसे काढले त्याच वेळेस त्यांच्या खिशात असलेले अंगठी देखील खाली पडली ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. पैसे देऊन ते निघून गेले. त्यानंतर सौ शैलाबाई नागले यांना त्यांच्या दुकानासमोर एक अंगठी पडलेली दिसली त्यांनी ती उचलून पती एकनाथ नागले यांच्याकडे दिली. ती अंगठी सोन्याची असल्याचे नागले यांच्या लक्षात आले व आपल्या दुकानावर नुकतेच आलेले ग्राहक यांचीच ती पडली असावी अशी शंका त्यांना आली व काही तासाने शिंदे बंधु देखील या ठिकाणी येऊन अंगठीची विचारपूस करू लागले. ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी नागले यांनी त्यांना सांगितले की काळजी करू नका तुमची अंगठी येथेच पडली होती आणि ती व्यवस्थित आहे त्यानंतर त्यांनी याबाबत बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांना कल्पना दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांच्या हस्ते ती एक तोळ्याची सोन्याची अंगठी मूळ मालक संतोष दामू शिंदे यांना देण्यात आली. बेलापूर येथील प्रसिद्ध हलवाई श्री एकनाथ नागले व त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे