अभियंत्याचा कारभार अंगलट मंत्रालयात कार्यकारी अभियंत्यांविरोधात तक्रार,सीईओंकडून झाडाझडती.
नाशिक प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांनी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची फाईल अडवणे झेडपीच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी अध्यक्ष झिरवाळ यांनी थेट मंत्रालयात बैठक बोलवली आहे.बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता कंकरेज कार्यालयात येत नाहीत, फाईली काढत नाही, पंचायत समितीत बसून कामकाज करतात, सदस्यांसह लोकप्रतिनिधींचे मोबाईल घेत नाही अशा तक्रारी अभियंत्याविरोधात सुरू आहेत. यातच एका ठेकेदाराची अन् विभाग एकच्या कार्यकारी अभियंता यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यातच विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील फाईलीही कार्यकारी अभियंत्यांने अडविल्यात.या फाईली काढण्यासाठी स्वतः झिरवाळ यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना केल्या. मात्र, त्यांच्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष झिरवाळ यांनी थेट मंत्रालयात कार्यकारी अभियंत्यांविरोधात तक्रार केली. या तक्रारींची दखल घेत, मंत्रालयात तातडीने सोमवारी बैठक लावण्यात आली आहे. दिंडोरी व पेठ तालुक्यातील विविध विकास योजनांचा आढावा बैठकीत होणार असला तरी, कार्यकारी अभियंत्यांच्या तक्रारींवरूनच ही बैठक होत असल्याचे बोलले जात आहे.सीईओंकडून झाडाझडती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंते व कार्यरत कर्मचार्यांबाबत ठेकेदारांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दखल घेत दोन्ही कार्यकारी अभियंत्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये, अन्यथा कारवाई करण्याची तंबीही त्यांनी दिली असल्याची चर्चा आहे.अजूनही वेळ गेलेली नसल्याने कामकाजात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगतानाच तसे झाले नाही तर बांधकाम विभागाची प्रत्येक फाईल तपासावी लागेल, असा सज्जड दमही त्यांना भरला. यावर अभियंत्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांनाही लक्ष घालण्याची सूचना बनसोड यांनी केल्याचे समजते.