आळेफाटा प्रतिनिधी- जुन्नर येथे परप्रांतीय मजुराचा खून करून पसार झालेल्या खुनाच्या आरोपीने अहमदनगर मध्ये आसरा घेतला होता. तब्बल एक वर्षांनी आरोपीला दारूच्या अड्ड्यावर जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. सुधीर चंपालाल जाधव (वय 38) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की, आळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत 3 मार्च 2021 रोजी मोहनसिंग ननहकसिंग (वय 40, रा. आणे ता.जुन्नर व मुळ गाव मुरमा थाना मेदीनीनगर सतबरवा पलामु राज्य झारखंड) याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा ब्लॉक ने मारहाण करून गंभीर जखमी करत ठार केले होते. याबाबत आळेफाटा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हाचा तपास पोलिसांनी सुरु केला असता संशयित आरोपी सुधीर चंपालाल जाधव (वय 38, राहणार विळद जि. अहमदनगर मुळ गाव आरंडगाव, ता.संगमनेर) हा गुन्हा घडल्यापासुन आळेफाटा परिसरातून एक वर्षांपासून गायब झाला होता. त्याच्या गावी दहा ते बारा वेळा पोलिसांनी तपास केला असता मिळून आला नाही.दरम्यान संशयित आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी ठिकाणी लपून रहात असल्याची माहिती गुप्त खबर्यांकडुन मिळाल्यानंतर पोलिसांनी वेषांतर करून जवळपास चार दिवस या ठिकाणी शोध घेतला असता आरोपी दारू पिण्यासाठी एम.आय.डी.सी. परीसरातील देशी दारूच्या दुकानावर आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आळेफाटा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, लहानु बांगर, अमित वाळुंजे यांनी ही कामगिरी केली.
Post a Comment