जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी श्रीरामपूरला भेट.
श्रीरामपुरातील प्रभाग दोनमधील वाढती करोना रुग्णसंख्या पाहता परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी श्रीरामपूरला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ज्या भागात करोनाचे रुग्ण सापडतात तो भाग कडेकोट बंद करून सर्व नियमांची कडक अंमलबजावणी करावी व जास्तीत जास्त लोकांची आरोग्य तपासणी करावी अशा सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.श्रीरामपुरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच प्रभाग दोनमधील ज्या भागात रुग्ण सापडतात तो भाग अत्यंत अरुंद व सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास अवघड असा आहे.त्यामुळे सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी मंगळवारी श्रीरामपूरला भेट दिली. त्यांनी प्रभाग दोन, डेडीकेटेड कोव्हिड सेंटर (सेंट लुक रुग्णालय), कोव्हिड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अनिल पवार, अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, मसुद खान, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रभाग दोनमधील प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक गल्ली पत्रे लावून बंद करावी, या भागातून कोणीही बाहेर जाणार नाही व या भागात कोणीही आत जाणार नाही याची कडक अमंलबजावणी करावी. या भागातील सर्व दुकाने कडेकोट बंद राहतील याची दक्षता घ्यावी. या भागातील लोकांना किराणा किंवा इतर अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी नगरपालिकेने नियोजन करावे.ज्या क्षेत्रात करोनाचे रुग्ण सापडतात त्या भागातील लोकांची आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी करावी. गरज वाटल्यास स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठवावेत. यावेळी तपासणीसाठी कीट अपूर्ण असल्याचे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले. त्यावर श्रीरामपूरसाठी दररोज शंभर किट उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.