Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी, प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील अंदाजपत्रकाची रात्र गणली जाणारी शबे बारात गुरुवारी रात्री साजरी होणार असून यावेळी ही रात्र सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी आपल्या घरात साजरी करावी . कबरस्थानात कोणीही जाऊ नये असे आवाहन जामा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना मोहम्मद ईमदादअली जियाई यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे .
शबे बारातच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता मौलाना ईमदादअली यांनी सांगितले की कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज आपला देश आणि संपूर्ण जग संकटात सापडले आहे . हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे आवश्यक आहे . शबे बारातच्या रात्री सर्व मुस्लिम बांधव कबरस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर चादर चढवून तेथे दुआ करतात .मात्र यावर्षी कोरोनामुळे कोणीही कब्रस्तानात किंवा मशिदीत जाऊ नये . मशिदीत होणारे प्रवचन, मिलाद पठण आणि कबरस्थानात जाण्याचे आणि तेथे होणारे सर्व उपक्रम यावर्षी स्थगित करण्यात आले असून सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी गुरुवारी शबे बारातच्या रात्री आपापल्या घरातच नमाज पठण, कुराण पठण, अल्लाहचे नामस्मरण करावे आणि घरातूनच आपल्या पूर्वजांसाठी दुआ करावी . कुणीही बाहेर निघू नये . अहले सुन्नत वल जमातच्या कोणत्याही मशिदीमध्ये शबे बारात ची नमाज होणार नाही. या निमित्ताने दरवर्षी होणारे कोणतेही उपक्रम या वर्षी होणार नाहीत . सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीती आणि काळजीचे वातावरण आहे . प्रशासन याकामी जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र राबत आहे . प्रशासनाला सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी सहकार्य करावे व स्वतःचाही बचाव होण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये . शबे बारातची सर्व प्रार्थना घरातच करावी . आपल्या घरातील मुलाबाळांना सुद्धा बाहेर पडू देऊ नये असे आवाहनही मौलाना ईमदादअली यांनी केले आहे .
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात प्रार्थना करून कोरोनापासून मुक्तीसाठी दुवा करावी . कुणीही बाहेर पडू नये .कब्रस्तानातील आपल्या पूर्वजांसाठी आपल्या घरातूनच दुआ करावी असे आवाहन जमेअतुल उलेमा ए हिंद चे जिल्हाध्यक्ष मौलाना मोहम्मद इर्शादुल्लाह कास्मी यांनीही केले आहे .त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि आपले राज्य, देश आणि जग कोरोनाच्या भीषण संकटात सापडले आहे . अशावेळी प्रत्येक नागरिकाने स्वतःचा बचाव करून शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे . प्रशासनाला सहकार्य करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे . तरी शबेबारातच्या रात्री कोणीही घराबाहेर न पडता घरात प्रार्थना करावी तसेच एका ठिकाणी फार लोकांनी एकत्र येऊ नये . सामाजिक अंतराचे भान ठेवून वैयक्तिकरित्या सर्वांनी आपली प्रार्थना करावी आणि परिस्थितीला सामोरे  जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे .
शहरातील सर्व मशीदींच्या मौलानांनी शबे बारातच्या रात्री मशिदीतून गर्दी होऊ देऊ नये . भाविकांना याबाबत योग्य असे मार्गदर्शन करून आपल्या घरात प्रार्थना करण्यासंदर्भात जागृती करावी असे आवाहन जामा मशिदीचे विश्वस्त शेख शकूर ताजमोहम्मद,डॉक्टर राज शेख, तन्वीर रजा,मदर्सा रहमत ए आलम चे विश्वस्त नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, उस्मानिया मशिदीचे विश्वस्त रज्जाकभाई पठाण, गफूर शाह,रफिक शाह,शेख खलील पिरमोहम्मद,मक्का मशीदीचे विश्वस्त नजीर मुलानी, निसार भाई कुरेशी, जलालुद्दीन पिरजादे, गौसिया मशिदीचे बाबूभाई मुस्तकीम कुरेशी,तसेच मुफ्ती अतहरहसन रिझवी,हाफिज अब्दुल हमीद, हाफिज मोहम्मद जोहरअली आदींनी केले आहे .

बुलढाणा - 8 एप्रिल
ज्ञानगंगा अभयारण्यातील वन व वन्यजीवांचे संरक्षण करणार्‍या अकोला वन्यजीव विभागाच्या वन कर्मचाऱ्यांनी आज बुधवारला ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमधून कोरोना विषाणु बाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेला आहे.या अभयारण्यात बिबट,अस्वल,तडस सारखे हिंस्र प्राणी आहेतच तर आता पट्टेदार वाघाने ही या अभयारण्याला आपले अधिवास बनवले आहे
त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर अधिक जवाबदारी वाढलेली आहे. सद्या उन्हाळ्याच्या काळात सर्व वन कर्मचाऱ्यांवर वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था करणे, सर्व पाणवठ्यांची देखरेख करणे, जंगलाला वणवा लागू नये यासाठी फायर लाईन मारणे, वणवा प्रतिबंध करण्याचे विविध कामे सोबतच या काळात वन्यजीवांच्या शिकारी होण्याची जास्त शक्यता असते तेव्हा त्याला प्रतिबंध करण्यासाठी दिवस रात्र गस्तीचे काम सुरु आहे.या कामांसोबतच सद्या कोरोनाचे संकट पाहता जंगलालगतच्या गावांमधून कोरोनाबाबत वन्यजीव विभागा मार्फ़त जनजागृती करण्यात येत आहे. एका वाहनावर लाऊडस्पीकर लावून त्या द्वारे गावातील प्रत्येक गल्लीतून फिरून लोकांना कोरोना बाबत जनजागृती करीत आहे व लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे, वनपाल गीते, वनरक्षक चव्हाण, गवई व सर्व वन मजूर यांनी आज देव्हारी व गोंधनखेड गावांमध्ये जावून जनजागृती केली व लोकांना जंगलात ना जाण्याचा सल्ला ही दिला.वन कर्मचारी व मजूराना मास्कचे वाटप करण्यात आले.

बुलडाणा - 7 एप्रिल
मोताळा तालुक्यातील परडा गावा जवळ सुरु असलेल्या जुगार अड्डयावर बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने आज मंगळवारी छापा मारून 8 जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. त्यांच्या कब्जातून रोख रकमेसह 6 दुचाकी, 6 मोबाईल असा एकूण 2 लाख 26 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.एकी कडे संपूर्ण देश कोरोनाच्या धासकीत असतांना या जुगाऱ्यांचे खेळ चालत होते.
        मोताळा तालुक्यात बोराखेडी ठाणे अंतर्गत येत असलेले परडा शिवारातील हॉटेल ग्रीनपार्कच्या मागील शेतात टिनशेडमध्ये पैशांच्या हारजीतवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या कैलास दत्तात्रय सरोदे (रा. बोराखेडी), गजानन गोविंदा पाटील (रा. तिघ्रा), विवेक उर्फ पिंटू पांडुरंग सुरडकर (रा. मोताळा), राजेश पांडुरंग कांडेलकर (रा. मोताळा), अनिल भाऊलाल जैन (रा. मोताळा), शिवाजी बाबाराव जोहरी (रा. कोथळी), निंबाजी राजाराम चहाकर (रा. बोराखेडी), भगवान सदाशिव जवरे (रा. परडा) या 8 जुगाऱ्यांना पोलिसांनी छापा मारून आज दुपारी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून नगदी 21 हजार शंभर रुपये, सहा मोबाईल किंमत 30 हजार 500 रुपये, सहा दुचाकी किंमत 1 लाख 75 हजार रुपये व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 26 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहेकाँ सुधाकर तारकसे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त 8 जुगाऱ्याविरुद्ध कलम 12 (अ) मु.जु.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ सुधाकर तारकसे, नापोकाँ विलास पवार, नापोकाँ मोहन डुकरे, पोकाँ सतीश राठोड यांनी केली. पुढील तपास बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ राजेश वानखेडे, पोकाँ शिवाजी मोरे करीत आहेत.

शिर्डी ।जितेश लोकचंदानी। ।।।निवासी संपादक।
      सध्या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊनलोड आहे, शिर्डीत सर्वत्र बंद आहे, अशा परिस्थितीत कोरोना चा संसर्ग होऊ नये किंवा या आजाराला बळी पडू नये म्हणून शिर्डीकर घराघरात बसून आहेत, अशा शिर्डी करांना मात्र नगरपंचायतकडून सध्या दूषित पाणीपुरवठा  होतआहे, आजच सकाळी नगरपंचायतीने केलेल्या पाणीपुरवठा मध्ये काही वार्डातील अनेक कुटुंबांना कचरा व आळ्या आल्याने या नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे, यापुढे असे होऊ नये अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे शिर्डी अध्यक्ष समीर वीर यांनी केली असून जर नगरपंचायतने यामध्ये त्वरित सुधारणा व दखल घेतली नाही व शुद्ध पाणीपुरवठा केला नाही तर नगरपंचायत समोर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला असून राहता तहसीलदार, पोलीस निरीक्षक शिर्डी व शिर्डी नगरपंचायतला त्यांनी तसे निवेदन पाठवले आहे,
      शिर्डी हे आंतराष्ट्रीय तीर्थस्थान आहे, येथे शिर्डी नगर पंचायतीने लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना यापूर्वीच राबवलेली आहे, शिर्डीकरांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे, असे असताना व सध्या कोरोना मुळे लोक कामधंदा,व सर्व काही सोडून घरात आहेत , कोरोना चे संकट मोठे आहे, मात्र अशा संकट समयी सुद्धा शिर्डी नगर पंचायतीने आरोग्याच्या दृष्टीने अधिक लक्ष देणे गरजेचे असताना येथे मात्र सध्या दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिका कडून नगरपंचायत विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे,
 आज पहाटे येथील काही वार्डात शिर्डी नगरपंचायत ने पाणीपुरवठा केला, मात्र नळाला आलेल्या या पिण्याच्या पाण्यामधून कचरा व आळ्या सुद्धा आल्या, पिण्यासाठी नागरिकांना हे अशुद्ध, दूषित पाणी विविध आजारांना  कारण ठरू शकते, सध्या देशात, राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे, अशात येथे  दूषित पाणी जर पिण्यासाठी नळाद्वारे घराघरात आले, व हे  पाणी पिण्यासाठी वापरले गेले, तर मोठी आरोग्याची समस्या येथे निर्माण होणार आहे, शिर्डी नगरपंचायत पाणीपुरवठा साठी लाखो रूपये खर्च करते, स्वच्छतेच्या बाबतीत  शिर्डीला देशात  तिसरे व राज्यात दुसरे बक्षीस मिळाले आहे,  असे असतानासुद्धा असा अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा नागरिकांना नळाद्वारे होत असेल व या दूषित पाण्यामुळे जर शिर्डीतील नागरिक विविध आजारांना बळी पडले तर कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांना ते मोठे धोकादायक व मोठे आपत्ती जनक परिस्थिती निर्माण करणारे ठरणार आहे ,याकडे शिर्डी नगरपंचायतने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे, सध्या लोक कामा धंदा विना घरात बसून आहेत, पैशाची अडचण आहे, खाण्यापिण्याची ही मोठी अडचण आहे, शिर्डीत अनेक लोक गरीब आहेत, कोरोनामुळे सर्व शिर्डी करांच्या आरोग्याची दक्षता, काळजी व खबरदारी घेण्याचे काम नगरपंचायतीचे असतानाही अशा अशावेळी ही येथील लोकांना असा दूषित पाणीपुरवठा केला गेला व ते आजारी पडले तर त्याला जबाबदार कोण ।।असा प्रश्न काही वॉर्डातून नगरपंचायतला विचारला जात असून शिर्डी नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी यांनी त्वरित याकडे लक्ष द्यावे, अन्यथा नगरपंचायत समोर परवापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल व याला जबाबदार शिर्डी नगरपंचायत राहील, असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे शिर्डी अध्यक्ष समीर वीर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे व त्यांनी हे निवेदन राहता तहसीलदार शिर्डी पोलीस स्टेशन व नगरपंचायत ला पाठवले आहे.

ज्ञानेश गवले, अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्यात आज २५ वा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
अँकर-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून जामखेड, नेवासा, अहमदनगर, संगमनेर आणि राहाता तालुक्यानंतर आज श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन या खेडे गावात शेतकरी कुटुंबात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी दिली.
आज आढळून आलेला कोरोना बाधित रुग्ण हा शेतकरी कुटुंबातील मतिमंद तरुण असून सध्या तो पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला चक्कर आल्यानंतर उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तो प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे संशयित म्हणून त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला होता. तो आता पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २५ वर पोहोचली आहे.
ही माहिती मिळताच उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसंत जमधडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आदींनी गोवर्धन गावाला भेट देऊन माहिती घेतली. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण दहा व्यक्तींना ताब्यात घेऊन अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. तसेच तो खेड्यातील शेतकरी असून त्याचा कोणाकोणाशी संपर्क आला याचीही माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
दरम्यान जिल्ह्यात आजूबाजूला कोरोनाचे  रुग्ण रोज आढळून येत असताना आता श्रीरामपूर तालुक्यात पहिला रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सुरक्षितता म्हणुन घरातच थांबावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर् येथे कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली असून त्यामुळे पुढील दक्षता घेण्यासाठी तातडीने पावले उचलून हरिगाव व उन्दिरगाव ग्रामपंचायत वतीने दि ६ एप्रिलपासून ९ एप्रिलपर्यंत कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्ण हरिगाव उन्दिरगाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व रस्ते गावात येण्यासाठी व जाण्यासाठी गल्ली बोला नाकाबंदी करून बंद करण्यात आले आहेत.अशी  माहिती सरपंच सुभाष बोधक उपसरपंच रमेश गायके,व दीपक नवगिरे यांनी दिली.गोवर्धन येथील व्यक्ती मतीमंद असून त्याला ४ तारखेला फीट आली.त्याला लोणी येथे नंतर विळद घाटात विखे फौन्डेशन व नंतर पुणे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले.हा अहवाल मिळताच प्रांताधिकारी अनिल पवार,,तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तातडीने पुढील पावले उचलली आहेत.श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने औषध फवारणी मशीन दिल्यानंतर हरिगाव पूर्ण बाजारपेठेत औषध फवारणी केली.तसेच प्रांताधिकारी,अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील,,वैद्यकीय अधीक्षक वसंतराव जमधडे,खान,तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे,आदींनी भेट दिली व दक्षतेच्या सूचना दिल्या.सध्या एक प्रकारचे कोरोना नावाचे महायुद्ध असून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वत्र लॉक डाऊनचे आदेश दिले आहेत.त्यासाठी शासकीय दवाखाने, डॉक्टर,पोलीस प्रशासन,आरोग्य अधिकारी,नगरपालिका,आदी कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी विशेष कार्य करीत आहेत.अशा परिस्थितीत कोठेही घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना नागरिकांना ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी ध्वनिक्षेपकाव्दारे देण्यात  आल्या आहेत.त्यास सर्व नागरिकांनी सहकार्य करावे..

शिर्डी / राहाता (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना जाहीर केलेल्या असताना राहाता तालुक्यातील शिर्डी, राहाता, कोल्हार, बाभळेश्वर, पुणतांबासह प्रमुख महसूल भागात काही धान्य पूरवठादारांनी मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालविला आहे. संचारबंदी असताना ऐन संकटाच्या काळात जनतेची लूट करून वेठीस धरणे म्हणजे म्रुतांच्या टाळूवरचे लोणी खाणे... या पापात सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर अचानक अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ पाटील सदाफळ व समीरभाई बेग यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे नागरिकांना जमावबंदी, संचारबंदीला सामोरे जाणे अनिवार्य झाले आहे. हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे तसेच शेतीपूरक उद्योग क्षेत्रातील कामगार यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राहाता तालुक्यातील रोजगाराचे मूख्य 'केंद्र' म्हणून ओळखली जाणारी शिर्डी पूर्णपणे ठप्प झाली असल्याने तालुक्यातील हजारो कुटुंबाना मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहाचे गणित सोडवणे अवघड झालेले आहे. यासाठी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत परंतु या सरकारी योजनांचा लाभ वंचितांना मिळण्यात अडचणी उभ्या करणारी काही जणांची साखळी उभी ठाकल्याने  पूरता बोजवारा उडाला आहे. यात काही रेशनपुरवठादार व किराणा माफियांनी संघटीतपणे नागरिकांना वेठीस धरले असल्याने संचारबंदी च्या या कडक काळात कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या  'लॉकडाऊन'चा गैरफायदा काही अपप्रवृत्ती घेताना दिसतात. घराच्या
बाहेर पडल्यास 'कोरोना' चा विषाणू आणि पोलिसांचा मार यामुळे अगोदरच जनता भयभीत झाली आहे.
बेकायदेशीरपणे अन्नधान्य, किराणा माल यांचा साठा करणारे व चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांची तत्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर 'लॉकडाऊन' अधिनियमात गुन्हे दाखल करावेत जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल.
अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ पाटील सदाफळ व समीरभाई बेग यांनी दिला आहे. याबाबतीतचे निवेदन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविण्यात आल्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget