अँकर-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून जामखेड, नेवासा, अहमदनगर, संगमनेर आणि राहाता तालुक्यानंतर आज श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन या खेडे गावात शेतकरी कुटुंबात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी दिली.
आज आढळून आलेला कोरोना बाधित रुग्ण हा शेतकरी कुटुंबातील मतिमंद तरुण असून सध्या तो पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला चक्कर आल्यानंतर उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तो प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे संशयित म्हणून त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला होता. तो आता पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २५ वर पोहोचली आहे.
ही माहिती मिळताच उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसंत जमधडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आदींनी गोवर्धन गावाला भेट देऊन माहिती घेतली. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण दहा व्यक्तींना ताब्यात घेऊन अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. तसेच तो खेड्यातील शेतकरी असून त्याचा कोणाकोणाशी संपर्क आला याचीही माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
दरम्यान जिल्ह्यात आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण रोज आढळून येत असताना आता श्रीरामपूर तालुक्यात पहिला रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सुरक्षितता म्हणुन घरातच थांबावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment