Latest Post

बुलडाणा- 21 नोव्हे
रस्ता सुरक्षा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. रस्त्यांवरील अपघातामध्ये जिल्ह्यात ऑक्टोबर अखेर 270 जणांनी आपले प्राण गमविले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व अन्य निर्माणाधीन रस्त्यांवर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी दुरूस्ती, खड्डे बुजविणे, सुरक्षा नियमांची व्यवस्था करावी. रस्ता सुरक्षेप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित यंत्रणाप्रमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती प्रमुख डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
       जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांना सातत्याने गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवर असलेला विषय आहे. या विषयाशी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने काम करायला पाहिजे. समिती कामकाजासंबंधित अहवाल, अपघात घडल्यानंतर देण्यात येणारा संयुक्त अहवाल विनाविलंब सादर करावेत. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर संबंधित यंत्रणेने नियंत्रण ठेवावे. काम सुरू असताना नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंत्राटदार काम करीत नसल्यास देयकांची अदायगी थांबवावी.
     रस्ता काम सुरू असलेल्या यंत्रणांनी दर आठवड्याला सदर रस्ता कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी मलकापूर ते खामगांव रस्ता कामाचे सुधारीत निवीदा होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे फलक लावावेत. मेहकर फाटा ते चिखली शहर रस्त्‌याचे काम गतीने पुर्ण करावे. कंत्राटदराने विहीत कालमर्यादेत दर्जेदार काम करून रस्ता पुर्ण करावा. याप्रसंगी संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार व यंत्रणांवर रस्ता कामांबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीत रस्तानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- दुसर्याच्या घरात डोकावणे एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला चांगलेच महागात पडले असुन बेलापूरच्या बाजारपेठेत सकाळी सकाळी झालेल्या भांडणाची गावात चांगलीच चर्चा चालू आहे             गावातील भाजपा पदाधिकार्याच्या घरात कुरापती करण्याचा प्रयत्न एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला घरातील आर्थिक व्यवहारा विषयी त्याने भाजपा पदाधिकार्याच्या घरच्यांना फोनवर सांगितले  यावरुन भाजपा पदाधिकार्याच्या घरात वाद निर्माण झाले या वादास कारणीभूत गावातीलच काँग्रेसचा तो कार्यकर्ता असल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कार्यकर्ता सापडला नाही अखेर आज सकाळीच तो कार्यकर्ता बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत आल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने आमच्या घरात भांडणे लावतोस काय अशी विचारणा करुन त्या कार्यकर्त्याची चांगलीच धुलाई केली कशी बशी सुटका करुन त्या कार्यकर्त्याने तेथुन पळ काढला या वेळी मोठा जमाव जमा झाला होता

शेवगाव : तालुक्यातील वडूले बुदूक येथे आपल्या मित्राचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.या पैकी एकाचा मृतदेह सोमवारी (१८ नोव्हेंबर) रात्री उशिरा तर दुसऱ्याचा मृतदेह मंगळवारी (१९ नोव्हेंबर) आढळून आला. रणजित नंदू काते (वय ३४) व अमृत रघुनाथ चोपडे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील रणजित काते हा तरुण रविवारीपासून (१७ नोव्हेंबर) घरातून बेपत्ता होता. या संदर्भात त्याचे सासरे महादेव भारस्कर (रा. रामनगर, शेवगाव) यांनी पोलिसांत जावई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. मात्र, सोमवारी त्याचे कपडे गावाजवळील नंदीनी नदीच्या पुलाजवळ आढळून आले. त्यामुळे तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडाला असल्याची शंका गावकऱ्यांना आली. त्याला शोधण्यासाठी सोमवारी सायंकाळी त्याचा मित्र अमृत रघुनाथ चोपडे हा पाण्यात उतरला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो वर न आल्याने ग्रामस्थांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने नदीपात्रातील पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली. यात अमृत चोपडे याचा मृतदेह हाती लागला. मात्र रणजितचा मृतदेह सापडला नव्हता. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास तेथून निघालेल्या काही नागरिकांना रणजित काते यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच तेथे नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिस पाटील राजेंद्र पांजरे यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचाच मृतदेह वर काढला. शोकाकुल वातावरणात वेगवेगळ्या वेळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष धोत्रे तपास करीत आहेत.

अहमदनगर (प्रतिनिधी) नगरमधील उद्योजक करीमभाई हुंडेकरी (अब्दुल करीम सय्यद) (वय 70) यांच्या अपहरण प्रकरणातील दोघांना मंगळवारी (दि. 19) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतूर (जि. जालना) येथून अटक केली होती. दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने बुधवारी (दि. 20) त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तर दुसर्‍या आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.नगरमधील गुन्हेगार अजहर शेख याच्या सांगणावरून हा गुन्हा केल्याची कबुली या अटक केलेल्या दोघांनी दिली होती. अजहरला 25 लाखांची आवश्यकता होती म्हणून त्याने अन्य साथीदाराच्या मदतीने हुंडेकरी यांचे अपहरण केले होते. अटक केलेल्या आरोपींकडे पोलीस चौकशी करीत असताना एकाची शैक्षणिक कागदपत्रे बघितल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या मुलाला सज्ञान होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. तो परतूरमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. या मुलाचे वडील सरकारी नोकरीला असल्याचे समजले.परतूरमध्ये एका जीममध्ये हा मुलगा व्यायामासाठी जात होता. त्या ठिकाणी व्यायामासाठी आलेल्या अजहर शेख याच्याशी त्याची ओळख झाली. त्यातून पुण्याला फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून नगरला आणले व उद्योजकाचे अपहरण करण्यात सहभागी केल्याचे हा मुलगा पोलिसांना सांगत आहे. तर अटक केलेला दुसरा आरोपी निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय- 20, रा. परतूर, जि. जालना) याला बुधवारी (दि. 20) मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एस. चांदगुडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घ्यायचा आहे. गुन्हा कशा पद्धतीने केला, याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी रवींद्र पिंगळे यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने निहाल शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )-- निपाणी वाडगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुपचुप उरकण्यात आली असुन ती ग्रामसभा रद्द करुन पुन्हा ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पदाधिकार्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे प्रसिद्धी ला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की सदर ग्रामसभेची कुठलीही पूर्वसूचना  दिलेली नाही मासीक बैठकी प्रमाणे ठराविक पदाधिकारी व अधिकार्यांना बोलावून ग्रामसभा दाखविण्यात आली आहे गावातील अंगणवाडी सेविका शाळेचे मुख्याध्यापक मदतनीस आदिच या ग्रामसभेस उपस्थित  होते त्यामुळे ही ग्रामसभा नसुन मासीक बैठकच होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे गावात प्रसिद्धी देवुन ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी अजित राऊत नाना मांजरे संजय राऊत दादासाहेब कापसे श्रीकृष्ण बडाख भागचंद नवगीरे संतोष तोरसकर आदीनी केली आहे

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- शेर ऐ हिंद गृपच्या वतीने शेर ऐ हिंद शुर लढवय्या टीपु सुलतान यांची जयंती आल्लाउद्दीन चौक येथे साजरी करण्यात आली बाजार समितीचे संचालक सुधुर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी पत्रकार देविदास देसाई  दिलीप दायमा तंटामूक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे  अजिज शेख मोहसिन सय्यद अकबर भाई टिनमेकरवाले खाजाभाई शेख टिनमेकरवाले मोहसिन शेख निसार शहा सोनु शेख असालमशेख इसुब सय्यद आरिफ शेख फिरोज सय्यद जब्बार आतार समीर जहागीरदार शहारुख सय्यद मोईन शेख आयुब शेख शोऐब शेखशहानवाज सय्यद दस्तगीर शेख सुलतान सय्यद आदी उपस्थित  होते

सिन्नर(प्रतिनिधी ): सिन्नरकडून मुंबईकडे घोटीमार्गे २ हजार किलो गोमांस वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीसह ४ जणांना घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घोटी येथील सिन्नर फाट्यावर ही घटना घडली. घोटी पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घोटी सिन्नर मार्गावरून सिन्नरकडून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ०४ एच. डी. ४९४३ मध्ये अवैध गोमांस वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती घोटी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यांचे जनावराचे कत्तल करण्याचे प्रमाणपत्र किंवा गोमांस वाहतुक करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना, विनापरवाना बेकायदा २ हजार किलो गोमांस आढळून आले.संशयित टेम्पोचालक शेख नाशिर उमर वय ३२, रा. मदिनानगर, संगमनेर, किन्नर- सहाद शफी शेख वय २६ संगमनेर खुर्द ता. संगमनेर, यांनी मांसमालक हाजी अन्वर रा. मुंबई त्यांच्याकडून ०२ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मुंबईला पोहोच करतांना घोटीत ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पोसह मुद्देमाल ताब्यात घेतला असून चार संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश कासार, शीतल गायकवाड तपास करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget