सिन्नर(प्रतिनिधी ): सिन्नरकडून मुंबईकडे घोटीमार्गे २ हजार किलो गोमांस वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीसह ४ जणांना घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घोटी येथील सिन्नर फाट्यावर ही घटना घडली. घोटी पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घोटी सिन्नर मार्गावरून सिन्नरकडून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ०४ एच. डी. ४९४३ मध्ये अवैध गोमांस वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती घोटी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यांचे जनावराचे कत्तल करण्याचे प्रमाणपत्र किंवा गोमांस वाहतुक करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना, विनापरवाना बेकायदा २ हजार किलो गोमांस आढळून आले.संशयित टेम्पोचालक शेख नाशिर उमर वय ३२, रा. मदिनानगर, संगमनेर, किन्नर- सहाद शफी शेख वय २६ संगमनेर खुर्द ता. संगमनेर, यांनी मांसमालक हाजी अन्वर रा. मुंबई त्यांच्याकडून ०२ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मुंबईला पोहोच करतांना घोटीत ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पोसह मुद्देमाल ताब्यात घेतला असून चार संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश कासार, शीतल गायकवाड तपास करीत आहेत.
Post a Comment