बुलडाणा- 21 नोव्हे
रस्ता सुरक्षा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. रस्त्यांवरील अपघातामध्ये जिल्ह्यात ऑक्टोबर अखेर 270 जणांनी आपले प्राण गमविले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व अन्य निर्माणाधीन रस्त्यांवर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी दुरूस्ती, खड्डे बुजविणे, सुरक्षा नियमांची व्यवस्था करावी. रस्ता सुरक्षेप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित यंत्रणाप्रमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती प्रमुख डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांना सातत्याने गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवर असलेला विषय आहे. या विषयाशी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने काम करायला पाहिजे. समिती कामकाजासंबंधित अहवाल, अपघात घडल्यानंतर देण्यात येणारा संयुक्त अहवाल विनाविलंब सादर करावेत. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर संबंधित यंत्रणेने नियंत्रण ठेवावे. काम सुरू असताना नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंत्राटदार काम करीत नसल्यास देयकांची अदायगी थांबवावी.
रस्ता काम सुरू असलेल्या यंत्रणांनी दर आठवड्याला सदर रस्ता कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी मलकापूर ते खामगांव रस्ता कामाचे सुधारीत निवीदा होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे फलक लावावेत. मेहकर फाटा ते चिखली शहर रस्त्याचे काम गतीने पुर्ण करावे. कंत्राटदराने विहीत कालमर्यादेत दर्जेदार काम करून रस्ता पुर्ण करावा. याप्रसंगी संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार व यंत्रणांवर रस्ता कामांबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीत रस्तानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Post a Comment