शेवगाव : तालुक्यातील वडूले बुदूक येथे आपल्या मित्राचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.या पैकी एकाचा मृतदेह सोमवारी (१८ नोव्हेंबर) रात्री उशिरा तर दुसऱ्याचा मृतदेह मंगळवारी (१९ नोव्हेंबर) आढळून आला. रणजित नंदू काते (वय ३४) व अमृत रघुनाथ चोपडे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील रणजित काते हा तरुण रविवारीपासून (१७ नोव्हेंबर) घरातून बेपत्ता होता. या संदर्भात त्याचे सासरे महादेव भारस्कर (रा. रामनगर, शेवगाव) यांनी पोलिसांत जावई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. मात्र, सोमवारी त्याचे कपडे गावाजवळील नंदीनी नदीच्या पुलाजवळ आढळून आले. त्यामुळे तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडाला असल्याची शंका गावकऱ्यांना आली. त्याला शोधण्यासाठी सोमवारी सायंकाळी त्याचा मित्र अमृत रघुनाथ चोपडे हा पाण्यात उतरला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो वर न आल्याने ग्रामस्थांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने नदीपात्रातील पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली. यात अमृत चोपडे याचा मृतदेह हाती लागला. मात्र रणजितचा मृतदेह सापडला नव्हता. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास तेथून निघालेल्या काही नागरिकांना रणजित काते यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच तेथे नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिस पाटील राजेंद्र पांजरे यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचाच मृतदेह वर काढला. शोकाकुल वातावरणात वेगवेगळ्या वेळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष धोत्रे तपास करीत आहेत.
Post a Comment