तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भागातील म्हैसगाव, शेरी चिखलठाण परिसरात काल ढगफुटी.
राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भागातील म्हैसगाव, शेरी चिखलठाण परिसरात काल ढगफुटीसारखा प्रकार घडला. सुमारे साडेचार तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने तुडूंब भरलेले बंधारेही फुटले तर अनेक शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना त्यात आता ढगफुटीसारखे प्रकार घडत असल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे.म्हैसगाव परिसरात ढगफुटी होऊन झालेल्या पावसामुळे केदारेश्वर मंदिराजवळील म्हैस ओढ्याने रौद्ररुप धारण केले होते. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्ता बंद झाल्याने पाच गावांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला. शेरी येथील तलाव फुटण्याची शक्यता असल्याने तलावाच्या सांडव्याचा भाग मोठा करुन तलावातील पाणी कमी करण्यास स्थानिक तरुणांना सांगितले. एकूणच पावसामुळे या भागात सर्वत्र पाणी भरलेले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने परिसरातील 5 ते 6 जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेले बंधारेही फुटले तर रस्त्यावरुन सुमारे 30 फुट पाणी वाहत होते.सोमवारी पहाटे 4 पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हैसगाव परिसराला अक्षरक्ष झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सकाळी 11.30 वाजता केदारेश्वर मंदिराजवळील (म्हैसगाव) ओढ्याच्या पुलावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे शेरी, चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, बुळे पठार भागातील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करण्यासाठी या भागात गेलेले तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, मंडलाधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक असे सर्वच अधिकारी सकाळपासून पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते.