श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. काळाराम मंदिर परिसर, जिजामाता चौक परिसरात कचर्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन व नागरिकांची देखील आहे. पण श्रीरामपूर शहरात दोघेही आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण परसले आहे. त्यातच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे या कचर्याच्या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे याठिकाणी डासांचे प्रमाण वाढल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. तसेच प्लॅस्टिकमुळे ठिकठिकाणी गटारी तुंबल्याने पाणी साचून त्याचे रुपांतर दुर्गंधीत झाले आहे. उघड्यावर कचरा पडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने ‘स्वच्छ भारत अभियान’ यामध्ये सहभाग घेतला आहे. याबाबत केंद्रीय पथकाकडून शहराची पाहणी देखील करण्यात आलेली आहे. तरी देखील शहर स्वच्छतेबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याचा ठेका नगरपालिकेने दिलेला आहे. याआगोदर दररोज कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत होती. परंतु काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांमधून एकदा घंटागाडी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. काही नागरिक घरातच कचर्याची साठवणूक करुन ठेवतात. तर अनेक नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकून देतात. तो कचरा तसाच राहिल्याने दुर्गंधी सुटते. एकंदरीतच शहरात कचर्याचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.पालिकेने कंपोस्ट खत निर्मितीचा प्रकल्प राबवावा.
Post a Comment