श्रीरामपूर (प्रतिनिधी) - नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ती एका कुटुंबासारखी आहे. कुटुंबप्रमुखाचे काम सतत सुरू असते. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही,तरी पण जेवढे मला चांगलं करता येईल तेवढे चांगले करण्याचा मी प्रयत्न करीन.समस्या या न संपणाऱ्या असतात. त्या निर्माण होणारच आहेत,त्यात जेवढया मला सोडवता येतील तेवढे करण्याचा माझा प्रयत्न राहील.सर्व पत्रकारांनी या कामी आम्हाला सहकार्य करावे.पत्रकारांसाठी पत्रकार दिन हा फक्त कार्यक्रमाचे स्वरूप न राहता या निमित्ताने सर्व पत्रकारांचे संपूर्ण बॉडी चेकअप करून शुगर, बीपी, किडनी, कोलेस्ट्रॉल व इतर लिपींग प्रोफाइलची प्रत्येकाची तपासणी नगरपालिकेमार्फत आज आणि उद्या केली जाणार आहे. हा एक वेगळा प्रयत्न आहे. सर्वांशी सल्लामसलत करून भविष्यात आपल्या सहकार्याने नगरपालिकेचा कारभार करू. कामाच्या गडबडीत स्वतःच्या प्रकृतीकडे आपण दुर्लक्ष करतो पण आपण आपलाही विचार करावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.
येथील आगाशे सभागृहात काल नगर परिषदेतर्फे पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रास्ताविकपर भाषण करताना मुख्याधिकारी घोलप बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा हे होते.व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे,संपादक करण नवले,ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी यांची उपस्थिती होती.
प्रारंभ स्वीप कार्यक्रमांतर्गत नगरपालिकेने घेतलेल्या विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित पत्रकारांच्या हस्ते पार पडला.यामध्ये रांगोळी, चित्रकला व इतर स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी नगरपालिकेचे वसुली विभागाचे काम तत्पर असावे,त्यांचे खाते प्रमुख मागे कोपऱ्यात बसतात त्यामुळे पुढे काय चाललंय हे त्यांना कळत नाही.त्यांना पुढे बसवावे. पैसे स्विकारण्यासाठी खिडक्या वाढवाव्यात अशी सूचना केली.
संपादक करण नवले यांनी सण उत्सव काळात रस्त्यांचे सुयोग्य नियोजन करावे. अतिक्रमण विभागाला सूचना द्याव्यात. पालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना आम्ही प्रसार माध्यमे म्हणून योग्य ती प्रसिद्धी देऊ असे सांगितले.
पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी नगरपालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाला वारंवार सूचना कराव्या लागतात हे बरोबर नाही.या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडावी असे सांगून शहराचा विस्तार वाढत असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन ते चार अभ्यासिका असाव्यात. त्यामधून गोरगरिबांची मुले अभ्यास करून यशस्वी होतील.या बाबीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे असे आवाहन केले.
जयेश सावंत यांनी पत्रकार भवनाचे काम पूर्ण करून ते ताब्यात मिळावे तसेच वसंतरावजी देशमुख यांच्या नावाची व्याख्यानमाला व पुरस्कार पुन्हा सुरू करावेअसे सांगितले. याप्रसंगी पत्रकार अनिल पांडे,रवी भागवत,महेश माळवे,नवनाथ कुताळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित सर्व पत्रकारांचा पालिकेतर्फे मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमानंतर सर्व पत्रकारांची बीपी,शुगर टेस्ट करण्यात आली. इतर तपासण्या आज पालिकेच्या सरकारी दवाखान्यात करण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे तसेच डॉ.सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्याधिकारी घोलप यांनी पुढाकार घेऊन पत्रकार दिन साजरा करण्याची खंडित झालेली परंपरा पूर्ववत सुरू केल्याबद्दल दोन्ही पत्रकार संघाचे वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.