आपेगाव वृध्द दाम्पत्याच्या खून प्रकारणी तिघे अटक ; नगर एलसीबी व कोपरगांव तालुका पोलीसांची संयुक्त कारवाई.
अहमदनगर प्रतिनिधी - जिल्ह्यातील आपेगाव (ता.कोपरगाव) येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीसांना संयुक्त पथकाला यश आले आहे. अजय छंदु काळे (वय १९, रा. पढेगांव, ता. कोपरगांव), अमित कागद चव्हाण (वय २०, रा. हिंगणी हल्ली रा. पढेगांव, ता. कोपरगांव), जंतेश छंदु काळे ( वय २२ रा. पढेगाव ता. कोपरगाव) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेले माहिती अशी की, नोकरी निमित्ता कुटूबिंयासह पुणे येथे राहतात. दि. ३० मे २२ ते दि.१ जून २२ रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी रात्रीचे वेळी घराचे छतावर प्रवेश करुन झोपेत असलेली आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५) व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय ७५) अशा दोघांची अज्ञात हत्याराने खून करुन, घरातील कपाटाची उचकापाचक करून १ लाख ९० हजार रु. किंचे सोन्याचे दागिने खुनासह जबरी चोरी करुन चोरुन नेले होते. या घटनेबाबत जालिंदर दत्तात्रय भुजाडे ( वय ४०, रा. आपेगांव, ता. कोपरगांव हल्ली रा. संतोषनगर (बाकी), ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९९७ /२०२२ भादविक ३०२, ३९७, ३९४ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटना ठिकाणास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.त्याप्रमाणे पोनि श्री. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असतांना पथकास माहिती मिळाली. गुन्हा हा अजय काळे (रा. पढेगांव, ता. कोपरगांव) याने त्याचे साथीदारासह केला असून तो त्याचे राहते घरी आहे, कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोलिस पथक तात्काळ पढेगांव येथे जाऊन आरोपी अजय काळे याचे वास्तव्याबाबत माहिती घेत असतांना एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळन जाऊ लागला पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय छंदु काळे (वय १९, रा. पढेगांव, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पोलिसांनी त्याला पोलिस खाक्या दाखविताच गुन्हा हा त्याचा साथीदार अमित कागद चव्हाण (वय २०, रा. हिंगणी हल्ली रा. पढेगांव, ता. कोपरगांव), जंतेश छंदु काळे (वय २२ रा. पढेगाव ता. कोपरगाव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली.माहिती नुसार आरोपी अमित चव्हाण व जंतेश काळे यांचा त्यांचे राहते घरी जावून शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास कोपरगांव तालुका पोलीस करीत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, सफौ बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके, सचिन आडवल, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, पोकाॅ सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे व चापोना भरत बुधवंत आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोनि दौलतराव जाधव, सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉ ईरफान शेख आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
