श्रीरामपूर प्रतिनिधी-अल्पवयीन विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून त्रास देणार्या तरूणास जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.बेलापूर परिसरात राहणार्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा आरोपी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याने पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून छेड काढत त्रास दिला. त्याबाबत विद्यार्थीनीने झालेला प्रकार वडिलांना सांगितला. वडील संबंधित तरुणाला जाब विचारण्यास गेले असता त्याने विद्यार्थीनीच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विद्यार्थीनीच्या आईला ढकलून दिले व विद्यार्थीनीला पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला.याप्रकरणी मुलीचे आई-वडील व अल्पवयीन विद्यार्थीनीने थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास चांगदेव भगत (वय 38, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354 ड, 341, 323, 504, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पोक्सो कायदा 2012 चे कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करुन विलास भगत याला अटक केली. पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक बोर्से हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment