नेवाशात माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या घरी दरोडा; सात तोळे सोने लंपास.
नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्ज रघुनाथ आगळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री घडली. यावेळी एक महिला जखमी झाली आहे.संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातून रघुनाथ आगळे हे २००३ साली सेवानिवृत्त झाले आहेत. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रात्री झोपेत असताना अचानक दरवाजा वाजल्याच्या आवाज आला. यावेळी आगळे यांच्या पत्नीने हॉलमध्ये येऊन पती रघुनाथ आगळे यांना उठविले. याचवेळी घराचे दार तोडून चार अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाच्या हातात लाकडी दांडके तर दुसºयाच्या हातात काहीतरी धारदार हत्यार होते. त्यातील एकाने श्री व सौ. आगळे यांना गप्प बसा अन्यथा तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. सौ. आगळे यांच्या गळ्यातील गंठण तोडून घेतले. तर दुसºयाने हातातील सोन्याची बांगडी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगडी निघाली नाही. त्यामुळे त्याने हातात असलेल्या धारदार शस्त्राने ती बांगडी कापली. त्यावेळी सौ.आगळे यांच्या हाताला जखम झाली. त्यावेळी आगळे यांनी आरडाओरडा केल्याने बाहेर उभा असलेल्या चोरट्यांच्या साथीदाराने लवकर आवरा कोणीतरी येत आहे असे सांगितले. त्यावेळी हातातील कापलेली बांगडी खाली पडली. ती तशीच सोडून चारही चोरटे घराबाहेर पळून गेले. आरडाओरडा करीत आगळे हे त्यांच्या मागे पळाले असता घराच्या मागील बाजूच्या कंपाऊंडवरून उड्या मारून पाच जण पळून जातांना त्यांना दिसले. चोरट्यांनी १ लाख ४० हजार किंमतीचे सात तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले आहे. याबाबत आगळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.