माजी राज्यमंत्री रविकांत तुपकरांनीही हाती धरली तिफन, कार्यकर्त्याच्या 2 एकरात केली सोयाबीनची पेरणी.
बुलडाणा - 16 जून
मृग नक्षत्राच्या अखेरीस बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे,काळ्या मातीत तिफन चालू लागल्या आहेत.बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा शिवारात एका कार्यकर्त्याच्या शेतात जाऊन माजी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज 16 जून रोजी हाती तिफन धरून “पेरते व्हा”चाच संदेश दिला आहे.
शेतकऱ्याच्या पिककर्जासाठी आक्रमक भुमिका घेऊन काल विविध बँक अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर, रविकांत तुपकर यांनी आज मंगळवार 16 जून रोजी थेट शेतात जाऊन बैलाचे कासरे हाती धरून तिफन तर चालविलीच अन बियांची ओटी पोटाला बांधून सकाळपासून दुपारपर्यंत 2 एकरावर सोयाबीनची पेरणी केली व कार्यकर्त्यांसह शेतातच न्याहारी केली.दरम्यान, पेरणीसाठी डोंगरखंडाळा येथे गेलेल्या रविकांत तुपकर यांनी तिथल्या बँकेतही जावून परिसरातील शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा आढावा घेतला,अनेक छोट्या छोट्या त्रुट्यांमुळे पिककर्जात येत असलेल्या अडचणी लक्षात आल्यानंतर, त्या सोडविण्या संबंधी त्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांना जर पिककर्जासाठी त्रास दिला तर बँक अधिकाऱ्यांना चोपून काढू असा इशारा द्यायलाही तुपकर विसरले नाही.