Latest Post

शिर्डी –प्रतिनिधी जय शर्मा )श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कूल, शिर्डी मध्‍ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ज्‍युनिअर के.जी. या वर्गाकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत असून याबाबतची लिंक सोमवार दिनांक ११ मे २०२० पासुन संस्‍थानचे www.sai.org.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
श्री.डोंगरे म्‍हणाले, देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवु नये म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कूल, शिर्डी मध्‍ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ज्‍युनिअर के.जी. या वर्गाकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत असून याबाबतची लिंक संस्‍थानचे www.sai.org.in या संकेत स्‍थळावर देण्‍यात येत आहे. सदर प्रवेश प्रक्रिया ही सोमवार दिनांक ११ मे २०२० ते बुधवार दि. २० मे २०२० सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन चालू राहणार आहे.
ज्‍युनियर के.जी वर्गात प्रवेशासाठी दिनांक ३० सप्‍टेंबर हा मानिव दिनांक गृहीत धरुन पाल्‍यांचे वय ०४.०० वर्ष ते ०४.११ या वयोगटापर्यत ठरविण्‍यात आलेले आहे. म्‍हणजे ज्‍या पाल्‍यांची जन्‍मतारीख (०१ ऑक्‍टोबर २०१५ ते ३० सप्‍टेंबर २०१६) या कालावधीतील असावी, अशाच पालकांचे पाल्‍यांना ज्‍यु.के.जी करीता प्रवेश देण्‍यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ज्‍यु.के.जी. साठी मर्यादीत एकूण २५० प्रवेश देण्‍यात येणार असून प्रवेशांच्‍या जागा प्रथम प्राधान्‍यक्रम संस्‍थान कायम कर्मचारी पाल्‍य व कंत्राटी/आऊटसोर्स कर्मचा-यांचे पाल्‍य असा ठेवण्‍यात आलेला आहे. या कायम व कंत्राटी कर्मचारी पाल्‍यांचे प्रवेश अर्ज २५० पेक्षा जास्‍त असल्‍यास त्‍यांचे प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करणेत येणार आहे. तसेच एकूण २५० पैकी प्रवेश जागा शिल्‍लक राहिल्‍यास उर्वरीत प्रवेशासाठी शिर्डी नगरपंचायत हद्दीतील पाल्‍यांच्‍या अर्जाची लॉटरी पद्धतीचा अवलंब करुन उर्वरीत प्रवेश भरण्‍यात येतील. त्‍यानंतरही प्रवेशाच्‍या जागा शिल्‍लक राहिल्‍यास नगरपंचायत हद्दीचे बाहेरील अर्जदारांना लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्‍यात येतील. के.जी प्रवेश अर्ज घेतांना विदयार्थ्‍यांचा मूळ जन्‍म दाखला (ग्रामपंचायत/नगरपालिका/ महानगरपालिका) यांनी प्रमाणित केलेला असावा व जन्‍म दाखला लॅमीनेशन केलेला असावा. प्रवेश निश्चित करतांना शालेय व्‍यवस्‍थापनेचे नियम व अटी लागू राहतील.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍यासाठी संस्‍थानचे www.sai.org.in या संकेत स्‍थळावर दिनांक ११/०५/२०२० ते २०/०५/२०२० रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत उपलब्‍ध राहील. ज्‍युनियर के.जी प्रवेशासाठी पालकांनी शाळेत येऊ नये. शाळेत पालकांना किंवा इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. काही अडचण भासल्‍यास दुरध्‍वनी क्रमांक 02423-258916 व मो.नं.9284546498 आणि मो.नं.7720077280 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री अरुण डोंगरे यांनी केले.

बुलडाणा - 9 मे-उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लागण्याचे घटना घडत आहे.ही आग मानवी कारणामूळे जर चुकिने लागली असेल तर ती लवकर अटोक्यात येऊ शकते परंतु असे प्रयत्न फार कमी होतांना दिसून येतात. या वर्षी जंगलात लागणाऱ्या आगीच्या घटनेला वनविभाग गांभिर्याने घेत धडक मोहिम सुरु करून जंगलात आग लागण्यास कारणीभुत 7 लोकांवर वन अधिनयमा प्रमाणे गुन्हे नोंदविले आहे.
      बुलडाणा जिल्ह्यात 80 हजार 816 हेक्टरवर वन क्षेत्र आहे. अनेक वेळी जंगलात आग लागल्याची माहिती वनविभागाला मिळते, वन अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी जाऊन आग विझवून परत येऊन जातात. आता पर्यंत असेच होत आले आहे परंतु या वर्षी जंगलात आग लागल्याचे कारण,व त्याला कारणीभूत कोण? हे समोर आणून त्या व्यक्तिवर वन अधिनयमा प्रमाणे धडक मोहिम राबवून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश डीएफओ संजय माळी यांनी फायर फाइटर सेलचे प्रमुख व सहायक वनसंरक्षक रणजीत गायकवाड यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने एप्रिल व मे या दोन महिन्यात 7 ठिकाणी जंगलात आग
लागण्यास जबाबदार 7 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या मध्ये जळगांव जा. वनपरिक्षेत्र अंतर्गत आरोपी सरदार तडवला रा.चारठान,अरुण शंकर सईरिशे रा.भेंडवळ, विठ्ठल विश्वनाथ पाखरे रा.भेंडवळ,मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत अंकुश मोहन चौहान रा.मोहेगांव, खामगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत कनिराम रेखमल चौहान रा.दस्तापुर तसेच बुलडाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या ग्राम डोंगरखंडाळा येथील दामोदर भागाजी वाकोडे या 7 आरोपींचा समावेश आहे.या वेगवेगळ्या 7 आगिच्या घटनेत जवळपास 21 हेक्टर वनक्षेत्र जळालेला आहे. यातील 4 घटनेत शेतातील बांध जाळतांना आग जंगलात पसरल्याचे समोर आले.शेतकऱ्यांनी शेतात आग लावतांना जंगलात आग पोहचु नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
जंगलात आग लावणे किंवा आगी साठी कारणीभूत ठरणे हे वन अपराध आहे.आपल्या मुळे जंगलात आग लागू नये याची शेतकऱ्यांनीही दक्षता घ्यावी.भविष्यात जर कोणी जंगलात आग लावली तर त्याच्या विरोधात वनविभाग गंभीर कारवाई करणार,तसेच जंगलात आग,वन्यप्राणी,अतिक्रमण व इतर काही माहिती द्यायची असेल तर हैलो फॉरेस्टच्या 1926 या टोलफ्री नंबरवर आपण संपर्क करू शकता.             रणजीत गायकवाड सहायक वनसंरक्षक  बुलडाणा.

संगमनेर-(राजेशजेधे)संगमनेरतालुक्यातील धांदरफळ येथील सहा तर संगमनेरात एक अशा सात व्यक्ती करोना बाधीत आढळल्याने संगमनेर पुन्हा हादरले आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल दिवेद्वी व जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट देवून पाहणी केली. संगमनेरचा जाहीर झालेला हॉटस्पॉट व धांदरफळ बुद्रूक प्रतिबंधात्मक क्षेत्र येथे आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची तंबी जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली आहे. तालुक्यातील धादंरफळ येथील 67 वर्षीय व्यक्ती करोना बाधीत होवून मयत झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यापाठोपाठ संगमनेरातील कुरण रोड येथील एक महिला व धांदरफळ बुद्रूक येथील सहा व्यक्ती करोना बाधीत आढळले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट दिली.संगमनेरातील जाहीर केलेल्या हॉटस्पॉट एरियाची मॅपनुसार जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे कडक अंमलबजावणी करण्याची तंबी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, डीवायएसपी रोशन पंडीत, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदि उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) रमजान महिन्यांमध्ये पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नगरपालिकेने नळांना पाणी न सोडल्यामुळे जनतेचे खूपच हाल झाले . त्यामुळे नागरिकांना शनिवारी कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले .
 याबाबतअधिक माहिती घेतली असता नगरपालिकेतर्फे दर शनिवारी कोरडा शनिवार पाळला जातो . परंतु सध्या मुबलक पाणी असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तो पाळला गेलेला नाही . सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे 25 मे पर्यंत शहरात दर शनिवारी पाणी पुरवठा केला जाईल असे नगरपालिकेने जाहीर केले होते .
त्यामुळे नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला धन्यवाद दिले . मात्र शुक्रवारी सायंकाळी शहराच्या काही भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला . चार-पाच तास वीज गायब असल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला . त्यातच रात्री अकरा वाजता नगरपालिके मार्फत सोशल मीडिया वर मेसेज टाकून शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले . वास्तविक पाहता थोडा उशिरा पाणीपुरवठा केला असता तरी लोकांना पाणी मिळाले असते . कारण रात्री अकरा पासून वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरायला भरपूर वेळ होता . सध्या रमजान महिना चालू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना दररोज पाच वेळा वजू साठी पाण्याचा वापर करावा लागतो . शनिवारी पाणी येणार नाही याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्यामुळे लोकांनी भरपूर पाणी वापरले . परंतु रात्री अकरा वाजता जेव्हा नगरपालिकेने सकाळी पाणीपुरवठा होणार नाही असे जाहीर केले तेव्हा मात्र लोकांनी संताप व्यक्त केला . शहरातील पाण्याचे दोन्ही तलाव भरलेले आहेत . भंडारदारा धरणातही मुबलक पाणी आहे . म्हणजे सध्या उन्हाळा असूनही पाण्याची कुठेच टंचाई नाही . प्रवरा कालवा सुद्धा पाण्याने तुडुंब वाहत आहे .असे असताना रमजान महिन्याच्या पवित्र काळामध्ये पाण्याअभावी लोकांचे हाल केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . वार्ड नंबर 2 मध्ये सात-आठ नगरसेवक राहतात . परंतु त्यांनी सुद्धा याबाबत कोणतीही नोंद न घेतल्याने जनतेने या नगरसेवकांबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे .नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली . नगरपालिकेने आधी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नियमित पाणीपुरवठा करावा किंवा शनिवारचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी बंद ठेवावा . जनतेच्या भावनेशी खेळू नये . अशी संतप्त प्रतिक्रिया वार्ड नंबर 2 मधील महिला भगिनींनी व्यक्त केली .
 नगरसेवक ताराचंद रणदिवे यांची तत्परता
सकाळी 11:00 वाजता देखील नळांना पाणी न आल्यामुळे गुलशन चौक परिसरातील नागरिकांनी या भागाचे कर्तव्यदक्ष व जागरूक नगरसेवक ताराचंद रणदिवे यांना पाणी न आल्याबाबत विचारणा करून घरात पाणी नसल्याचे सांगितले . त्यांनी तातडीने नगरपालिकेचा टॅंकर पाठवून या परिसरातील लोकांना पाणी उपलब्ध करून दिले.याबद्दल या भागातील जनतेने त्यांना धन्यवाद दिले.

शिर्डी राजेंद्र गडकरी -राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे तीन दिवस संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे, कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय गाव पातळीवर व ग्रामपंचायती मार्फत घेण्यात आला आहे, नागरिकांनी तीन दिवस भाजीपाला, किराणादुकाने सर्व बंद राहणार असल्यामुळे घराबाहेर पडू नये ,असे आवाहन करण्यात आले आहे,
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक हे गाव नगर-मनमाड महामार्गालगत असल्याने व येथे शिर्डी जवळ असल्याने व सावळीविहीर हे आसपासच्या सर्व गावांचे बाजारपेठेचे केंद्र असल्याने येथे लॉकडाउन काळात सुद्धा कोण येते कोण जाते हे लवकर कळत नाही, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तेथेही शिर्डी व परिसरातून लोक आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी करत होते, त्याप्रमाणे येथे दररोज भाजीपाला विक्री दुकाने सुरू होती, अनेकांनी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रीचे दुकाने थाटली आहेत, मात्र लॉकडाउनचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते, त्यामुळे या भाजीपाला विक्री केंद्रांवर मोठी गर्दी होत होती, त्याचप्रमाणे किराणा दुकानात ही कोणतेही लॉक डाऊन चे नियम पाळले जात नव्हते ,सोशल डिस्टंन्स ,मास्क याचा वापर होत नव्हता, सावळी विहीरबुद्रुक मध्ये येणारे जाणारे कळत नव्हते, यामुळे कोरोणाची भीती जास्त|  असल्यामुळे सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ यांनी आज सकाळी एकमुखी निर्णय घेत सावळीविहीर बुद्रुक गाव तीन दिवसासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे, हा निर्णय घेताच गावातील सर्व दुकानदारांना तसा संदेश देऊन दुकाने बंद करण्यात आली, मेडिकल व दवाखाना सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत, कोणीही घराबाहेर पडू नये ,लॉक डाउनचे  नियम पाळावेत, सोशल डिस्टंन्स व मास्क वापरावेत, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, तरी सर्वांनी घरात रहा सुरक्षित रहा ,असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे, उपसरपंच वृषाली ओमेश जपे ,ग्रामसेवक रावसाहेब खर्डे, कामगार तलाठी गायके व ग्रामस्थांनी केले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-   कोरोनो मुळे  लांबणीवर पडलेला विवाह सोहळा काही मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत घरातच संपन्न झाला वधु वर यांनी सोशल डिस्टनचे नियम पाळत एकमेकाना आयुष्यभर सांथ देण्याची शपथ घेतली                  बेलापूर येथील रहीवासी रामेश प्रभाकर जगदाळे यांची मुलगी मयुरी हीचा विवाह निमगाव कोर्हाळे तालुका राहाता येथील पोपट दामोधर साळवे हाल्ली राहाणार चांदेगाव तालुका राहुरी यांचेशी ठराला होता विवाहाच्या पत्रीका देखील छापुन झाल्या होत्या पत्रीका वाटणार तोच कोरोनाचे संकट आले अन विवाह स्थगीत करावा लागला कोरोनामुळे लाँक डाऊन वाढतच चालल्यामुळे अखेर दोन्ही कुटुंबानी विवाह करण्याचे ठरविले विवाह करीता कशी  परवानगी मिळेल याची माहीती घेतली अन सोशल डिस्टनचा नियम पाळून मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे दोन्ही कुटुंबांना सुचविण्यात आले त्या प्रामाणे दोन्ही कुटुंबानी एका घरातच हा विवाह सोहळा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला .मुला मुलीचे आई वडील व इतर असे एकूण दहा जणांच्या उपस्थितीत   विवाह सोहळा संपन्न झाला  वधु वरांना  शुभाशिर्वाद देण्यासाठी मुला मुलीचे आई वडील दोन्ही मामा तसेच बाजार  समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई विजय शेलार किरण शेलार सुहास शेलार आदि  उपस्थित होते.

तालुका पोलिस  स्टेशन गुन्हा दाखल नातेवाईकांचा जमाव
माळवाडगांव -सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून झालेला वाद विकोपाला जाऊन सासर्‍याने मित्रांच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा काटा काढला. लोखंडी पाईप व तलवारीने वार करून जावयास ठार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शेतीमहामंडळ हद्दीवरील पारधी वस्तीवर पहाटे घडली. मयुर आकाश काळे (वय 28, रा. मूळ कर्जत, हल्ली मु. मुठेवाडगाव) असे मृत जावयाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडिलांच्या निधनानंतर मुलीने पतीला माहेरी आणून येथे राहणे पसंत केले. त्यामुळे मुळचा कर्जत येथील मयुर काळे हा आपल्या पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर मुलीच्या आईने तेथीलच सचिन काळे याच्यासोबत दुसरा विवाह करून घर सोडले. मुलगी व जावयाकडे असलेल्या दागिन्यांच्या मागणीसाठी आईने पती सचिन काळे याला मित्रांसोबत मुलीकडे पाठविले.काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास सचिन काळे (रा. मुठेवाडगाव), संदीप काळे, सुरज काळे (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) व बुंदी भोसले (रा. मिरजगाव, ता. कर्जत) हे मयुर याच्या घरी गेले. तेथे त्यांनी मयुर व त्याची पत्नी मोनिका (वय 23) यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. ते सर्व दारूच्या नशेत होते. वाद विकोपाला गेल्यानंतर सचिन याने लोखंडी पाईप, तलवार, दांडा व दगडाने मयुरला मारहाण केली. त्यात मयुरचा मृत्यू झाला. यावेळी त्यांनी मोनिकालाही मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. मयुरचा भाऊ तैमुर काळे वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यांचे घर पेटवून दिले.सकाळी या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट दिली. तालुका पोलिसांनी सचिन काळे, संदीप काळे, सुरज काळे व बुंदी भोसले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला.घटनेनंतर चारही आरोपी पसार झाले होते. परंतु पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पो. कॉ.एन. आर. बर्डे, ई. डी. पवार यांच्या पथकाने तातडीने त्यांचा शोध घेऊन सचिन, सुरज व बुंदी या तिघांना सकाळी अटक केली असून संदीप हा पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मयताची पत्नी मोनिका मयूर काळे (वय 23) हिच्या फिर्यादीवरून गु.र.नं.152/2020 भादंवि कलम 302, 324, 436, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसुद खान करत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget