Latest Post


राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरू करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली.बऱ्याचवेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्देवाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत, अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण मोठ्यासंख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा.
कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतू अर्थचक्र सुरु करतांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरु करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्विकारायचा नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यांच्या सीमा बंदच.
जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की एका जिल्ह्यातील माणसे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. 3 मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. राज्यात अँटी कोरोना पोलीस ही उत्तम सेवा देतांना दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

वडाळा महादेव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात वाशीम येथील 34 व परप्रांतीय 34 असे एकूण 68 मजूर वर्ग आपल्या घरी जात असताना प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना दोन निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे.वडाळा महादेव येथील बस स्टँड परिसरात मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातील काही नागरिक तसेच मध्यप्रदेश येथील
बुऱ्हाणपूर येथील नागरिक लहान मुला बाळासह पायी प्रवास करत होते. यावेळी  काही स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती प्रशासनास दिली. तात्काळ तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत, सदर व्यक्तींची चौकशी केली. त्यावर त्यांनी वाशिम जिल्ह्यातून कामानिमित्त तसेच मध्य प्रदेशमधून कामानिमित्त आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. याच परिसरातील दोन कार्यालयांमध्ये निवारा केंद्र
तयार करून त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे. काल दुपारी तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ. मोहन शिंदे तसेच त्यांच्या पथकाने या मजुरांची वैद्यकीय तपासणी केली.सदर दोन्ही ठिकाणी ३४-३४  लहान-मोठे व्यक्ती ठेवण्यात आले आहे. सदर व्यक्तींची श्रीरामपूर येथील गुरुद्वारा येथून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या सांगितल्यानुसार श्रीरामपूर येथील अनेकांनी सदर नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी वडाळा महादेव ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.

मालेगाव | प्रतिनिधी-वाहब खान- येथील सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नुकताच भरती झालेला रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांचा राग अनावर झाल्याने अतिदक्षता विभागात तोडफोड केल्याची घटना घडली. यावेळी ऑक्सिजन सिलेंडर एकाने उचलून आदळले. यात डॉ. फराह नामक महिला वैद्यकीय अधिकारी बालंबाल बचावल्या आहेत. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता, तर संरक्षण न मिळत असल्यामूळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, पोलीस उपअधीक्षकांनी पुरेश बंदोबस्त वाढविण्याबात आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले व रुग्णांवर उपचार करणे सुरु झाले आहे.आज दुपारी साडेतीनच्या सुमारास श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे इस्लामपुरा भागातील एक ४५ वर्षीय रुग्णाला अतिशय गंभीर अवस्थेत त्याचे नातेवाईक दवाखान्यात घेऊन आले होते. दरम्यान, या रुग्णावर ताबडतोब अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना विषाणूचे लक्षणं दिसून आल्यामुळे या रुग्णाला आयसोलेशन वार्डमध्ये शिफ्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.यानंतर लगेचच या रुग्णाला शिफ्ट करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. मात्र, आयसोलेशन वार्ड मध्ये शिफ्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यानच या रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्ण दगावल्याचा राग अनावर झाल्यामुळे रुग्णाच्या नातलगांनी प्रचंड गोंधळ रुग्णालयात घातला.यादरम्यान, एका नातलगाने ऑक्सिजनचे सिलेंडर उचलून जमिनीवर आदळले. यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. तर याच वार्डमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या फराह नामक डॉक्टर बालंबाल बचावल्या. यानंतर भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय काम सुरु करणार नाही असा पवित्र्या या कर्मचाऱ्यांनी घेतला होता.यानंतर मालेगावचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले याठिकाणी दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पोलीस यंत्रणा रुग्णालयात तैनात असल्याचे आश्वासन देऊन पुढे हे प्रकार होणार नाहीत याबाबत काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील कामकाजाला सुरुवात केली.

शिर्डी, दि.19- राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हणमंतपूर व हसनापूर या परिसरातील 55 व्यक्तींना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 23 रुग्णांना उपचार पूर्ण होऊन तंदुरुस्त झाल्यामुळे आज विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले.
            विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्यांची प्रशासनातर्फे नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड, राहाता ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गोकुळ घोगरे व त्यांचे सहकारी आणि साईबाबा हॉस्पीटलच्या डॉ.नरोडे, डॉ.पितांबरे याच्या पथकाने रुग्णांची दैनंदिन वैद्यकीय तपासणी केली व मार्गदर्शन केले. विलगीकरण कालावधीत या रुग्णांना साई प्रसादालयाचे प्रमुख श्री.थोरात यांच्या देखरेखीखाली दैनंदिन नाष्टा, चहा, दोन वेळचे भोजन देण्यात आले. परिसराची स्वच्छता आणि औषध फवारणी शिर्डी नगर पंचायत मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदशानाखाली ठेवण्यात आली होती. गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलगीकरण कक्षाशी संबधित सर्व व्यवस्था चोखपणे पार पाडली. श्री साईबाबा विश्वस्त संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिदे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांची संपूर्ण देखभाल करण्यात आली.
            विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज मिळाल्यानतर रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णांनी  तहसीलदार कुंदन हिरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधुन, प्रशासनाने त्यांची आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल आणि दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. घरी जाताना, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करु आणि घरातील सदस्यांना व नातेवाईकांनासुध्दा वैद्यकीय सूचनांचे पालन करण्यास प्रवृत्त करणार असल्याची भावना यावेळी रुग्णांनी व्यक्त केली.
            कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

शिर्डी जितेश लोकचंदानी-राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक  येथील हॉटेल बाबाज परमिट रूमचे शटर तोडून हॉटेल मधली   सुमारे एक लाखाची दारू चोरून नेणारे सहा आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक केली असून या आरोपींना राहाता  न्यायालयात हजर केले असता  21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे ,अशी माहिती शिर्डी पोलीस स्टेशने  दिली.सध्या शिर्डी व परिसरात कोरोणामुळे लॉक डाऊन सुरू आहे, या काळात  सर्व दारू दुकाने ,परमीटरूम ,वाईन्स सर्व बंद आहे, अशा परिस्थितीत येथील मद्यपी  यांना दारू मिळणे मुश्किल झाले आहे,
हे मद्यपी दारुसाठी काही करण्यास तयार होत आहे, या लॉक डाऊन'मुळे  हॉटेल बाबाच परमिट रूम बंद आहेत , याचाच फायदा घेत रात्रीच्या वेळी तेथे कोणीही नसल्याचे पाहून या मद्यपीनी सावळविहीर फाटा येथील हॉटेल बाबाज परमिट रूम चे रात्री शटर फोडून या हॉटेलमधील एक लाख सात हजार 840 रुपयाची दारू चोरट्यांनी लंपास केली आहे, या चोरीची फिर्याद हॉटेलचे मालक महिंद्र जोंधळे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिली आहे ,त्यानुसार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, व तातडीने शिर्डी पोलीस स्टेशनने  पोलिस पथके तयार करून या चोरीच्या तपासासाठी ही पथके रवाना केली शिर्डी पोलिसांनी या चोरीचा तपास लावत महेश नारायण कापसे यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतरांची आरोपींचे नावे सांगितली त्यानुसार आशिष बबन शेलार भोलेनाथ विजय चंदरकर, विशाल अशोक आगलावे यांच्यासह ही दारू घेणारे व दाम दुप्पट रकमेला विकणारे मनोज विश्वनाथ वाघ व विजय भानुदास चव्हाण सर्व राहणार सावळीविहीर बुद्रुक तालुका राहता यांना पोलिसांनी अटक केली असून राहता न्यायालयात नेले असता त्यांना 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे अजूनही यात काही संशयित असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस सांगताहेत  ,या प्रकाराने शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ,कारण सावळीविहीर जवळच निमगाव कोर्‍हाळे येथे नगरमनमाड रस्त्या लगत असणार्‍या आनंद बिअर शॉपीच्या पाठीमागे सुमारे 24 लाखाचे बिअर बॉक्स अवैध साठा केलेला असताना जिल्हा दारूबंदी उत्पादनशुल्क पोलीस अधिकाऱ्यांनी येथे धाड टाकून तो जप्त नुकताच केला आहे, सध्या या भागात अवैद्य दारुसाठा ही मोठ्या प्रमाणात करून ठेवण्यात आला असून दुप्पट-तिप्पट रकमेला त्याची गुपचूप विक्री होत आहे, चोरी करून हीच  दारू बियर अधिक रकमेला विकले जात असल्याच्या चर्चा येथे होत आहे, या  चोरी प्रकरणी काही  मद्यपी  व काही पैसेवाले  पुढारीही  सामील असल्याची चर्चा आहे, मात्र  राजकीय दबावापोटी म्हणा  किंवा चिरीमिरी मुळे  हे प्रकरण  दाबण्याचा प्रयत्नही  होत असल्याची चर्चा आहे,  सध्या  लॉक डाऊन मुळे सर्व बंद असल्याने सर्व जण घरात आहेत,  मात्र याचा काही  टारगटांना , मद्यपींना हाताशी धरून राजकीय  पुढारी  हे काम करतात की काय ।अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहे ,काही दिवसांपूर्वीच राहता येतील देशी दारूचे दुकान फोडण्यात आले होते व नुकतेच सावळविहीर फाटा येथे असणारे हॉटेल बाबाच परमिट रूम शटर तोडून फोडण्यात आले व सुमारे एक लाख रुपयाची दारू चोरून नेण्यात आली , परिसरात सध्या भुरट्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात घडत असून यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी विशेष  लक्ष घालणे गरजेचे आहे,  व जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या परिसरातील अशा अवैध दारु साठेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे , अशी  मागणी शिर्डी व परिसरातून सध्या होत आहे, व शिर्डी परिसरात असणाऱ्या अवैध दारू साठे ,अवैध गुटखा साठे यांची एस पी यांनि  गुप्त पद्धतीने चौकशी करून साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच सावळीवीर येथील हॉटेल बाबा मध्ये चोरी करणारे व त्यांना साथ देणारे पुढारी यांचीही गुप्तपणे चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे,

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्यामध्ये प्रशासनाकडून आगामी काळातही कोरोना रुग्णांवर उपचार व तपासणीसाठी कोव्हीड केअर सेंटरची स्थापना केली जाणार आहे. तर सारी व कोरोना संशयित रूग्णांनाही उपचाराची व्यवस्था केली जाणार आहे. स्त्राव तपासणी राहुरीतच केली जाणार असून रूग्णांवर प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.राहुरी महसूल विभागात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनात मेडिकल असोसिएशनची बैठक झाली. शहरातील अनेक खासगी डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. खासगी डॉक्टरांचे पथक शासकीय डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्यास तयार असल्याचे असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.राहुरीमध्ये कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान केंद्र हे बाह्यरुग्ण विभाग तर बियाणे केंद्र हे स्टोअररूम म्हणून वापरण्यात येणार आहे. यासह महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सर्व विद्यार्थी निवास तसेच शेतकरी निवास भवनही कोव्हीड केअर सेंटर म्हणून वापरात आणले जाणार आहे. कोव्हीड केअर सेंटरमध्ये 600 जणांना उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सारी रोगाचा सर्व्हे सुरू असून खोकला, सर्दी असणार्‍यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी ठेवले जाणार आहे. रूग्णांसाठी एकच बेड असलेली स्पेशल रूम दिली जाणार आहे. कृषी माहिती केंद्रामध्ये केस पेपर काढणे व तपासणी करणे आदी कार्य शासकीय वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे.खासगी डॉक्टरांनी आठवड्यातून एक दिवस कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा देण्यासाठी होकार दर्शविला आहे. पूर्वी नगरला स्त्राव चाचणी केली जात होती. परंतु यापुढे राहुरीतच स्त्राव चाचणी केली जाणार असून अहवाल येईपर्यंत संशयित रूग्णांना एकाच रुममध्ये विद्यापीठातील विद्यार्थी निवासामध्ये ठेवले जाईल. अहवाल आल्यानंतर पॉझिटीव्ह आल्यास अभियंता इमारतीमध्ये ठेवले जाईल. तर निगेटीव्ह आल्यानंतर विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन विभागात 14 दिवसांसाठी ठेवले जाईल.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रूग्णांसाठी राहुरी तालुक्यातील नेमलेल्या सेंटरमध्ये ऑक्सिजन व्यवस्था केली जाणार आहे. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे किंवा त्रास होत असल्यास संबंधित रुग्णास नगर येथील सिव्हील हॉस्पिटलला नेण्यासाठी 24 तास अत्याधुनिक रुग्णवाहिका सेंटरपुढे उभी ठेवली जाणार आहे. यासह राहुरी प्रशासनाने आगामी काळातील अडीअडचणींमध्ये वाढ झाल्यास शासकीय अधिकार्‍यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.

सावळीविहीर। राजेंद्र गडकरी- सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे,त्यामुळे राज्यात व राहता तालुक्यात या लॉकडाऊन मुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, अशा परिस्थितीत सर्वजण घरात बसून आहेत, मात्र अश्या आपत्तिजनक परिस्थितीत गोरगरीब सर्वसामान्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे त्यात दिव्यांग  (अंध ,अपंग) नागरिकांचा प्रश्न तर गंभीर बनला आहे ,त्यामुळे अशा गरजू दिव्यांगांना मदत करण्यासाठी शिर्डी व परिसरातील काही तरुण एकत्र आले असून त्यांनी पुढाकार घेत व राहता तालुक्यातील समदृष्टी समता विकास अनुसंधान मंडळ (सक्षम)  या दिव्यांग संघटनेच्या मार्गदर्शनाने राहता तालुक्यातील दिव्यांगांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकवर्गणीतून साधारण दीड महिना पुरेल एवढा किराणा देण्यात येत आहे, नुकताच सावळीविहीर येथे कुमारी वर्षाताई राजेश पाचोरे यांना ही मदत करण्यात आली ,
 राहता तालुक्यातील विविध दिव्यांगांना ही प्रत्येकाच्या घरी जाऊन लॉक डाऊन चे नियम पाळत सर्वांना मदत दिली जात आहे, तसेच या मदतीचा कोणताही गाजावाजा केला जात नाही तसेच कोणताही फोटो काढून प्रसिद्धीला देण्यात येत नाही, सध्या देशात, राज्यात कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, गरजू दिव्यांग बंधू-भगिनींना तर मदतीची सध्याच्या काळात मोठी गरज आहे, हे ओळखूनच आम्ही समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ (सक्षम) या दिव्यांग संघटनेच्या मार्गदर्शनातून राहता तालुक्यातील दिव्यांगांना लोकवर्गणीतून घरोघर जाऊन ही मदत या राष्ट्रीय आपत्तीमध्ये राष्ट्रीय कर्तव्य म्हणून व राष्ट्रीय भावनेतून करत आहे, त्यासाठी योगेश  गोंदकर, प्रकाश  गोंदकर,पंकज दुशिंग, चेतन भडांगे ,सौरभ भडांगे आदी परिश्रम घेत आहेत ,अशी माहिती सचिन भैरवकर यांनी दिली, अशा संकटसमयी दिव्यांगाना मदत करून मोठा हातभार लावतअसल्याबद्दल या तरुणांचे शिर्डी व परिसरांमधून मोठे कौतुक होत आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget