शिर्डी, दि.19- राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हणमंतपूर व हसनापूर या परिसरातील 55 व्यक्तींना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 23 रुग्णांना उपचार पूर्ण होऊन तंदुरुस्त झाल्यामुळे आज विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले.
विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्यांची प्रशासनातर्फे नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड, राहाता ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गोकुळ घोगरे व त्यांचे सहकारी आणि साईबाबा हॉस्पीटलच्या डॉ.नरोडे, डॉ.पितांबरे याच्या पथकाने रुग्णांची दैनंदिन वैद्यकीय तपासणी केली व मार्गदर्शन केले. विलगीकरण कालावधीत या रुग्णांना साई प्रसादालयाचे प्रमुख श्री.थोरात यांच्या देखरेखीखाली दैनंदिन नाष्टा, चहा, दोन वेळचे भोजन देण्यात आले. परिसराची स्वच्छता आणि औषध फवारणी शिर्डी नगर पंचायत मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदशानाखाली ठेवण्यात आली होती. गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलगीकरण कक्षाशी संबधित सर्व व्यवस्था चोखपणे पार पाडली. श्री साईबाबा विश्वस्त संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिदे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांची संपूर्ण देखभाल करण्यात आली.
विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज मिळाल्यानतर रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णांनी तहसीलदार कुंदन हिरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधुन, प्रशासनाने त्यांची आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल आणि दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. घरी जाताना, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करु आणि घरातील सदस्यांना व नातेवाईकांनासुध्दा वैद्यकीय सूचनांचे पालन करण्यास प्रवृत्त करणार असल्याची भावना यावेळी रुग्णांनी व्यक्त केली.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.
Post a Comment