राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरू करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली.बऱ्याचवेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्देवाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत, अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण मोठ्यासंख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा.
कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतू अर्थचक्र सुरु करतांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरु करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्विकारायचा नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यांच्या सीमा बंदच.
जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की एका जिल्ह्यातील माणसे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. 3 मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. राज्यात अँटी कोरोना पोलीस ही उत्तम सेवा देतांना दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
Post a Comment