सुट्टीवर आलेला BSF जवान अपघातात गंभीर जखमी,उपचारादरम्यान मृत्यू.
बुलडाणा - 31 जानेवारी
चिखली तालुक्यातील गोद्री येथील मूळचे रहिवासी व हल्ली चिखली येथील संभाजीनगर भागात वास्तव्यात असलेल्या बीएसएफ जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 31 जानेवारी रोजी घडली.
यासंदर्भात दीपक देशमुख यांनी चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की अंकुश अशोक देशमुख वय 35 वर्ष हा बीएसएफ मध्ये नोकरीला असून एक महिन्याची सुट्टी घेऊन घरी आलेला होता. दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील स.द. म्हस्के मार्गावरून अंकुश हा आपला मुलगा देवेंद्र याच्यासह प्लेजर गाडीने येत असतांना समोरून येणाऱ्या गौतम इंगळे रा.चांधई यांनी त्यांच्या ताब्यातील स्कुटी भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून अंकुश यांच्या दुचाकीस समोरासमोर जबर धडक दिली. यामध्ये अंकुश व त्याचा मुलगा देवेंद्र याला मार लागला, त्यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र अंकुश यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्याचे सांगितले. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच तो कोमात गेला अश्या फिर्याद मृतकाचा भाऊ दिपक देशमुख यांनी दिनांक 30 जानेवारी रोजी चिखली पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादी वरून चिखली पोलिसांनी भांदवी कलम 279, 337 व मोटर वाहन अधिनियम 134 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आज दिनांक 31 जानेवारी रोजी उपचारादरम्यान जवान अंकुश देशमुख याचे दुर्दैवी मृत्यु झाले.ही माहिती शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.