चिखली- 24 डिसेंबर
केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ( CAA ) च्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक समिती तर्फे आज मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी एकता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्ष, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदारांना निवेदन सादर करून चिखलीकरांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले.

भारताच्या शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन या धर्माचे अनुयायी तेथे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. अश्यांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागत असल्यास त्यांना भारताचे नागरीकत्व देण्याची तरतूद असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा - 2019 ( CAA ) संसदेत पारित केला. या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असून देशभरात हा कायदा लागू झाला आहे. परंतु, काही राजकीय पक्ष व संघटना आपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक विशिष्ट धर्मियांमध्ये गैरसमज पसरवून देशात हिंसाचार माजवत आहेत. अश्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आणि या कायद्याचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक समिती,चिखली तर्फे 24 डिसेंबर रोजी एकता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जयस्तंभ चौक, सीमेंट रोड, चिंच परिसर आणि नगर पालिका कार्यालयासमोरुन मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचेला. त्यानंतर राष्ट्रप्रेमी नागरिक समिती तर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.शांततामय पध्दतीने निघालेल्या या मोर्चातील सहभागींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ विविध घोषवाक्यांचे फलक हातात धरले होते. "भारत माता की जय" तसेच "वन्दे मातरम्" अश्या घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अरविंद असोलकर, नगर संघचालक शरद भाला, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शहराध्यक्ष सुरेंद्र प्रसाद पांडे, अॅड. मंगेश व्यवहारे, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, राजेंद्र व्यास, अॅड. जयश्री कुटे, प्रा. निळूभाऊ चौधरी, रमेश बाहेती, सचिव गोविंद गिनोडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, शिवराज पाटील, अमोल साठे, अजय बिडवे, हनुमंत भवर, नंदकिशोर काछवाल, अशोक अग्रवाल, सतीश शिंदे, कुणाल बोंद्रे, नगरसेवक गोविंद देव्हडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. सामुदायिक राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.
