बुलडाणा- 23 डिसेंबर
जिल्ह्यातील खामगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात वरली मटका, अवैध मोबाईल बँक, जुगार अड्डे, रेतीची तस्करी, गुटखा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्व अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी व काही नेते राजकीय आश्रय देत आहे. अश्याच अवैध धंद्यांमुळे 21 डिसेंबरच्या मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घुण हत्या होऊन हे दुहेरी हत्याकांड घडले. त्यामुळे खामगांव मतदारसंघातील सर्व अवैध धंदे त्वरीत बंद करावे अन्यथा मुंबई येथे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करू, असा खणखणीत ईशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना आज 23 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, घाटपुरी नाका परिसरात विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घुण हत्या झाली. दोघेही भाजपा युवामोर्चा चे पदाधिकारी होते. त्यांना राजकीय पाठभळ मिळत असल्याने दोघांचे अवैध धंदे व दादागिरी वाढली होती. याशिवाय दोघांची हत्या करणारे आरोपी देखील भाजपा पक्षाशी संबंधित आहेत. रविंद्र भोंगळ याच्या सोशल नेटवर्कींगवर तसेच जाहिरातीचे फलक व फेसबुक पेजवर तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट होते.
विशेष म्हणजे विशाल देशमुख विरूद्ध पोलीसात अवैध व्यवसायासंबंधी अनेक गुन्हे दाखल होते. तसेच पत्नीच्या मृत्यू प्रकरणी देखील त्याच्यावर ठपका होता. सदरचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. याशिवाय विशाल देशमुख विरूद्ध पालिसांनी तळीपाराचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता. परंतु पोलीसांकडून वेळीच कारवाई न झाल्याने अखेर त्याच्या दादागिरीचे फलीत म्हणून निर्घुण हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे.तरी मतदारसंघात शांती सलोखा व सामाजिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी तसेच अश्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणनू खामगाव मतदार संघातील अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी ही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवेदनातून केली आहे.
Post a Comment