Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील गुन्हेगारांना घाम फोडणार्‍या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस शिपायाविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने ही कारवाई केली. पोलीस शिपाई रवींद्र आबासाहेब कर्डिले (वय- 35) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या रवींद्र कर्डिले यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील तक्रारदार यांचे शहरात दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. तक्रारदार यांच्या गॅरेजवर पत्तेचा क्लब सुरू होता. या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला. या छाप्यादरम्यान तक्रारदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच, तक्रारदार यांच्या वडिलांवर झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी रवींद्र कर्डिले यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांनी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार न करता थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 27 जूलै रोजी लाच मागणी पडताळणीदरम्यान कर्डीले यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 20 हजार रुपयांची मागणी केली. यामुळे रवींद्र कर्डिले यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे, पोलीस हवालदार सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, सुनील गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

🔸बुलडाणा जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
बुलडाणा - 13 ऑगस्ट
चिखली येथील अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुषपणे आळीपाळीने बलात्कार करुन तिला जखमी केल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.27 एप्रिल 2019 रोजी घडलेल्या या गुन्ह्यातील दोन्ही गुन्हेगारांना आज 13 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी विविध कलमान्वये दोषी धरले असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे एका 9 वर्षीय मुलीला 27 एप्रिल 2019 रोजी रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान गुन्हेगार सागर विश्वनाथ बोरकर व निखिल शिवाजी गोलाईत या दोघांनी मुलगी झोपलेली असतांना तिचे झोपेतच तोंड दाबून स्कुटीवर पळवून नेत स्मशानभूमी समोरील क्रिकेटच्या सुनसान मैदानात नेले होते. दरम्यान,तिच्यावर आळीपाळीने अमानुषपणे बलात्कार करण्यात आला यात मुलगी जख्मी झाली होती. तिला जिवे मारण्याची धमकी आरोपी कडून देण्यात आली होती.या घटनेची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी चिखली ठाण्यात दिली असता दोन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमाअन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट झाल्यानंतर 15 साक्ष तपासन्यात आले होते. आज 13 ऑगस्टला विशेष न्यायाधिश चित्रा हंकारे यांनी दोन्ही आरोपींना बलात्कारच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. गेल्या 55 वर्षानंतर बुलडाणा कोर्टातुन ही फाशीची शिक्षा ठोठावन्यात आली आहे.फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.वसंत भटकर, अतिरिक्त सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावी व सक्षमपणे मांडली.आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून चिखली ठाणेदार गुलाबराव वाघ व कर्मचाऱ्यांनी फार मेहनत घेऊन भक्कम पुरावे गोळा केले होते.दोन्ही आरोपींना शिक्षा होणार म्हणून चिखली पोलिस ठाण्याला विद्युत रोशनाईने सजवले.

प्रतिनिधी कोपरगाव मधुकर वक्ते 
कोपरगाव - भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असलेल्या बहादराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ शिलाताई अशोक पाचोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीकरीता आज पार पडलेल्या सभेत उपसरपंचपदी सौ शिलाताई अशोक पाचोरे यांच्या नावाची सूचना गोवर्धन पाचोरे यांनी मांडली तर अनुमोदन सदस्य सौ संगिता पाचोरे यांनी दिले. सरपंच विक्रम पाचोरे यांच्या अध्यक्षस्थानी पार पडली तर सचिव म्हणून ग्रामसेविका सौ अनिता दिवे यांनी काम पाहिले.मावळते उपसरपंच गोवर्धन बन्सी पाचोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. यावेळी साहेबराव पाचोरे, विकास सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय पाचोरे, माजी सरपंच दतात्रय पाचोरे, पोलीस पाटील आप्पाासाहेब पाचोेरे, आण्णासाहेब पाचोरे,अशोक पाचोरे, लक्ष्मण पाचोरे, दिलीप पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, वाल्मीक पाचोरे, रामनाथ पाचोरे, संदीप पाचोरे, दिपक आरोटे, निलेश पाचोरे,उपस्थित होते. या निवडीबददल माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवके कोल्हे यांनी नवनिर्वाचित उपसरपंचाचे अभिनंदन केले. 

बेलापूर  (वार्ताहर)-राज्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी योग्य व्यक्ती नव्हे तर सरकारी अधिकारीच नेमा, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी (ता.१४)दिल्याने प्रशासक सरपंच पदाची स्वप्न पहाणार्यांच्या स्वप्नावर विरजन पडले आहे.राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे या काळात शक्य नसल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत राजकीय व्यक्तींना प्रशासकपदी बसविण्याचा काहींनी घाट घातला होता त्या करीता पालक मंत्र्यांना अधीकार देण्यात आले होते त्यामुळे अनेकांनी प्रशासक सरपंच होण्याकरीता फिल्डींग लावण्यास सुरुवात केली होती काहींनी आपल्या नावाची शिफारसही राजकीय वजन वापरुन करुन घेतली होती प्रशासक पदाकरीता राजकीय पदाधिकार्यात जणू स्पर्धाच सुरु झाली होती अनेकांना प्रशासक झाल्याची स्वप्न पडू लागली होती या चढाओढीत काहीनी उच्च न्यायालयात धाव घेतली जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनीही कार्यकर्त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता  त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते                                
या आदेशाने राज्य सरकारच्या खासगी व्यक्ती नियुक्तीबाबतच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. दरम्यान, यामुळे या महिन्यात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी सरकारी अधिकारी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
दरम्यान राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकपदी योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याबाबतच्या तीन डझन आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. उच्च न्यायालयाने याआधी २७ जुलैला सरकारी अधिकारी नियुक्तबाबतचा पहिला अंतरिम आदेश दिला होता. त्यानंतर आज दुसऱ्यांदा असाच अंतरिम आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी २४ ऑगस्टला होणार आहे
ग्रामपंचायत कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी क वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. पण राज्याच्या ग्रामविकास विभागाने याला बगल देणारा निर्णय नव्या राजपत्राद्वारा घेतला होता.
उच्च न्यायालयाचा सरकारविरोधी कल पाहता नवीन राजपत्र हे कलम १८२ च्या आधारे प्रसिद्ध केले आहे. या कलमाचा आधार घेऊन जाहीर केलेल्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही. त्यासाठी सरकारने ही नवी पळवाट शोधली होती. परंतु न्यायालयाच्या परवानगीने एका नव्या याचिद्वारे आव्हान देण्यात आले होते.

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते  -
उजनी उपसा जलसिंचन योजनेकडे  दुर्लक्ष झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आशुतोष  काळे यांनी आमदार झाल्यानंतर लगेच सदर योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला तसेच सर्व दुरुस्त्या करून घेतल्याने उजनी उपसा जलसिंचन योजना सुरू झाली असून पाझर तलावांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. 
उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या पाझर तलावातील पाण्याचे आ . आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, बाबुराव थोरात, रोहिदास होन, किसन पाडेकर, के.डी. खालकर,अॅड. योगेश खालकर,  सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, अनिल खालकर, अरुण कोल्हे, लक्ष्मण थोरात, नाना नेहे, ज्ञानदेव नेहे, प्रभाकर गुंजाळ, युवराज गांगवे, सिकंदर इनामदार, अशोक नेहे, वाल्मिक वाकचौरे, निळवंडे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री. संघांनी, श्री. लव्हाटे, श्री. ढिकले आदी उपस्थित होते.
निवडणूक कालावधीत दिलेला शब्द खरा करून हा प्रश्न तातडीने सोडवल्याबद्दल लाभार्थी शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते - कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गवारे नगरमधील अतिशय महत्वाच्या असलेल्या पुलावरून परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नियमितपणे ये-जा असते. मात्र या पुलाची व रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे गवारे नगरमधील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळयाचे दिवस सुरु आहेत. रस्त्यावर व पुलावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असल्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना लहान मोठ्या इजा होत आहेत. याची गांभीर्याने दखल घेवून गवारे नगरमधील या पूल व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, कार्याध्यक्ष संदीप कपिले, दत्तात्रय गवारे, मारुती जपे, सचिन गवारे, सागर लकारे, धीरज कोठारी, स्वप्नील गवारे, धीरज आंबोरे आदी उपस्थित होते.

कोपरगाव प्रतिनिधी मधुकर वक्ते-आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांच्या वतीने २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
     आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राहुल चांदगुडे व संदीप कुटे हे नेहमीच रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना मदत करीत असतात. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या चासनळी येथील मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक विद्यालयाला ५ लाख रुपये खर्च करून भव्य-दिव्य व्यासपीठ बांधून देण्यात आले आहे. या व्यासपीठाचे कर्मवीर शंकरराव काळे व्यासपीठ अये नामकरण देखील करण्यात आले आहे. यावर्षी देखील समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासत राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांनी राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास २५ हजार रुपयाची देणगी देण्याचा निर्णय घेऊन या रक्कमेचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्राचार्या सौ.छाया काकडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचून गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने काळे परिवाराची तिसरी पिढी या शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहे. त्यांच्या कार्याला अल्पशी मदत म्हणून रयत शिक्षण संस्थेला मदत करीत असल्याचे राहुल चांदगुडे व संदीप कुटे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिराच्या प्राचार्या सौ.छाया काकडे व त्यांचे सहकारी शिक्षक यावेळी उपस्थित होते.आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राधाबाई काळे कन्या विद्यामंदिरास मदतीचा धनादेश देतांना राहुल चांदगुडे व संदीप कुटे समवेत प्राचार्या सौ.छाया काकडे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget