अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील गुन्हेगारांना घाम फोडणार्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस शिपायाविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने ही कारवाई केली. पोलीस शिपाई रवींद्र आबासाहेब कर्डिले (वय- 35) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या रवींद्र कर्डिले यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील तक्रारदार यांचे शहरात दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. तक्रारदार यांच्या गॅरेजवर पत्तेचा क्लब सुरू होता. या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला. या छाप्यादरम्यान तक्रारदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच, तक्रारदार यांच्या वडिलांवर झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी रवींद्र कर्डिले यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांनी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार न करता थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 27 जूलै रोजी लाच मागणी पडताळणीदरम्यान कर्डीले यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 20 हजार रुपयांची मागणी केली. यामुळे रवींद्र कर्डिले यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे, पोलीस हवालदार सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, सुनील गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment