Latest Post

बेलापूर( प्रतिनिधी )-श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक 23 जुलै रोजी ह. भ. प. अनिल महाराज महांकाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथील संत सावता महाराज मंदिर बेलापूर बुद्रुक येथे बुधवार दिनांक 16 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात झाली.  सात दिवस चाललेल्या पारायण सोहळ्यात ह. भ. प. मयूर महाराज बाजारे, ह. भ. प. डॉक्टर शुभम महाराज कांडेकर, ह. भ. प. विजय महाराज कोहिले, ह. भ. प. कृष्णा महाराज शिरसाठ, ह. भ. प. जीवराम महाराज कापंडेकर, ह. भ. प. मोहन महाराज बेलापूरकर तसेच ह भ प वीर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या पारायण सोहळ्यास राजेंद्र टेकाळे कुर्हे वस्ती, गोखलेवाडी, दुधाळ वस्ती, मेहेत्र परिवार ,बेलापूर ,श्री रघुनाथ एकनाथ जाधव श्री गजानन दगडू जाधव व बाळासाहेब जाधव, माळी परिवार व दादासाहेब कुर्हे यांनी पंगतीचे यजमान पद स्वीकारले सात दिवस चालणारे या सोहळ्यात पहाटे काकड आरती, त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी होणाऱ्या हरिपाठाचे नेतृत्व हरिहर महिला भजनी मंडळ, सावता महाराज भजनी मंडळ, गोखलेवाडी कुर्हे वस्ती परिसर भजनी मंडळ, बबन महाराज अनाप यांनी केले तर गायनाचार्य म्हणून संजय महाराज शिरसाठ, रामचंद्र सोनवणे, मधुकर पुजारी, मयूर महाराज कुऱ्हे, बळी तात्या वाकडे ,कृष्णा महाराज शिंदे तर हार्मोनियम वादक अरुण कुर्हे, बन्सी महाराज मुंगसे, दत्तू जाधव, बापू अनाप, जिजाबाई शिंदे, शाम मेहेत्रे तर मृदंगाचार्य म्हणून ह. भ. प. विजय महाराज चौधरी ,सुधीर महाराज कुर्हे, मयूर महाराज बाजारे,  भास्कर महाराज कुर्हे, कैलास खर्डे, साठे मामा, शिवा मिसाळ, आदित्य सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमाकरिता बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द , नरसाळी , आंबी , केसापूर, चांदेगाव, उक्कलगाव फत्याबाद , उंबरगाव , वळदगाव,  कोर्हे वस्ती, पटेल वाडी, रामगड, लाडगाव, ऐनतपुर , सुभाष वाडी मातापूर  कान्हेगाव, ब्राह्मणगाव ,करजगाव,कनगर  या पंचक्रोशीतील भजनी मंडळाने साथ दिली.

कोपरगाव(गौरव डेंगळे): तालुक्यातील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेने विशेष ठसा उमटवलेले सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांची कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. आज संजीवनी येथे पार पडलेल्या बैठकीत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही निवड पार पडली.

डॉ. देवकर यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विविध शाळांमध्ये क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संयोजक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन करताना उत्कृष्ट यश मिळवून दिले आहे. केवळ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणेच नव्हे, तर खेळाडूंच्या मानसिक आणि चारित्र्य विकासालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.कोपरगावसारख्या ग्रामीण भागात खेळांची गती वाढवण्यासाठी आणि नवोदित विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. देवकर यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी एकमताने त्यांची निवड केली.अध्यक्षपदाच्या निवडीनंतर शारदा स्कूलचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाने, नथलीन फर्नांडिस आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. देवकर यांचे विशेष सत्कार करून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. अनेक विद्यार्थ्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.या निवडीमुळे कोपरगाव तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होणार असून जिल्हा व राज्य पातळीवरील विविध स्पर्धांसाठी अधिक योजनाबद्ध तयारी होणार आहे. डॉ. देवकर यांच्या दूरदृष्टीचा आणि अनुभवाचा लाभ घेऊन तालुक्यातील क्रीडा संस्कृती अधिक भक्कम होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या नेतृत्वात कोपरगाव तालुका हे नाव भविष्यात केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर ओळखले जाईल आणि नव्या पिढीतील खेळाडूंना अधिकाधिक संधी व मार्गदर्शन मिळेल,हीच सर्वांची अपेक्षा आहे.

बेलापूर (वार्ताहर)  चेन्नई येथील ओम् चारीटेबल ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय वैदिक टॅलेंट स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांना हा सन्मान मिळाला आहे.      चेन्नई येथील ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सन 2024 मध्ये देशभरातील वैदिक महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक    परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील विद्यार्थी वेदमूर्ती महेश दायमा याने परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला. वेदमूर्ती दायमा हा राजस्थान येथील गोठ मांगलोद मधील दधीमती गुरुकुल मधून शिक्षण घेत होता या गुरुकुलमधून शिक्षण घेत असताना वेदमूर्ती महेश दायमा याने या परीक्षेत भाग घेतला होता आंतरराष्ट्रीय दर्जाचे बटू या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते या परीक्षेत महेश दायमा यांना 99 टक्के मार्क मिळाले होते त्यामुळे त्याचा सन्मान नुकताच चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता      रोख रक्कम व सन्मानपत्र शाल श्रीफळ देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला. चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान कमल किशोर जी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली व जगदीश जी गुरुजी यांच्या व ओम चॅरिटेबल ट्रस्ट नॅशनल वैदिक येथील मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आला.  चिरंजीव महेश हा पत्रकार दिलीप दायमा यांचा चिरंजीव असुन त्याने महाराष्ट्र पुणे आळंदी या ठिकाणी घेण्यात आलेल्या वेदोस्तव परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळविला होता. भारतातील 40 गुरुकुल मधून प्रथम येण्याचा बहुमान दायमा याने मिळविला होता.आळंदी येथील कार्यक्रमात बेलापूरचे भूमिपुत्र व  श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते सुवर्णमुद्रिका व चांदीचे पंचपात्र देऊन सन्मानित करण्यात आले‌‌ होते. महेश दायमा यांचे शिक्षण राजस्थान गोठ मांगलोद जिल्हा नागोर या ठिकाणी  झाले आहे‌.  पुढील शिक्षणासाठी महेश हा काशी या ठिकाणी जाणार असून महेश याला कमल किशोर जोशी गुरुजी तसेच दधिमती गुरुकुल चे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिनारायण व्यास, कोषाध्यक्ष जय किशन संचालक, भालचंद्र व्यास संयुक्त, सचिव रूप, नारायण आसोपा तसेच सुभाष मिश्रा व सर्व संचालक सर्व शिक्षक व आई वडीलाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले‌.वेदमूर्ती महेश दायमा यांच्या सुयशा बद्दल मा .जि प. सदस्य शरद नवले , बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद, भास्करराव खंडागळे, प्राध्यापक ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ सर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, किराणा मर्चंट चे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार मनोज आगे, जय बाबाचे संपादक बाळासाहेब आगे, कै. मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, बेलापूर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड मा. सरपंच भरत साळुंके, राज्य राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अरुण पा नाईक ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक पं स. मा सभापती दत्ता कुर्हे आदिंची अभिनंदन केले आहे.

चेक रिपब्लिक/२० जुलै/गौरव डेंगळे:भारतीय टेनिसपटू रुतुजा भोसले हिने चीनची झेंग वुशुआंग हिच्यासोबत भागीदारी करत ITS Cup 2025 या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्यांनी जबरदस्त खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय नोंदवला.

हा सामना तितकाच उत्कंठावर्धक ठरला. दोघींनी अप्रतिम समन्वय आणि आक्रमक खेळ दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. रुतुजाची शांत आणि आत्मविश्वासपूर्ण शैली झेंगच्या जलद आणि अचूक खेळीला उत्तम साथ देत होती. त्यांच्या रॅलीज आणि विनर्सनी सामना रंगतदार केला.

या विजयानंतर रुतुजा भोसलेने आपल्या कारकिर्दीत आणखी एक आंतरराष्ट्रीय यशाची भर घातली आहे. ITF स्तरावरील तिचे हे आणखी एक विजेतेपद असून जागतिक स्तरावर तिच्या नावाचा झंकार अधिकच वाढला आहे.रुतुजाच्या या विजयामुळे भारताच्या टेनिस विश्वात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नाखोन पथोम (थायलंड) | गौरव डेंगळे भारताने एशियन अंडर-१६ पुरुष व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पणातच इतिहास रचला आहे. शनिवारी झालेल्या थरारक सामन्यात भारताने जपानचा ३-२ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. या विजयानंतर भारतासह पाकिस्तान, जपान आणि इराण हे चारही उपांत्य फेरी गाठलेले संघ २०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या एफआयव्हीबी बॉईज अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले आहेत.कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने २५-२१, १२-२५, २५-२३, १८-२५, १५-१० अशा सेट्समध्ये विजय मिळवला. या सामन्यात अब्दुल्ला (१६ गुण), अप्रतीम (१५), रफिक (१२) आणि चरन (४) यांनी भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.याआधी उपांत्य फेरीत भारताचा पाकिस्तानकडून सरळ सेट्समध्ये पराभव झाला होता. मात्र, जपानविरुद्धच्या विजयाने भारताने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले.

स्पर्धेतील आपल्या गटात भारताने थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि चीन या तिन्ही संघांवर सरळ सेट्समध्ये विजय मिळवून ९ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर क्रॉसओव्हर फेरीत उझबेकिस्तानवर मात करत भारताने उपांत्य फेरी गाठली. गटपातळीवर जपानकडून झालेल्या पराभवाचा बदलाही भारताने कांस्यपदक सामन्यात घेतला.२०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या FIVB अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची उपस्थिती निश्चित झाली असून, ही कामगिरी भविष्यातील जागतिक स्तरावरच्या संधींसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पणजी ( गौरव डेंगळे) – गोवा राज्य क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे (DSYA) नवे संचालक डॉ. अजय गावडे यांनी १७ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारताच तात्काळ कृतीला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी गोव्यातील सर्व १२ तालुक्यांतील तालुका क्रीडा अधिकारी (TSO) व सहायक क्रीडा शिक्षण अधिकारी (APEO) यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यांच्या समोरील अडचणी आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.राज्यातील क्रीडा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना सक्षम करण्यासाठी एक व्यापक योजना आखण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. खेळांना गावपातळीपासून गती मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी आणि गोव्यातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हे या चर्चेचे मुख्य सूत्र

राहिले.या दिवसातच डॉ. गावडे यांनी खेळो इंडिया अधिकारी, क्रीडा प्राधिकरण गोवा (SAG) व विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. त्यांनी क्रीडा क्षेत्रात सुसंगत समन्वय ठेवत नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले. DSYA, SAG आणि गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिल (GFDC) यांच्यात समन्वय साधत गोव्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“गोव्यातील खेळाडूंमध्ये अफाट कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आधार दिल्यास ते राज्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील. गोवा हा देशातील महत्त्वाचा क्रीडा केंद्र बनावा, हीच आमची दिशा व ध्येय आहे,” असे डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.त्यांच्या या सकारात्मक आणि कृतीशील सुरुवातीमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व स्तरावर नव्या आशा निर्माण झाल्या असून,गोव्यातील क्रीडा व्यवस्थापनात ठोस बदल होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने २६ जुलै २०२५ रोजी पहिली ‘शारदा एक्सप्रेस खो-खो लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लावण्यासाठी व कौशल्य वाढवण्यासाठी ही स्पर्धा एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे.या विशेष लीगमध्ये जिल्ह्यातील १२ संघांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक संघात ६ मुले व ३ मुली असा समावेश असणार असून, ही स्पर्धा इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. लिंगसमता आणि सांघिक एकता यावर आधारित ही अभिनव संकल्पना शारदा स्कूलने राबवली आहे.स्पर्धा साखळी पद्धतीने (League Format) खेळवण्यात येईल.

प्रत्येक सामन्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.

हा पुरस्कार कै. महेंद्र अशोकराव नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार आहे.या लीगमध्ये अंतिम विजेत्या संघाला ₹२१००/- रोख रक्कम आणि भव्य चषक देण्यात येणार असून,हा पुरस्कार श्री संकेत दिलीपराव पारखे यांच्याकडून दिला जाणार आहे.संघ नोंदणीसाठी इच्छुकांनी खो-खो प्रशिक्षक श्री गणेश वाघ व श्री गणेश मोरे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य के. एल. वाकचौरे करत असून, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांच्या अधिपत्याखाली या भव्य लीगचे आयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच सामूहिकतेचे मूल्य, स्पर्धात्मकता,आणि स्वतंत्रता यांचा अनुभव देणारी ठरणार आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget