श्रीरामपुरात अतिक्रमण विरोधी मोहिमेला सुरुवात मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान
श्रीरामपूर - नगरपालिकेने सात दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले.
सदर मोहीम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झालेली आहे .
बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे ही दिसत आहे.
सदरची अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडे घातले.आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली जात आहे.
सदरची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केली आहे.