पृथ्वी तलावर आलेल्या प्रत्येकाला या पृथ्वीतलावरून अखेरचा निरोप घ्यायचा असतो. असे असले तरीही या पृथ्वीतलावरील प्रत्येक जण जसा प्रकृतीने भिन्न असतो तसाच तो स्वभावाने देखील भिन्न असतो.प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा असू शकत नाही. हा एक निसर्ग नियम आहे.
आयुष्यात आलेला प्रत्येक जन आपल्या संपूर्ण जीवनात वैविध्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करत असतो.काही व्यक्ती आपल्याला मिळालेल्या सुंदर जीवनाचा सदुपयोग करत जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोग होईल असा प्रयत्न करतात आणि त्यातूनच सत्कार्य अशा काही मिळालेल्या संधीतून जनसेवा करतात. हीच जनसेवा लोकांच्या हृदयात जागा निर्माण करून जाते. लोकांच्या हृदयात जागा निर्माण केल्यानंतर तीच व्यक्ती जेव्हा निसर्गचक्रानुसार पृथ्वीतलावरून निघून जाते, त्यावेळी हृदय तुटलेल्या व्यक्तींची काय अवस्था असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रमजानखान चांदखान पठाण होय.
सर्वसाधारणपणे अधिकारी म्हटलं कि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो.अगदी अधिकाऱ्यांना हृदय नसते यापासून तर अधिकारी फार करारी असतात इथपर्यंतचे विचार समाजामधून आपल्याला ऐकायला मिळतात. रमजानखान पठाण हे या वाक्यास अपवाद ठरले.त्यांनी त्यांच्या संपूर्ण अधिकारी पदाच्या काळामध्ये किती लोकांना जोडले हे त्यांच्या जाण्याने लोकांनी केलेल्या भावनांतून व्यक्त होते.
रमजान पठाण यांनी कधीही केलेल्या कार्याचे आईने दिलेल्या शिकवणी प्रमाणे एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू दिले नाही. कळू द्यायचे नाही याप्रमाणेच अनेकांना त्यांच्या सेवेमध्ये अडचणींना साथ देत त्यावर आपल्या ज्ञानाने माफ करत अनेकांना अडचणीतून सोडवलेच तर अनेकांना मदतीचा सहकार्याचा हातही दिला.
फक्त एखाद्याची अडचण त्यांच्या कानावर पडण्याचा उशीर कि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करत संबंधितास कशाप्रकारे मदत करता येईल याचाच ते सदैव प्रयत्न करत असत.प्रसंगी या जनसेवेच्या काळामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. मात्र तरीही लोकांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण ती केलीच पाहिजे याच हेतूने ते सतत कार्यरत असायचे. त्यातूनच त्यांनी आपल्या मूळ श्रीरामपूर गावापुरतेच काम न करता,फक्त जिल्हया पुरते काम न करता राज्यभरामध्ये काम केले.ते कार्यरत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी हे पद,या पदास एक उंची गाठून देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.एकेकाळी शिक्षण विस्तार अधिकारी हे पद फक्त बाहुले म्हणूनच होते अशी सर्वांचे भावना होती. मात्र रमजान पठाण यांनी राज्यात शिक्षण विस्तार अधिकारी संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरती लढा उभारून एक वेगळ्या प्रकारचे स्थान शिक्षण विस्तार अधिकारी पदाला मिळवून दिले. त्याचमुळे राज्यभर असलेले त्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी सहकारी मित्र आपल्या मित्राला नेतृत्वाला अलविदा करताना भावना विवश झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी व्यक्त केलेल्या भावना या हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या आणि रमजान पठाण नेमके कसे होते हे या व्यक्त झालेल्या भावनांतून दिसून आले.
नव्याने हजर झालेल्या शिक्षकास आधार देत भविष्यात चांगले काम करण्याची संधी निर्माण असल्याचे सांगत उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्या कामी सतत प्रेरणादायी काम पठाण साहेबांनी केले.
संपूर्ण राज्यात प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता हा कळीचा मुद्दा ठरत असतो.या मुद्द्याला स्पर्श करण्यास बरेचसे अधिकारी टाळाटाळ करतात.मात्र रमजान पठाण यांनी अत्यंत बारकाईने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचे काम करून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. रमजानभाई यांनी केलेल्या संच मान्यतेस राज्यातील कोणत्याही व्यक्तीने दिलेले आव्हान कोलमडून पडल्याशिवाय राहायचे नाही. म्हणूनच अत्यंत जवळच्या मित्राने याबाबत त्यांचा उल्लेख संच मान्यतेचा बादशहा असा केला.
आपण नगर जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना मराठी माध्यमासोबतच उर्दू भाषिक शाळांचा देखील नावलौकिक कसा वाढेल याचा सातत्याने मागील काही वर्षे त्यांनी उत्तम असा प्रयत्न केला.
रमजान पठाण यांनी शैक्षणिक सेवा देत असतानाच समाजासाठीही ते वेळोवेळी पुढे आल्याचे त्यांच्या सामाजिक कार्यातून देखील दिसून येते. त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर शहरात उभारली गेलेली मिल्लत नगर या भागातील मिल्लत मस्जिद या प्रार्थनास्थळाचा समावेश होतो.
उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षेची आवड निर्माण व्हावी याकरिता पठाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्कॉलरशिप योजना राबवता आली याचा आनंद काही औरच होता.पठाण साहेब आपल्यात नाहीत या गोष्टीवर कुणाचाही विश्वास बसत नाही आणि प्रत्येकाला ते आपल्या अवतीभोवतीच आहेत असा सातत्याने भास होतो आहे. मात्र तरी देखील ते आपल्यातून निघून गेलेले आहेत हे वास्तव आहे.तरीही ते विचार रूपात आपल्या सोबत कायम आहेत असे समजून त्यांनी दिलेला विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे मित्र म्हणून आमचे कर्तव्य असेल आणि हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्याबद्दल खूप काही देण्यासारखे आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते कि -
*बिछडा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गयी*
*एक शख्स सारे शहर को विरान कर गया*
*शकील बागवान*
केंद्रप्रमुख,खडकी केंद्र,
तालुका - अकोले