आंदोलने, धरणे, रास्तारोको, मोर्चाना बंदी जिल्ह्यात ११ जूलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश-पोलीस अधीक्षक मनोज पाटील
अहमदनगर प्रतिनिधी -जिल्ह्यात १० जूलै २०२२ रोजी 'बकरी ईद' व 'देवयानी आषाढी एकादशी' हे सण साजरा करण्यात येणार आहेत.त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने २८ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून ते ११ जूलैच्या रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.सध्या राज्याच्या राजकीय परिस्थितीमुळे निषेध मोर्चा, प्रती निषेधाच्या घटना चालू असून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, जोडे मारो आंदोलन तसेच
राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यालय तोडफोडीच्या घटना घडत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरती योजना अनुषंगाने संपूर्ण देशभरात विविध संघटनांचा विरोध चालू आहे.त्यामुळे विविध राजकीय पक्ष मोर्च, निषेध आंदोलने, धरणे आंदोलने, रास्तारोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात विविध दिंड्या, पालख्या आगमन व प्रस्थान तसेच इतर धार्मिक कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व त्यात समाविष्ट असलेल्या कलमांचा नियमन आदेश वरील कालावधीसाठी जारी करण्याचे अधिकार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत.असे ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
