श्रीरामपूर प्रतिनिधी-बाभळेश्वर येथील विवाहितेचा रांजणखोल-खंडाळा शिवारात प्रवरा कॅनॉलमध्ये काल रविवारी मृतदेह आढळून आला. सासरच्या लोकांकडून तिचा घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.वैशाली उर्फ कल्याणी धीरज पाटोळकर (वय 34) असे या विवाहितेचे नाव आहे. काल रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास खंडाळा- रांजणखोल रोड येथील अचानकनगर भागात प्रवरा कॅनॉल मधील पुलाला अडकलेल्या अवस्थेत हिचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.खंडाळा-रांजणखोल शिवारात पाटाच्या पुलाला महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी रांजणखोलचे पोलीस पाटील कृष्णा अभंग यांना दिली. त्यांनी ही माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. शेलार, रघुवीर कारखिले, श्री. बोरसे फौजफाट्यासह हजर झाले. यावेळी महिलेच्या पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी तिचेे वडील व भाऊ यांनी केली.श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती येथील तिचे माहेर असून सासर बाभळेश्वर येथील आहे. कल्याणी उर्फ वैशाली हिचा पती धीरज पाटोळकर याचे तिच्यासोबत अनेकदा वाद होत होते. या वादातून पती धीरज पाटोळकर हा वैशाली हिला मारहाण करून तिचा राग करत होता. त्यामुळेच वैशाली हिचा पतीकडून घातपात झाला असावा, असा आरोप वैशाली हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दुपारी या विवाहितेवर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment